महात्मा गांधी
(२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८). मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अद्भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.
कस्तुरबा आणि मोहनदास
यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ही
विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नाचे असले, तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक
परिस्थितीत होते. त्यांनी मांसाहार, धुम्रपान, वेश्यागमन इ. गोष्टींचे
प्रलोभन मोहनदासांना दाखविण्याचा प्रयत्न केला. ते त्यात काही काळ फसलेही. परंतु
तीव्र पश्चात्ताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले. १८८७ साली ते मॅट्रिकच्या
परीक्षेत उत्तीर्ण झाले.
१८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितले, की मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडलापाठवावे. परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडलापाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले. मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठविण्यास नाखूष होती. परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज्य करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि ते १८८८ मध्ये इंग्लंडला गेले. या वेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायापाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादांमध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले, ते इंग्लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबल यांच्या वाचनाने अधिक दृढ झाले.
ते १० जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी लंडनची मॅट्रिक परीक्षाही ते उत्तीर्ण झालेच होते. स्वदेशी परतले. मातेचे निधन झाले होते, ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळली. वडीलभावाने परदेशगमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेवविले.
आफ्रिकेतील सत्याग्रहसंग्रामाचे प्रथम पर्व : भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. दरबानचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर ४०,००० पौडांची फिर्याद केली होती. गांधींनी त्या दोघांचे मन वळवून कज्जाचा निकाल सामोपचाराने करवून घेतला. आफ्रिकेत सु. २० वर्षे गांधी राहिले. वकिलीचा अनुभव घेतला. दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून, कज्जाचा निकाल करणे यात गांधी तरबेज झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगो ऱ्या जमातींवरील विशेषतः हिंदी लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरांवरील होणा ऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमांविरुद्ध आपल्या सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकालपर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांनी साधली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इ. जमातींची व दलित जनांची अंतःकरणे काबीज केली. अनेक यूरोपीय मित्रही मिळविले.
दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्या वेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या तीन स्वतंत्र राज्यांत हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या संख्येने नेले जात होते. हिंदी व्यापारीही तेथे व्यापाराकरिता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगो ऱ्या लोकांना निग्रोंप्रमाणेच वागवीत असत; सर्वांनाच कुली म्हणत. गोऱ्या वस्तीत राहण्याचा त्यांना प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले, तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत; बुटाने तुडवीत.
गांधींनी स्वतः अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्या वेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबिली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरिता गोळा होत असे; त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रतिमास सादर करण्याची प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. याविरूद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास १८९६ च्या जून महिन्यात गांधी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरिता तात्पुरते भारतास परतले. काही महिने भारतात राहून येथील वृत्तपत्रांत तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकीकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. याच सुमारास बोअर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे शुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. १९०३ साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरूद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबांसह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला १९०७ मध्ये उग्र रूप आले. १९०८ मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधींनाही सक्तमजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे पडसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. १९१२ साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्सने काळा कायदा रद्द करावा, म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्नेह जमला. गोखले यांस गांधींनी आपले राजकीय गुरू म्हणून अत्यंत पूज्य मानले. १८ डिसेंबर १९१३ रोजी गांधींना स्मट्सने बंधमुक्त केले व २१ जानेवारी १९१४ रोजी वर्णविद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व स्मट्स यांच्यात तडजोड झाली.
आफ्रिकेतील त्यांच्या वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी रस्किनचे अनटू धिस लास्ट, टॉलस्टायचे किंग्डम ऑफ गॉड व थोरोचे निबंध वाचले. रस्किनच्या पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले. दरबान शहराजवळ सु. चाळीस हे. जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. गांधी स्वतः शेतकाम करीत, छापखान्यात यंत्रेही फिरवीत. नंतर त्यांनी जोहॅनिसबर्गजवळ सु. ४४० हे. जागेत टॉलस्टाय फार्म स्थापिला. १९१३ मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी येथेच पडली होती. तत्पूर्वी त्यांनी १९०८ साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तररूपाने लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे, हा विचार त्यांनी मांडला.
भारतातील सार्वजनिक जीवन: गांधी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इ. शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांस भेटी दिल्या. हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापा ऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली. परंतु गांधींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीतज्ञ खरे गुरूजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे. बी. कृपलानी, किशोरलाल मश्नुवाला, प्यारेलाल इ. गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला.
हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ ४ फेब्रुवारी १९१६ रोजी झाला; त्या सभेत व्हाइसरॉय लॉर्ड हर्डिंग, अॅनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्त कंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहि ऱ्यालाही दिपवून टाकणाऱ्या जडजवाहिरांनी मंडित राजेमंडळी येथे बसलेली आहेत. भारताची गरिबी नष्ट करावयाची तर अगोदर, डोळे दिपविणारे जडजवाहिर राजेमहाराजांपाशी आहेत, तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्याची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत’. अशा अर्थाचे भाषण चालू असताना अॅनी बेझंट यांनी गांधींना हटकले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधी थांबले नाहीत. बेझंटनी ती सभा रागावून बरखास्त केली.
गांधींनी १९१७ मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधींनी मानला नाही. या वेळी राजेंद्रप्रसाद, ब्रिजकिशोर, मझरूल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील ८५० खेड्यांतील सु. ८,००० शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधींनी लिहून घेतल्या. १३ जून १९१७ रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत, असे १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले.
चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधींजींचे भारतीय नेतृत्त्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तुटपुंज्या पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा सत्तर टक्के बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सु. ८०,००० मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. बावीस दिवस संप चालला. गांधींनी मजुरांचा संप टिकविण्यासाठी उपोषण केले. तीन दिवसांत यश आले. मालकांनी ३५ % पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजुर-महाजन नावाची संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार, चार आणेच पीक येऊन देखील, शेतसारा वसूल करू लागले. गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. ही चळवळ पसरू लागली, म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला.
पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी, म्हणून १९१७ साली व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलाविली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्यभरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते, की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकारांचे आश्वासन मिळाले, तरच सैन्यभरतीला पाठिंबा द्यावा. गांधींनी बिनशर्तच पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधींचा व दीनबंधू सी. एफ्. अँड्रूज या ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा स्नेहजमला होता. ब्रिटिश सरकारचे भारतातील प्रतिनिधी आणि गांधी यांच्यामधला अँड्रूज हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्यभरतीच्या प्रचाराकरिता देशभर फिरत असता गांधींची प्रकृती अत्यंत परिश्रमाने ढासळली. अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक तापही सारखा राहू लागला. खेडा जिल्ह्याच्या सत्याग्रहापासून वल्लभभाई पटेल यांचा स्नेहसंबंध वाढू लागला होता.वल्लभभाई अहमदाबादला गांधींना भेटावयास आले. वल्लभभाईंनी औषधोपचार घ्यावा, असा त्यांना आग्रह केला. सुप्रसिद्ध डॉक्टर कानुगा यांनी प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून औषधे व इंजेक्शन्स घेण्याचा आग्रह केला. गांधींनी तो नाकारला. एके दिवशी रात्री या दीर्घ आजारात गांधींना वाटू लागले, की आपली अखेरची वेळ आली आहे. वल्लभभाईंनी पुन्हा डॉ. कानुगांना प्रकृती तपासण्यास बोलाविले, त्यांनी नाडी तपासली. डॉक्टर म्हणाले, तशी भीती नाही, अत्यंत अशक्ततेमुळे मात्र मज्जातंतू क्षीण झाले आहेत. शेवटी एकच उपाय उपयोगी पडला; सर्व शरीराला बर्फाचा लेप केला होता. गांधी या आजारातून बाहेर पडले. निसर्गोपचारावर त्यांची फार भिस्त. आश्रमात कोणी आजारी पडले, तरी उपवास व निसर्गोपचार यांवरच ते भर देत.
