कोल्हापूरचा उठाव - Scholarship Exam

         'वर्तमानदीपिका' 'वृत्तसार' या मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांनी उत्तरेकडील उठावाच्या बातम्या दक्षिणेत देण्याचे कार्य केले. त्यामुळे दक्षिणेतील सैनिक चीथविले गेले. कोल्हापूर येथे २७ व्या रेजिमेंट मधील २०० शिपायांनी ३१ जुलै १८५७ च्या रात्री रामजी शिरसाटच्या नेतृत्वाखाली उठाव केला. ३ ऑगस्ट १८५७ रोजी लेफ्टनंट कर हा साताऱ्याहून सैन्यासह कोल्हापूरला आला. त्याने बंडखोरांचा पराभव केला. नंतर ग्रांट जेकबची स्पेशल कमिश्नर म्हणून नियुक्ती झाली. कोल्हापुरातील उठावाची सर्व माहिती २८ व्या पलटणीतील गोविंद दळवी या प्रायव्हेटने कर्नल ग्रांट जेकब यांस दिली. म्हणून जेकबला उठाव मोडण्यास मदत झाली. १९ ऑगस्ट १८५७ पासून जेकबने उठाव करणाऱ्या सैनिकांना शिक्षा देण्यास सुरुवात केली.

४ डिसेंबर १८५७ रोजी ५०० सैनिकांनी कोल्हापूरचे बाहेरून रक्षण करणाऱ्या कॅप्टन ग्रांट एबट याला चकवून तटावरून प्रवेश करून राजवाडा ताब्यात घेतला. एबटला हे समजताच त्याने हल्ला सुरु केला. त्याच्यासोबत लेफ्टनंट होलबर्टन, कॅप्टन थॉमसन, कॅप्टन शेनीडर होता. क्रांतिकारकांच्या पुढाऱ्याला त्यात गोळी लागली तरी त्यांनी इंग्रजांना प्रत्युत्तर देणे सुरूच ठेवले. यावेळी युक्ती करून कॅप्टन शेनीडर शरणागतीचा ध्वज घेऊन राजवाड्यात आला. ५ डिसेंबर १८५७ रोजी त्याने राजाची भेट घेतली.  भेटीनंतर राजाने  इंग्रजांऐवजी क्रांतीकारकांनाच शरण येण्यास सांगितले. त्याच दिवशी एबटने राजवाड्यात कोर्ट बसविले व ३६ क्रांतीकारकांना फाशी दिली. बाकीच्यांचा दोन दिवसात बंदोबस्त करून उठाव मोडला. या उठावामागे बाबासाहेबाचा भाऊ चिमासाहेब होता पण याचा पुरावा नव्हता. पण त्यानंतर चिमासाहेब बाहेर आल्यानंतर लोकांनी त्यांचा जयजयकार केला. त्यामुळे एबटला विश्वास झाला. चिमासाहेबांना त्यांच्या १६ नोकरांसह वाघोटन येथे आणले. तेथून बात्नीस बोटेतून कराची येथे नेले. १२ मे १८५८ पासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. १५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांचा मृत्यू झाला. वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकब याने सहाय्य केले.