जर्मनांचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध १९१८ साली संपले; ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संपप्त झाले. ब्रिटिश सरकारने माँटेग्यू-चेम्सफर्ड समिती भारताच्या राजकीय हक्कांसंबंधी शिफारशी करण्याकरिता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदेमंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले; परंतु गव्हर्नरांचे व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकार कायम ठेवले. भारतात असंतोष पसरत होता. तो दाबून टाकण्याकरिता न्यायमूर्ती रौलट याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. ६ एप्रिल १९१९ रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली. पंजाब सरकारने त्यांना अटक करून परत मुंबईला पाठविले. देशभर हाहाकार उडाला. जालियनवाला हत्याकांडामुळे गांधींनी सुरू केलेला सत्याग्रह तात्पुरता तहकूब केला. काँग्रेसने पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, उमर सोमानी इत्यादिकांची पंजाबात अथवा अन्यत्र झालेल्या अत्याचारांच्या चौकशीकरिता १४ ऑक्टोबर १९२१ रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली पाच गोरे व तीन हिंदी गृहस्थ यांची समिती नेमली. या समितीपुढे सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून गांधींचीही साक्ष झाली. काँग्रेस समितीने असा निर्णय दिला, की लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हरताळ पाळण्यात आला होता. सत्याग्रहाची चळवळ हे सरकारविरुद्ध बंड होते; परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाले, अशी कबुली हंटर समितीने दिली. १९२० साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले; त्यात असहकारितेचे आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. खिलाफतीचे पुनरुज्जीवन करण्याची चळवळही याच चळवळीबरोबर उभारली. देशभर सभा, मिरवणुका, प्रभात फे ऱ्या निघू लागल्या. कायदेमंडळांवर देशातील शेकडो प्रतिनिधींनी बहिष्कार घातला. हजारो लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या. अनेक वकिलांनी व बॅरिस्टरांनी वकिलीची कामे सोडली. परदेशी मालावर व ब्रिटिश कापडावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन देशभर पसरले. राष्ट्रीय शिक्षणाच्या खाजगी संस्था स्थापण्यात आल्या. परंतु ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केली. लक्षावधी लोकांना कारावासात टाकले. गांधींनी या अनत्याचारी असहकारितेची शेवटची पायरी म्हणून सामुदायिक कायदेभंग व करबंदी करण्याच्या चळवळीचा संकल्प सोडला. बार्डोली तालुक्यात ही चळवळ सुरू करावयाचे ठरविले. गांधींनी बार्डोली येथेच आपला मुक्काम ठेवला. परंतु उत्तर प्रदेशात चौरीचौरा येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात पोलिसांची हत्या झाली. त्यामुळे गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बार्डोली येथे ११ व १२ फेब्रुवारी १९२२ रोजी बैठक बोलावून बार्डोलीचा सत्याग्रह तहकूब ठेवला. महात्मा गांधींना त्यानंतर १० मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले:ब्रिटिश राज्यपद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी बादशहाविरुद्ध अप्रीती उत्पन्न केली नाही, तर ब्रिटिशांच्या राज्यपद्धतीविषयी अप्रीती उत्पन्न केली आहे. अशी अप्रीती उत्पन्न करणे हे कर्तव्य व सद्गुणाचे दर्शन मी समजतो. न्यायाधीश ब्रुमफील्ड यांनी निकाल देताना सांगितले:तुमचे ध्येय उच्च व तुमचे वर्तन थोर साधूला शोभण्यासारखे आहे. परंतु तुमच्या सत्याग्रहाचा उद्देश उच्च व प्रयत्न अत्याचाराविरुद्ध असले तरीही अत्याचार घडले; म्हणून तुम्हास मोठ्या खेदाने मला शिक्षा सुनवावी लागत आहे. सहा वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा मी फर्मावितो. येरवडा जेलमध्ये गांधींना रवाना केले. तेथे १९२४ साली त्यांचा आंत्रपुच्छशोथ हा विकार बळावला; त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ५ फेब्रुवारीला त्यांना मुक्त करण्यात आले.
त्यानंतर गांधींनी
ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढा न करता, सामाजिक सुधारणांसारख्या विधायक कार्यक्रमास वाहून घेतले. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, विठ्ठलभाई पटेल इ. काँग्रेस नेत्यांनी स्वराज्य पक्ष
स्थापून कायदेमंडळात स्वराज्याच्या हक्कांकरिता झगडायचे ठरविले. हिंदु-मुस्लिम
ऐक्य, अस्पृश्यतानिवारण, खादीग्रामोद्योग, गावसफाई इ. कार्यक्रम गांधींनी हाती घेतले. गांधींनी देशभर
प्रवास करून प्रचार केला. राजगोपालाचारी, जवाहरलाल नेहरू हे गांधींच्याच विधायक कार्यक्रमात सहकार्य करू लागले आणि
गांधींच्या कार्यक्रमाचे ते समर्थक बनले. काँग्रेसमधील एम्. आर्. जयकर, न. चिं. केळकर, मदनमोहन मालवीय इ. मंडळी, मुसलमानांचे मन वळविणे अशक्य आहे, असे म्हणून हिंदू महासभेकडे वळली. काँग्रेसमधील अनेक
मुसलमान नेते, बॅ. जिना, सर अली इमाम यांनी डिसेंबर १९२५ मध्ये अलीगढ
येथे मुस्लिम लीगचे अधिवेशन भरवून मुसलमानांची फळी उभी केली.
भारतातील राजकीय असंतोष केंद्राच्या व प्रांतांच्या विधिमंडळांत शिरलेल्या स्वराज्य पक्षाच्या द्वारे वारंवार प्रकट होऊ लागला; हे पाहून नवे आंदोलन उद्भवण्याच्या अगोदरच राजकीय स्वयंनिर्णयाचे हक्क वाढवावे, म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरविले. ३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन आयोग मुंबई बंदरात उतरला. तेव्हापासून त्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. देशभर ब्रिटिशविरोधी निदर्शनांचे थैमान सुरू झाले. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. लाहोरला लाला लजपतराय व लखनौला जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठीहल्ला झाला. लाला लजपतराय या लाठीहल्ल्याने उत्पन्न झालेल्या दुखण्यातच कालवश झाले. भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले, हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर करण्याचे ठरविले. गांधी साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे समर्थक होते. या दोघांना त्यांनी आश्वासन दिले, की ३१ डिसेंबर १९२९ पर्यंत साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळाले नाही, तर मी संपूर्ण स्वातंत्र्यवाला होईन. त्याच सुमारास भगतसिंग इ. सशस्त्र क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झालेल्या गांधींच्या लक्षात आल्या. लॉर्ड आयर्विन यांच्या आगगाडीखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बाँबस्फोट झाला. भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले. ते टाळण्याकरिता गांधींनी १९३० साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. १२ मार्च १९३० रोजी सकाळी ६·३० वाजता साबरमती आश्रमातून गांधींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही; अशी प्रतिज्ञा करून समुद्र किना ऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता ७२ सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली. ६ एप्रिलला यात्रा संपली. गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ४ मे १९३० रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली; येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. २५ जानेवारी १९३१ रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली. गांधी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी सुरू होऊन ५ मार्च १९३१ रोजी ⇨गांधी–आयर्विन करार झाला.
भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडविण्याकरिता इंग्लंडमध्ये नोव्हेंबर १९३१ मध्ये भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिषद भरली. गांधी त्या परिषदेस उपस्थित राहिले. इंग्लंडमध्ये त्या वेळी कमरेला पंचा, अंगावर उबदार साधी शाल व पायात वहाणा असा त्यांचा पोषाख होता. गोलमेज परिषदेमध्ये भाषण करताना गांधींनी सांगितले, की ब्रिटिश प्रजाजन म्हणविण्यात मला एके काळी अभिमान वाटत होता; आता बंडखोर म्हणून घेणे मला जास्त आवडेल. हिंदू, मुसलमान, स्पृश्य व अस्पृश्य यांना विभक्त मतदार संघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये, त्याकरिता प्राण गेले तरी चालतील, असे गांधींनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. भारतात आल्यावर ३ जानेवारी १९३१ रोजी गांधींना अटक झाली. त्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्रबाबू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अन्सारी, आझाद, कस्तुरबा, कमला नेहरू इ. राष्ट्रीय नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. १८ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉ. भी. रा. ऊर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधींनी २० सप्टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉ. आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख २६ रोजी गांधींचा जीव वाचविण्याकरिता डॉ. आंबेडकरांनी तडजोड केली व येरवडा करार झाला. ८ मे १९३३ पासून त्यांनी पापाचे प्रायश्चित म्हणून २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. सरकारने त्यांची लगेच मुक्तता केली. १२ जुलै १९३३ रोजी गांधींनी सामुदायिक सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले; परंतु त्यांनी १९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी १९३४ मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक मेले, लाखो घरे जमीनदोस्त झाली. गांधींनी भूकंपग्रस्त भागात फिरून लोकांची सेवा केली. गांधींनी शेट जमनालाल बजाज या आपल्या एका थोर अनुयायाच्या सांगण्यावरून वर्धा येथील सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. तेथे ते अखेरपर्यंत राहिले आणि विधायक कार्यक्रमाला पुन्हा त्यांनी वाहून घेतले.
त्यांनी १९३८ मध्ये बंगालचा दौरा केला. बंगाल हे सशस्त्र क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते. शेकडो सशस्त्र क्रांतिकारक कारावासात खितपत पडले होते. त्यांना ब्रिटिश सत्ताधा ऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी बंधमुक्त केले.
प्रांतिक व केंद्रीय निवडणुकींत १९३७ मध्ये बंगाल व पंजाब सोडून बहुतेक प्रांतांमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली. सात प्रांतांमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळांचे राज्य झाले होते. दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. युद्धसहकार्य नाकारून गांधींच्या सल्ल्याप्रमाणे या काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. बॅ. जिनांच्या सल्ल्यानुसार मुस्लिम लीगने काँग्रेस मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यामुळे देशभर मुक्तिदिन साजरा केला. १९४१ च्या एप्रिलमध्ये गांधींनी पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. भारतात शांतता नांदावी व युद्धप्रयत्नाससाहाय्य व्हावे, म्हणून ११ मार्च रोजी भारताला स्वराज्याचे हक्क युद्ध संपल्याबरोबर द्यावेत असे चर्चिल यांच्या मंत्रिमंडळांने ठरवून सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांचा आयोग भारताकडे पाठविला. गांधीप्रभृती नेते आणि क्रिप्स यांच्यात वाटाघाटी झाल्या; परंतु त्या अखेर फिसकटल्या. याचे कारण गांधींना युद्धसहकार्य करायचे नव्हते. गांधींनी ब्रिटिशांना विरोध न करण्याचे युद्धारंभीचे धोरण नंतर बदलले होते. म्हणून त्या वेळचे व्हाइसरॉय वेव्हेल यांनी गांधी शब्दाचे पक्के नव्हते, अशा अर्थाचे विधान या संदर्भात केले असावे. गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलाविली. त्या बैठकीत त्यांनी भारत स्वतंत्र झाला आहे, असा निर्णय जाहीर केला आणि छोडो भारत आंदोलन देशभर सुरू केले. गांधींनी लोकांना सांगितले, की करा किंवा मरा. ९ ऑगस्ट रोजी गांधींसह शेकडो नेत्यांची धरपकड झाली आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. गांधींना पुणे येथील आगाखान बंगल्यात स्थानबद्ध केले. त्यांच्याजवळ कस्तुरबा, महादेव देसाई, डॉ. गिल्डर, डॉ. सुशील नायर, सरोजिनी नायडू इत्यादींना ठेवले. महादेव देसाई हे गांधींचे चिटणीस. त्यांना तेथेच मृत्यू आला. गांधींच्या पत्नी कस्तुरबा ह्या हृदयविकाराने आजारी होत्या. २२ फेब्रुवारी १९४३ रोजी त्यांना मृत्यू आला. या अत्यंत प्रियजनांचा वियोग गांधींनी मोठ्या धैर्याने सहन केला. कस्तुरबांनी गांधींबरोबर मोठ्या निष्ठेने आदर्श पतिव्रता म्हणून जीवन व्यतीत केले. ६ मे १९४४ साली गांधीजींची बिनशर्त मुक्तता झाली. २ ऑक्टोबर १९४४ रोजी एक कोटी बारा लाखांचा कस्तुरबा निधी सेवाग्राम येथे गांधींच्या स्वाधीन करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीचे जवाहरलाल नेहरूप्रभृती सभासद व अन्य नेते यांची जून १९४५ मध्ये कारागृहातून मुक्तता झाली. १९४६ मध्ये इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ अॅटली यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले. त्यांनी मे १९४६ मध्ये भारताच्या स्वराज्याची योजना तयार केली. संविधान परिषद व हंगामी राष्ट्रीय मंत्रिमंडळ बनविण्याचा अधिकार भारताला त्या योजनेप्रमाणे मिळाला. २९ जुलै १९४६ रोजी मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीकरिता आंदोलन उभारले. भारताची फाळणी अपरिहार्य झाली. गांधींना ती मुळीच मान्य नव्हती. एक वेळ माझ्या देहाचे दोन तुकडे पडले तरी चालेल, पण भारताची फाळणी मी होऊ देणार नाही, असे गांधींनी जाहीर केले. परंतु ३ जून १९४७ रोजी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इ. नेत्यांनी भारताची फाळणी मान्य केली. या सुमारास हिंदु-मुसलमानांचे यादवी युद्ध देशभर पेटले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे स्वातंत्र्य जाहीर झाले. हिंदु-मुसलमानांच्या भयंकर कत्तली चालूच होत्या. गांधींनी दिल्लीतील वातावरण शांत होईपर्यंत उपोषण करण्याचे जाहीर केले. १३ जानेवारी १९४८ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. भारत सरकारने पाकिस्तानचे ५५ कोट रु. परत करावे, अशी गांधींची मागणी होती. ही मागणी वल्लभभाई प्रभृती नेत्यांना मान्य नव्हती; परंतु गांधींचा जीव वाचविण्याकरिता ती अखेर मान्य करावी लागली. १६ जानेवारी रोजी गांधींनी उपोषण सोडले.
३० जानेवारी १९४८चा दिवस उजाडला. काँग्रेसने सत्तेचा स्वीकार न करता जनतेच्या दारिद्याचे प्रश्न सोडवावेत, विधायक कार्यक्रमाला वाहून घ्यावे, म्हणून लोकसेवक संघ योजना गांधींनी तयार केली. ग्रामराज्य हा भारतीय स्वराज्याचा पाया बनावा, असे भारताच्या संविधानाचे तत्त्व तीत समाविष्ट केले. राष्ट्रीय मंत्रिमंडळात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात तीव्र मतभेद उद्भवले होते. गांधीजींनी सरदारांना पटविले, की ही फूट देशास अहितकारक आहे. संध्याकाळी पाच वाजले. बिर्ला भवनमधून गांधी प्रार्थनास्थानाकडे जावयास निघाले. प्रार्थनास्थानाकडे जातानाच पुण्याचे नथुराम गोडसे हे नारायण आपटे या साथीदारासह त्या प्रार्थनेच्या सभेत शिरले. गांधींच्या जवळ जाऊन प्रणाम करून नथुराम गोडसे यांनी गांधींच्या अंगावर गोळ्या झाडल्या. गांधी ‘हे राम’ म्हणत धरणीवर पडले आणि गतप्राण झाले. भारतीय जनता दुःखसागरात बुडाली. जगातील मोठमोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, विज्ञानवेत्ते, कलाकार दुःखाने व्यथित झाले. सर्वश्रेष्ठ विज्ञानवेत्ते अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ही वार्ता कळल्याबरोबर उद्गार काढले, की असा महान माणूस या भूतलावर वावरत होता, याचेच आश्चर्य वाटते. अनेक तत्त्ववेत्त्यांनी म्हटले, की मानव जातीला पापातून मुक्त करणारा व शांततेचे मानवी विश्व भविष्यकाली निर्माण होईल, अशी आशा निर्माण करणारा हा माणूस होता. ‘राष्ट्रपिता’ म्हणून सर्वश्रेष्ठ अद्वितीय बहुमान गांधींना प्राप्त झाला.
वृत्तपत्रकार गांधी : गांधींनी आपल्या राजकीय विचारसरणीचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याकरिता ७ एप्रिल १९१९ पासून सत्याग्रही ह्या संपादकीय नावाखाली सत्याग्रह नावाचे साप्ताहिक सरकारी परवान्याशिवाय प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. मुंबईस बॉम्बे क्रॉनिकल नावाचे दैनिक बी. जी. हर्निमन यांनी चालविले होते. गांधींनी त्याचे संपादक व्हावे, अशी त्यांना विनंती करण्यात आली. गांधींनी नाखुषीने कबुली दिली; परंतु सरकारने ते दैनिक प्रकाशित करण्यास मनाई केली, हुकूम सोडला. गांधीजींच्या ते पथ्यावर पडले.काही गुजराती मंडळींनी यंग इंडिया हे नियतकालिक सुरू केले होते. त्याचे संपादक व्हावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. यंग इंडिया (इंग्रजी) व नवजीवन (गुजराती) ही नियतकालिके १९१९ पासून गांधीजींच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होऊ लागली. नवा विचार, नवी भाषा, नवी वृत्तपत्रपद्धती आणि कसल्याही जाहिराती नसणे, ही या नियतकालिकांची वैशिष्ट्ये होती. ना फायदा ना तोटा या पद्धतीने ही प्रकाशने चालू राहिली. चरखा व स्वदेशी, हरिजन सेवा, सत्याग्रहाचे व असहकारितेचे आंदोलन, आध्यात्मिक जीवनपद्धती, अहिंसेचा महिमा, ग्रामोद्योग, हिंदु-मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यतानिवारण इ. विषयांवर सुंदर इंग्रजीत व गुजरातीमध्ये लेखन प्रसिद्ध होऊ लागले. गांधींच्या शैलीतून वाचकांना विलक्षण प्रेरणा मिळत होती. ११ फेब्रुवारी १९३३ रोजी हरिजन (इंग्रजी) साप्ताहिक गांधींनी सुरू केले. त्या वेळी ते येरवडा तुरूंगात होते. हरिजनची हिंदी आवृत्तीही निघू लागली. यंग इंडिया बंद झाला होता. ८ ऑगस्ट १९४२ च्या चळवळीत गांधींना अटक झाल्यावर हरिजन वृत्तपत्रही बंद पडले. १० फेब्रुवारी १९४६ रोजी पुन्हा त्याचे प्रकाशन सुरू झाले. गांधीनिधानानंतर १५ फेब्रुवारी १९४८ रोजी हरिजन पत्रही प्रकाशित होण्याचे बंद पडले.
साहित्यिक गांधी : उत्कट कथनेच्छा हा गांधीजींच्या गुजराती व इंग्रजी लेखनाचा प्रमुख हेतू असल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत प्रभावी, हृदयस्पर्शी आणि साहित्यगुणांनी युक्त ठरले आहे. साहित्यात भाषेची स्वाभाविकता व हृदयाचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी बाराव्या गुजराती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले. सत्यना प्रयोगो अथवा आत्मकथा (१९२७) हे त्यांचे विश्वविख्यात आत्मचरित्र म्हणजे आत्मचरित्रलेखनाचा एक चांगला नमुना होय. ह्या आत्मचरित्राची आजवर अनेक देशी आणि विदेशी भाषांत भाषांतरे झालेली आहेत. गुजराती गद्याला त्यामुळे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. गुजराती भाषेचा पहिला प्रमाणभूत शब्दकोश (जोडणीकोश ) तयार करून त्यानी अशुद्ध लेखनाच्या अराजकतेपासून गुजराती भाषेला वाचविले. इतकेच नव्हे, तर गुजराती भाषा-साहित्याचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या सहका ऱ्यांच्या मदतीने अहमदाबाद येथे गुजरात राष्ट्रीय विद्यापीठाचीही स्थापना केली (१९२०). गांधीजींचा गुजराती भाषा-साहित्यावरील प्रभाव फार मोठा आहे आणि त्यामुळेच गुजराती साहित्याच्या इतिहासात ‘गांधी युग’ असा स्वतंत्र कालखंड मानला जातो. काकासाहेब कालेलकर, महादेवभाई देसाई, किशोरीलाल मश्रुवाला इ. थोर साहित्यिक त्यांच्या प्रभावातूनच निर्माण झाले. गांधीजींनी जीवनाभिमुख साहित्याचा आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी प्रभावित होऊन सुंदरम्, उमाशंकर जोशी, मेघाणी, धूमकेतू, रमणलाल देसाई इ. साहित्यिकांनी कथा, काव्य, कादंबरी इ. प्रकारांतील उत्तम साहित्यनिर्मिती करून ह्या मूल्यांचे संवर्धन केले.
गांधीजींनी नियतकालिकांतून केलेले वैचारिक लेखन प्रासंगिक असून ते धर्म, नीती, समाज, शिक्षण, राजकारण, अर्थशास्त्र, आरोग्य इ. विषयांवर आहे. त्यांचा पत्रव्यवहारही विस्तृत व विविधविषयस्पर्शी आहे. त्यांचे हे सर्व लेखन व पत्रव्यवहार मंगल प्रभात (१९३०), धर्ममंथन, बापूना पत्रो (११ भागांत, १९४९ ते १९७२) इ. ग्रंथांतून संगृहीत आहे. त्यांच्या लेखांतील व पत्रांतील भाषा साधी, सरळ व स्वाभाविक आहे. सर्वसामान्य माणसालाही आपला आशय स्पष्ट व्हावयास हवा, असा त्यांचा कटाक्ष व आग्रह असे.
त्यांचे महत्त्वाचे इतर ग्रंथ दक्षिण आफ्रिकाना सत्याग्रहनो इतिहास (१९२४), नातिनाशने मार्गे (१९२७), त्यागमूर्ति अने बीजा लेखो (१९३०), गांधीजीनी आखरी हाकल (१९४२), आरोग्यनी चावी (१९४८), मूरखराज (१९६४) हे होत.
गांधीवाद : गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र विचारपद्धती आहे. ही विचारपद्धती अध्यात्मवादावर आधारलेली आहे. किंबहुना तो विशिष्ट प्रकारचा अध्यात्मवाद आहे. गांधीवाद म्हणून काही नाही, ती एक जीवनपद्धती आहे, असे अनेक गांधीवाद म्हणत असले किंवा गांधींनीही तसे म्हटले असले, तरी गांधींनी विपुल लेखनामध्ये प्रतिपादिलेली ती एक स्वतंत्र विचारसरणी आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. तिचा प्रभावही आधुनिक जगाच्या सामाजिक व राजकीय विचारसरणींवर पडल्याशिवाय राहिलेला नाही.
गांधी स्वतः मनाने पक्के हिंदू होते, तरी तत्त्वतः धर्मदृष्ट्या जगातील प्रसिद्ध धर्मांमध्ये मूलभूत ऐक्य आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि जगातील सर्व धर्मांना व्यापणारे रहस्य आपणाला प्राप्त झाले आहे, अशी त्यांची भावना होती.
सर्वच धर्मग्रंथांचे प्रामाण्य एका अर्थी त्यांनी मानले आहे; परंतु शब्दशः प्रामाण्य त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते, सर्वच धर्मग्रंथ मानवप्रणीत—ऋषी, प्रेषित, संत इत्यादिकांनी निर्मिलेले—असल्यामुळे मानवाच्या स्वाभाविक मर्यादा व दोष धर्मग्रंथांमध्येही शिरलेले असतात. म्हणून गांधींनी ग्रंथांचे काही तात्त्विक निष्कर्ष काढले आहेत. ते काढीत असताना हिंदू धर्मातील विचारांची तात्त्विक पार्श्वभूमी त्यांनी स्पष्टपणे गृहीत धरली आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच नैतिक नियम त्यांच्या विचारसरणीचा पाया आहेत. उपनिषदे व गीता यांमधील ईश्वरविषयक सिद्धांत या मूलभूत नैतिक नियमांचा आधार त्यांनी मानला आहे.
गांधीवाद हा धार्मिक मानवतावाद आहे. नीतिशास्त्र, समाजरचना व राजनीती यांस आधारभूत अशी नैतिक दृष्टी या मानवतावादामध्ये स्वीकारलेली दिसते. ईश्वरनिष्ठा ही मूलभूत आहे. ईश्वर म्हणजेच सत्य व सत्य म्हणजेच ईश्वर, असे गूढवादी समीकरण गांधींनी मांडले आहे. ईश्वर हेच सत्य, हा उपनिषदांचा व अद्वैत वेदान्ताचा सिद्धांत आहे. सृष्टीचे वैज्ञानिक पद्धतीने शोधलेले सत्य, असा त्या सत्याचा अर्थ नाही; उच्च नैतिक नियम असा या सत्याचा अर्थ दिसतो. म्हणून ‘सत्याचा प्रयोग’ या शब्दावलीने सूचित केलेली वैज्ञानिक पद्धती ही आलंकारिक अर्थानेच घ्यावयाची आहे.
या संदर्भात मुद्दा उपस्थित होतो, की सत्यसंशोधनास अंत नसतो. कारण माणसास सत्य पूर्णपणे सापडत नसते; सर्वज्ञ कोणी नसतो. म्हणून लोकशाहीत विचारस्वातंत्र्य व प्रचारस्वातंत्र्य हा मूलभूत मानवी हक्क मानला आहे. परंतु विचारांच्या प्रचारस्वातंत्र्याचा हा मूलभूत हक्क सत्यसंशोधनार्थ आवश्यक आहे, हा सिद्धांत गांधीजींनी कोठेही प्रतिपादिलेला आढळत नाही. याचे कारण असे दिसते, की गांधी बुद्धिवादापेक्षा आतल्या आवाजालाच प्राधान्य देत होते.
गांधी म्हणतात, की ईश्वर हा स्वतःसिद्ध, स्वयंप्रकाश व इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या पलीकडचा असल्यामुळे, बुद्धिवादाच्या कसोट्या त्याला लागू पडत नाहीत. तो अनुभवसिद्ध आहे. हा अनुभव तपश्चर्येने व वैराग्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे, त्यांना म्हणजे तुलसीदास, चैतन्य, रामदास, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांना येतो. ईश्वर हा सर्वांचा अंतरात्मा आहे. जीवात्मा त्याचा अंश आहे. अहंकाराचा त्याग केला, स्वतःला शून्य केले की तोच राहतो. ईश्वर हाच सत्य असल्यामुळे अन्य जग मिथ्या आहे. सर्व प्राण्यांमध्ये एकच प्राण किंवा जीव आहे व तोच ईश्वर होय. विश्व ही त्याची लीला आहे. तो प्रकाश म्हणजे चैतन्य आहे व तोच अनंतानंद आहे.
ईश्वर सत्य आहे म्हणजे काय, तर तो विश्वाच्या उत्पत्तिस्थितिसंहारांची नियामक शक्ती आहे; ही नियामक शक्ती ही नैतिक शक्ती आहे. आई, बाप, कन्या, पुत्र, बंधू, मित्र यांच्यातील प्रेम एकमेकांचे संरक्षण करते. कुटुंब, राष्ट्र, मानवजात, जीवसृष्टी व वस्तुमात्र यांना एकत्र करणारी शक्ती म्हणजे प्रेम होय. परमेश्वर प्रेमरूप आहे. आस्तिक व नास्तिक हे सर्व सत्याचे उपासक बनतात, तेव्हा ते ईश्वर उपासकच बनतात. जो नास्तिक ईश्वर नाही, असे म्हणतो, परंतु सत्याचे परिपालन करतो, त्याला सत्याचे आकर्षण असते; म्हणून तोसुद्धा एका अर्थी ईश्वराचे अस्तित्व मान्यच करतो. शत्रूवरही प्रेम केले, तर तो मित्र बनल्याशिवाय राहत नाही. कारण शत्रूच्या हृदयात परमेश्वराचा प्रकाश म्हणजे प्रेम आहेच. शत्रू जर मित्र बनला नाही, तर आपल्या तपश्चर्येत काही तरी उणीव आहे असे मानावे. ईश्वराने जगात पापाला अवसर दिला आहे; त्यातून भक्तीने उत्तीर्ण होता येते. भक्ती व प्रार्थना खरी असली पाहिजे. भक्ती ही नैतिक शक्तीची भक्ती असते. प्रार्थना उत्कट असल्यास व चित्त शुद्ध असल्यास परमेश्वराचा म्हणजे अंतरात्म्याचा आवाज ऐकू येतो व तो सत्याचा मार्ग दाखवितो. गांधींनी याच दृष्टीने आत्मचरित्राला सत्याचे प्रयोग असे नाव दिले आहे. ईश्वररूप सत्य गवसण्याकरिता फार मोठे प्रयत्न करावे लागतात; त्याकरिता इंद्रियसंयम करावा लागतो; अहिंसेची दीक्षा घ्यावी लागते. कारण अहिंसा हे सत्याचे साधन आहे. संपूर्ण अहिंसा ही सत्याच्याच कलदार नाण्याची दुसरी बाजू आहे. अहिंसा म्हणजे प्रेम होय.
अहिंसा हा आपल्या मानववंशाचा जीवनधर्म आहे. मानवसमाजाचे अस्तित्व अहिंसेवर आधारलेले आहे. शरीर आणि हिंसा यांचा नित्य संबंध आहे; हा एक बंध आहे; या बंधातून मुक्त होण्याचा मार्ग अहिंसा हा होय. शरीर असेपर्यंत कमीत कमी हिंसा म्हणजे अहिंसा असा अर्थ करावा लागतो. शरीरावर जितकी आसक्ती तितकी हिंसा अधिक. म्हणून शरीरावरची आसक्ती कमी केली पाहिजे. शरीरावरील आसक्ती कमी केल्याने म्हणजे तपश्चर्येने, संयमाने आत्मशक्ती वाढते, प्रकट होते. सर्वच प्राणिवर्ग अहिंस्य आहे. परंतु मानववंश श्रेष्ठ असल्यामुळे इतर प्राण्यांना वाचविण्याकरिता मानवाची हत्या होता कामा नये. मुंग्या, माकडे, कुत्री इ. इतर प्राण्यांना अन्न देणे, हे युक्त नाही असे एके ठिकाणी गांधी म्हणतात. परंतु याच्या उलटही त्यांची अनेक विधाने सापडतात. मांसाहार वर्ज्य करावा, हे हिंदुधर्मातील अहिंसेचे उत्कृष्ट प्रत्यंतर आहे, असे ते म्हणतात. गायीचा जीव वाचविण्याकरिता प्राणार्पण करणे, याचीही ते प्रशंसा करतात. गाय दयेचे काव्य आहे; तिची मी पूजा करतो; हिंदुधर्मातील गोपूजा, वृक्षपूजा हे अहिंसेचेच प्रत्यंतर आहे; असे गांधी म्हणतात.
अहिंसेचा व सत्याचा हा सिद्धांत गांधींनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या निष्ठेने आणला. त्याला ते सत्याग्रह असे म्हणतात. शुद्ध साध्याकरिता शुद्ध साधनेच उपयोगी पडतात; शुद्ध साध्याकरिता अशुद्ध साधने वापरल्यास साध्यही अशुद्ध बनते; साध्य दूर जाते; सत्याग्रहच शुद्ध साधन होय. सत्याग्रह म्हणजे सत्याकरिता अहिंसेच्या मार्गाने असत्याचा प्रतिकार करणे. ज्या व्यक्तींच्या ठिकाणी नैतिक दृष्ट्या अयोग्य व गर्ह्य परिस्थितींचा प्रतिकार करण्याची शक्ती असते, म्हणजे आत्मशक्ती प्रकट झालेली असते, तेच सत्याग्रहाचे अधिकारी होत. त्यांची शरीरक्लेश सहन करण्याची शक्ती हा आत्मशक्तीचा एक भाग आहे. कित्येक वेळा शरीरक्लेश सहन करून प्रतिकार करणारा प्रतिपक्षावर जबरदस्तीही करू शकतो. त्याचा आग्रह अविवेकीही असू शकतो. त्याची सत्याची कल्पना चुकीचीही असू शकते. त्यात असत्यही भरलेले असण्याची शक्यता असते. म्हणून खऱ्यासत्याग्रहीला नैतिक दृष्ट्या अयोग्य काय व योग्य काय हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पतकरावी लागते आणि आपल्या प्रतिकाराच्या उद्देशात असत्य दिसल्यास माघार घेण्याची तयारीही असावी लागते. माघार घेण्याकरितासुद्धा धैर्य लागते. निःशस्त्र प्रतिकारसुद्धा हिंसात्मक म्हणजे जबरदस्ती करणारा असतो. त्यात अत्याचारही असतो. सत्य हे तत्त्वतः शत्रूलाही मान्य असावे लागते. कारण विवेकबुद्धीची देणगी मानवाला प्राप्त झालेली आहे.
मनुष्य ही ईश्वराने घडविलेली स्वतःची प्रतिमा आहे, हे ख्रिस्ती तत्त्व गांधींनी मान्य केले आहे. जीवात्मा हा परमेश्वराचा अंश आहे, याची जाणीव अस्पष्टपणे माणसाला असतेच, असा हिंदुधर्माचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत व ख्रिस्ती सिद्धांत यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंगती आहे. मानवाची सेवा हीच ईश्वराची पूजा होय, असा निष्कर्ष गांधींनी ख्रिस्ती धर्माच्या चिंतनातून काढला आहे.
युद्ध वा मानवी हिंसेचे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रकार अहिंसेच्या तत्त्वाप्रमाणे बंद व्हावयास पाहिजेत, हे जरी खरे असले, तरी आजची जागतिक राजकीय परिस्थिती व सत्तेचे राजकारण लक्षात घेता, संरक्षण संस्था वा सैनिकशक्तीची संस्था ही आज तरी अपरिहार्य आहे, असे गांधींनी मान्य केले आहे. परंतु मानव हा बुद्धियुक्त प्राणी असल्यामुळे मानवामानवांमधील हिंसा बंद करणे हे मानवी कर्तव्य आहे, असे ते मानतात. अहिंसा हा ढोंगी दुर्बलाचा सिद्धांत नाही. ढोंगी, भित्रा मनुष्य व शस्त्राने प्रतिकार करणारा शूर मनुष्य यांच्यात सशस्त्र शूर, गांधींनी पसंत केला आहे. सबलाची अहिंसा हीच खरी अहिंसा होय, असे त्यांनी वारंवार प्रतिपादिले आहे.
गांधींचा ब्रह्मचर्याचा सिद्धांत, हा अहिंसेचाच उपसिद्धांत आहे. इंद्रियांवर, संभोगावर विजय मिळविल्याशिवाय निःस्वार्थता प्राप्त होत नाही. निःस्वार्थता असेल, तरच अहिंसा साधते. स्त्री-पुरुषांचे मैथुन हे तत्त्वतः वर्ज्यच असले पाहिजे. प्रजोत्पादनाकरिता मैथुन आवश्यक आहे; परंतु तेही टाळणे शक्य असल्यास ते टाळावे. पुष्कळ वेळा पुरुषाने केलेला संभोग ही स्त्रीवर केलेली जबरदस्ती असते, अशी गांधींची समजूत आहे. याविरुद्धही गांधींजी एके ठिकाणी लिहितात, की स्त्री-पुरुषांचे लैंगिक आकर्षण हे महनीय आहे. संतती सृष्टीमध्ये सतत आवश्यक आहे; कारण परमेश्वराच्या लीलेचा तो भाग आहे. सृष्टी ही परमेश्वराची लीला आहे; परंतु स्त्री-पुरुष संभोग ह्या अपवित्र क्रिया आहेत, अशाच प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांची अशी समजूत दिसते, की स्त्री-पुरुष संभोगात मानवी सामर्थ्याचा अपव्यय होतो; मग तो संभोग विवाहित स्त्री-पुरुषांचा असो अथवा अविवाहितांचा असो. वैवाहिक संभोग ही पापावर घातलेली मर्यादा आहे. तेही पापच आहे. कारण त्याच्या योगाने मनुष्याचा शक्तिपात होतो. हा योगशास्त्रातील ब्रह्मचर्यविषयक सिद्धांत आहे; परंतु तो जीवविज्ञानाच्या दृष्टीने चुकीचा सिद्धांत आहे. कारण संभोगात होणारा वीर्यपात हा मर्यादित प्रमाणात होत असला, तर त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक सामर्थ्य घटत नाही, उलट वाढते. गांधींचा याबद्दलचा दृष्टिकोन मानवी जीवविज्ञानदृष्ट्या नीट तपासला गेला नाही. एवढे मात्र खरे, की वैवाहिक संबंधातून कुटुंबसंस्था निर्माण होते, त्यामुळे आप्तसंबंध तयार होतो व मर्यादित प्रेम उत्कट होते. सर्व मानवच आप्त आहेत, असा गांधींचा दृष्टिकोन आहे. नैसर्गिक आप्तसंबंधाने मर्यादित न होणारे प्रेम हे संन्यासाशिवाय कोणालाच शक्य नाही, म्हणून गांधी-सिद्धांत हा संन्याससिद्धांताचाच एक उपसिद्धांत आहे, असे मानावे लागते. ब्रह्मचर्य हे ईश्वरप्राप्त्यर्थ आवश्यक आहे; हाही गांधींचा विचार ह्या संन्यासमार्गाचाच भाग आहे.
सत्य व अहिंसा या दोन नैतिक तत्त्वांवर आधारलेला रस्किनच्या पुस्तकावरून सुचलेला गांधींचा सर्वोदयवाद हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक तत्त्वज्ञान आहे. समाजाचा आध्यात्मिक विकासवाद गांधींनी मांडला आहे. म्हणजे व्यक्तीप्रमाणे समाजाचीही समाजिक व राजकीय प्रगती होत असते, असे सर्वोदयवादात गृहीत धरले आहे.आर्थिक समता मानवी ऐक्याच्या तत्त्वावर विकसित करणे, ही ऐतिहासिक प्रगतीची गरज आहे. सत्याग्रह हे त्याचे साधन आहे. दलित व पीडित वर्गाला समतेचा न्याय पहिल्यांदा मिळाला पाहिजे, याकरिता दलित व पीडित यांची सेवा केली पाहिजे व अन्यायाचा सत्याग्रहाच्या द्वारे प्रतिकार हा सतत चालला पाहिजे. विकास व क्रांतीचे प्रयत्न निसर्गाप्रमाणे समाजातही चालणार. भूकंप, वादळी उलथापालथ ही निसर्गात चालते, तशी समाजातही चालणारच. प्रगतीला तिची कित्येक वेळा आवश्यकता असते. परंतु शांततापूर्ण मार्गाने सामाजिक विकास घडवून आणणे यावरच गांधींचा मुख्यतः भर आहे.
गांधी हे मूळचे वर्णाश्रमसंस्थेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी जातिभेदाचेही समर्थन संयमाच्या तत्त्वानुसार केले आहे. स्वजातीमध्येच लग्न करणे व स्वजातीचेच अन्नग्रहण करणे, यांत लैंगिक व रसनेचा संयम हे तत्त्व आहे, असे त्यांनी प्रतिपादिले आहे. परंतु १९३६-३७ च्या सुमारास गांधींनी वर्णाश्रमाचे आपले भाष्य बंद केले; साम्यवाद व समाजवाद यांचा नवीन पिढीमध्ये प्रसार होत आहे, हे पाहून त्यांनी अध्यात्मवादावर आधारलेल्या आर्थिक व सामाजिक समतावादाचा पुरस्कार सुरू केला. सामाजिक उच्चनीचभाव व हिंदूंची अस्पृश्यतेची संस्था हे सर्वोदयवादाशी विरुद्ध आहेत, म्हणून उच्चनीचभाव व अस्पृश्यता नष्ट करणे, ही गोष्ट सामाजिक प्रगतीची गरज आहे; असा विचार गांधींनी मांडला आहे.
गांधींचे अर्थकारण : विशिष्ट नैतिक ध्येयवादास अनुसरून आर्थिक व्यवहार कसे चालावेत, यासंबंधी भारताच्या व जगाच्या आर्थिक व्यवस्थेबद्दलचे गांधींचे धोरण हे त्यांचे अर्थकारण. अर्थशास्त्र आर्थिक व्यवहारांचे नियम सांगणारे शास्त्र होय. तसे अर्थशास्त्र गांधींनी किंवा गांधींवाद्यांनी सांगितलेले नाही. कार्ल मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादानुसारे मानवी आर्थिक व्यवहारांचे ऐतिहासिक नियम आहेत. त्याप्रमाणे अपरिहार्य ऐतिहासिक परिणतीने साम्यवादाकडे जाणारे समाजवादी अर्थशास्त्र निष्पन्न होते. गांधी असा ऐतिहासिक परिणतिक्रम गृहीत धरून आपले अर्थशास्त्र सांगत नाहीत.
गांधींच्या आर्थिक धोरणाची मूलभूत तीन सूत्रे आहेत: (१) न संपणाऱ्या नैसर्गिक संपत्तीवर अधिक भर असलेली अर्थव्यवस्था चिरंतन असू शकते; अशी अर्थव्यवस्था अंमलात आणली पाहिजे. निसर्गसंपत्तीचे दोन वर्ग; एक संपणारा म्हणजे सर्व खनिजे; उदा., दगडी कोळसा, लोखंडादी धातू, खनिज तेले इत्यादी; व दुसरा न संपणारा म्हणजे माती, दगड, लाकूड, वनस्पती, धान्ये, फळे, फुले, पाणी, प्रकाश, उष्णता, वायू, प्राणी, जनावरे इत्यादी. (२) शरीरश्रमाचे महत्त्व असलेली अर्थव्यवस्था कार्यवाहीत आली पाहिजे. कर्मेद्रियांनी, विशेषतः हातापायांनी, कामे करण्यानेच मानव चांगला सशक्त, शरीराने आणि मानाने निरोगी व दीर्घायुषी राहू शकतो. (३) ज्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत व गरीब हा भेद जाचक स्वरूपात राहील, अशी अर्थव्यवस्था असता कामा नये. तत्त्वतः संपत्तीवर खाजगी मालकी कोणाचीच नसावी. शरीरश्रम करील, त्यालाच संपत्तीचा उपभोग घेण्याचा नैतिक दृष्ट्या हक्क आहे. श्रीमंत व गरीब या दोघांनाही असा हक्क आहे. परंतु आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याची बुद्धिमत्ता व कुशलता ज्या व्यक्तींच्या ठिकाणी वास करते, त्यांना औद्योगिक नेतृत्व लाभू शकते; त्यांना यासंबंधात संपूर्ण स्वातंत्र्य व अवसर मिळाला पाहिजे. हा औद्योगिक नेता मात्र मोठ्या संपत्तीचा मालक न राहता, तो समाजातर्फे त्या संपत्तीचा विश्वस्त बनलापाहिजे. विश्वस्त म्हणून राहण्यास व स्वतःचा मालकी हक्क सोडण्यास तो नाराज असल्यास, कायद्याने व लोकशाही पद्धतीने मालकवर्गांचा मालकी हक्क रद्द केला पाहिजे.
एकोणिसाव्या शतकातील यूरोपीय किंवा पश्चिमी क्रांतीत उत्पन्न झालेल्या सामाजिक अनिष्टांची प्रतिक्रिया म्हणून गांधींनी आपले निराळे आर्थिक धोरण, ती अनिष्टे टाळण्याकरिता प्रतिपादिले. औद्योगिक क्रांतीने शहरांची राक्षसी वाढ झाली, ग्रामीण जीवन विस्कळित झाले, रेल्वे वगैरे वेगवान साधनांनी रोगांचा फैलाव होऊ लागला, हस्तव्यवसाय बुडले, बेकारांची संख्या अनावरपणे वाढू लागली व भांडवलदारवर्ग मजुरांची पिळवणूक अधिकाअधिक करू लागला, त्यामुळे श्रीमंत व गरीब हा भेद अत्यंत तीव्र झाला. हस्तव्यवसाय सुटल्यामुळे माणसांचे आरोग्य बिघडू लागले. माणसांना आधिभौतिक भोग हेच मुख्य श्रेय वाटू लागले व समाधानी वृत्ती नष्ट होऊन माणूस यंत्रांचा दास झाला. औद्योगिक क्रांती झालेली राष्ट्रे मागासलेल्या राष्ट्रांवर साम्राज्य पसरवू लागली आणि मागासलेल्या राष्ट्रांची आर्थिक व सांस्कृतिक दुरवस्था वाढली, याची तीव्र जाणीव होऊन गांधींनी नवे आर्थिक धोरण सांगितले.
निसर्गातील जी संपत्ती माणसाला निरंतर प्रयत्न करून चिरंतन कालपर्यंत लाभेल, तिच्याच आधारावर उद्योग चालविले पाहिजेत. खनिज संपत्तीवर आधारलेले आधुनिक यांत्रिक उद्योग हे दुय्यम म्हणून अपरिहार्य असतील, तेवढे चालविणे हितावह होईल. परंतु मनुष्याच्या शरीरश्रमाची गरज संपली आहे, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. ग्रामसंस्था कायम टिकेल व शहरे वाढणार नाहीत अशी अर्थव्यवस्था पाहिजे; ती कुटिरोद्योगांवरच टिकू शकेल. औद्योगिक क्रांतीमुळे शहरांची भरमसाट वाढ होत आहे, ती थांबली पाहिजे. आधुनिक वैज्ञानिक शोधांवर आधारलेली आर्थिक क्रांती ही जगातील संपन्न राष्ट्रांची युद्धखोरी वाढवीत आहे. जगातील राष्ट्राराष्ट्रांमध्ये शांततेचे संबंध निर्माण करण्यास हा परिस्थिती प्रतिकूल आहे.
आजचे स्वतंत्र भारताचे अर्थकारण हे या गांधीवादी अर्थकारणातून दूर गेले आहे. ते ग्रामराज्य स्थापण्यास अनुकूल नाही. पश्चिमी समाजवादी व समाजवादी नसलेली राष्ट्रे ज्या प्रकारची अर्थव्यवस्था वाढवीत आहेत व दृढ करीत आहेत, त्याच प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा पाया स्वतंत्र भारतातही निर्माण होत आहे.
महात्मा गांधी व त्यांचे
सत्याग्रह
दक्षिण आफ्रीकेसारखी
दयनीय अवस्था भारताची होती. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी गांधीनी भारत
भ्रमण केले. तेव्हा त्यांचे असे मत होते कि स्वतंत्र हे आपणास स्वतःहून प्राप्त
होणार नाही. ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला ब्रिटीश शासनाविरोधात सत्याग्रहाचे
[१९१६] मध्ये शस्त्र हाती घेतले.
फिजी बेटावरील सत्याग्रह
हिंदुस्तानातील श्रमिकांना इंग्रज अधिकारी मुदतबंदीचे करार
करून फिजी बेटावर त्यांच्या शेतात काम करण्यासाठी
घेवून जात होते. इंग्रजांच्या शेतात काम करणाऱ्या त्या मजुरांना अतिशय गुलामासारखी वागणूक देत.
कोणत्याही गुलामगिरीची पद्धत हि कायद्यान्वये नष्ट केली जाईल असा विश्वास सरकारने
दिल्यानंतर त्याकडे सरकार हेतुपरस्पर दुर्लक्ष करीत होते. म गांधीनी फिजी बेटावरील पिळवणूक थांबवण्यासाठी
३१ मे १९१७ पासून सत्याग्रहाची चळवळ सुरु झाली.
चंपारण्य सत्याग्रह [१९१७]
बिहार राज्यामध्ये
चंपारण्यात इंग्रजांचे निळीचे मळे होते. या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजूर वर्गावर
मोठ्या प्रमाणावार अन्याय होत होता. व त्याच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतले
जात होते. गांधीनी चंपारण्यात पोलिसांना प्रवेश करण्यास ब्रिटीश पोलिसांना मनाई
करण्यात आली.
अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा संप [१९१८]
अहमदाबाद येथील गिरणीत काम करणाऱ्या मजुरावर गिरणीमालक
अन्याय. अत्याचार करून त्यांची पिळवणूक करीत होते. गिरणी मालकांच्या शोषानाविरुध आवाज उठवण्याची व
वेतनवाढीसाठी गांधीजीनी कापड गिरणी कामगारांना संघटीत केले. व १९१८ साली संप
पुकारला.
खेडा सत्याग्रह [१९१८]
गुजरात मधील खेडा या गावीही शेतकऱ्यांच्या प्रेरणेने सन
१९१८ मध्ये सत्याग्रह झाला.
रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह [१९१९]
रौलट कायदा पास करूनही इंग्रजांनी दडपशाहिचे धोरण पुढे
सातत्याने चालूच ठेवले होते. त्यामुळे या कायद्याविरोधात म गांधीनी ६ एप्रिल
१९१९ रोजी संपूर्ण देशात हरताळ पाळण्याचे आवाहन केले.
जलियांवाला बाग हत्याकांड (१३
एप्रिल १९१९ )
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील
राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी
हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र
लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश
होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला.
अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.
अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरीकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.
योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.
शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला.
खिलाफत चळवळ [१९१९]
तुर्कस्तानचा खलिफा हा सर्व मुस्लिमांचा
धर्मगुरू म्हणून ओळखला जातो. पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्कस्तानचे
इंग्रजांच्या विरोधात जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली. इंग्रजी सैन्यामध्ये
कित्येक मुस्लिम होते. ते तुर्कस्तानच्या विरोधात लढण्यास तयार नव्हते. या
परिस्थितीचा विचार करून इंग्रजांनी खलीफाला काही त्रास होणार नाही असे आश्वासन
दिले. परंतु इंग्रजांनी प्रत्यक्षात ते आश्वासन न पाळता खलीपाला काही त्रास होणार
नाही असे आश्वासन दिले होते. त्यामुळे इंग्रज तुर्की साम्राज्य नष्ट करतील अशी भीती
मुस्लिमांच्या मनात निर्माण झाली. परिणामी तुर्की साम्राज्य कायम ठेवण्यासाठी
मौलाना महामद्द अली व यांनी चळवळ सुरु केली. इंग्रजच्या विरोधात असलेल्या
मुस्लिमांचे स्वराज्य मिळवण्यासाठी सहकार्य घ्यावे असे म. गांधीनी व लाला लजपतराय
स्वराज्य मिळवण्यासाठी सहकार्य घ्यावे म्हणून २४ नोवेंबर १९१९ रोजी गांधीजी
यांच्या अध्यक्षेतेखाली अखिल भारतीय खिलापत कॉनफ़रन्स हि सभा स्थापन करण्यात आली.
असहकार चळवळ [१९२०]
सप्टेंबर १९२० मध्ये
कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात महात्मा गांधीनी असहकार चळवळीचा
ठराव मंजूर करून घेतला. सी. आर. दास व
बेझंट इत्यादी नेत्यांनी या चळवळीला विरोध केला. तरी या उठावावर सखोल चर्चा
झाल्यानंतर बहुमताच्या जोरावर असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला. हिंदी लोकांनी इंग्रज प्रशासनातील सर्व
नोकऱ्यांचा त्याग करावा. ब्रिटीश शासनाच्या प्रत्येक सभा, समारंभावर बहिष्करावर त्याग करावा. ब्रिटीश शाळांवर बहिष्कार टाकून आपसातील मतभेद
ग्रामसभेच्या माध्यमातून सोडवावे.
इंग्रजांच्या कायदेमंडळाच्या निवडनुकीवर बहिष्कार टाकावा. दैनंदिन उपभोगामध्ये
केवळ स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा.
प्रत्येकाने ब्रिटीश मालावर बहिष्कार टाकावा.
अपयशाची कारणे
संपूर्ण देशात जुलुमी इंग्रजांच्या विरोधात चालू असलेल्या या चळवळीमध्ये थोडीफार हिंसात्मक घटना घडणारच होती. त्याकडे गांधीजीनी दुर्लक्ष केले. व संपूर्ण अहिंसात्मक चळवळीची अपेक्षा केली. हिंदू - मुस्लिम एकतेसाठी गांधीजी भूमिका योग्य असली तरीही खिलाफत चळवळ हि धार्मिक तर असहकार चळवळ हि स्वराज्यासाठी होती. असहकार ठरावामध्ये मांडण्यात आलेल्या अटी व नियमांची सर्व नागरिकांनी अंमलबजावणी केली नाही. परदेशी माल विकत घेवून जाळून टाकणे किंवा त्या मालाची होळी करणे, यातून स्वराज्याचा उद्देश फारशा साध्य होऊ शकत नाही. चळवळ सुरु असताना राष्ट्रसभेतून प्रागतिक पक्ष नावाचा पक्ष बाहेर पडला होता.
चौराचौरा प्रकरण (असहकार चळवळीचा
शेवट)
असहकार चळवळीने पूर्ण
हिंदुस्तानात इंग्रजांच्या मनात धास्ती भरली होती. चळवळीचा कार्यक्रम सर्वत्र
जोमाने सुरु असताना उत्तर प्रदेशातील चौरीचोरा या ठिकाणी ५ फेब्रुवारी १९२२ रोजी
एक मिरवणुकीवर गोळीबार केला. संतप्त झालेल्या लोकांनी मात्र पोलिस कचेरीवर हल्ला
करून कचेरीस आग लावली. यावेळी जवळपास २३ पोलिस मारले गेले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने
गांधीजींनी चळवळ स्थगित केली. १० मार्च इ.स. १९२२मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या
आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. इ.स. १९२४
मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची
सुटका करण्यात आली.
स्वराज्य पक्ष
स्वराज्य पक्ष उदयाची कारणे
* म. गांधीचा चळवळ
तहकुबीचा आदेश
* सरकारची ताठर भूमिका
* राष्ट्रसभा व मुस्लिम
लीग यांच्यातील सहकार्याची समाप्ती
* गांधीजींची अनुपस्थिती
* चौकशी समितीचा निष्कर्ष
स्वराज्य पक्षाची स्थापना
मोन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अंतर्गत होऊ
घातलेल्या निवडनुकीवर बहिष्कार घालावा असे राष्ट्रसभेचे धोरण होते. परंतु हा
बहिष्कार घालण्याऐवजी कायदे मंडळात प्रवेश करून सरकारला सनदशीर मार्गाने विरोध
करावा असे काही नेत्यांना वाटत होते. त्यामुळे राष्ट्रसभेची फेरवादी नावाचा गट सी.
आर. दास. व मोतीलाल नेहरू यांच्या नियंत्रणाखाली स्थापन झाला. नाफेरवादी एक गट डॉ
राजेंद्रप्रसाद वाल्लभबाई पटेल यांच्या नियंत्रणाखाली तयार झाला. काँग्रेस पक्षाशी
एकनिष्ठ राहून तिच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना डिसेंबर १९२२ मध्ये
फेरवादी विचारवंतानी केली.
स्वराज्य पक्षाची उदिष्टे
आपल्या मताचा प्रसार करून असहकार चळवळीमुळे
लोकांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज दूर करून व निवडणुका लढवणे व कायदे मंडळाचे
सभासदत्व प्राप्त करणे. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्वराज्याची तळमळ कायम
ठेवून राष्ट्रीय चळवळीत प्रगती करणे आवश्यक होते. ब्रिटीश शासनाच्या दडपशाही
विरुद्ध आवाज उठवून हिंदुस्तानच्या घटनेत आवश्यक ते अनुकूल परिवर्तन घडवून आणणे.
देशातील सर्व हिंदू मुसलमानामध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे. ब्रिटीश शासनाची
हिंदुस्तानच्या बाबतीत असलेली ताठर भूमिका बदलून कल्याणकारी राज्य स्थापन करणे.
स्वराज्य पक्षाची कार्ये
* सरकारच्या धोरणावर
प्रहार
* चळवळीची जागृती
* चळवळीचे कार्यक्रम
* गोलमेज परिषदेची उभारणी
सायमन कमिशन [१९२७]
हिंदी लोकांना कशा सुधारणा हव्यात यासाठी सायमन
कमिशन नियुक्त केले होते. हे हिंदी लोकांसाठी आनंदाची गोष्ट होती, तरीदेखील कमिशनच्या विरोधात त्याचे कारण म्हणजे
सर्व सभासद इंग्रज होते. शिवाय स्वताच्या देशाची राज्यघटना ठरविण्याचा अधिकार
देखील इंग्रजांना हिंदी माणसापासून हिरावून घेतला होता. त्यामुळे संपूर्ण
हिंदुस्तांमध्ये सायमन परत जा, सायमन परत जा, अशा घोषणा केल्या गेल्या.
लाला लजपतराय हे त्याच्यात अग्रणी होते.
सायमन कमिशनच्या शिफारशी
सायमन कमिशने लगातार दोन वर्षाच्या कालावधीत
हिंदुस्तानासाठी कशी राज्यघटना असावी. या बाबतीत आपला रिपोर्ट तयार करून मे १९३०
मध्ये तो जाहीर करण्यात आला. प्रांतातील द्विदल राज्यपद्धती रद्द करून सर्व खाती
लोकप्रतिनिधीच्या ताब्यात द्यावीत. प्रत्येक खात्याचा मंत्री कायदेमंडळात जबाबदार
असून कायदा व सुव्यवस्थेचा जबाबदारीबद्दल गवर्नरकडे अधिकार असते. राज्यातील
अल्पसंखेतील हक्काचे रक्षण करण्यासठी गवर्नर कडे भरपूर अधिकार असावे. विशिष्ट
लोकांनाच मतदानाचा अधिकार देवून जातीपंथानुसार राखीव मतदारसंघ असावे. केंद्रीय
कायदे मंडळातील काही सभासद अप्रत्यक्ष निवडून द्यावे. हिंदुस्तानापासून मुंबई व
ब्रम्हदेश हे प्रदेश वेगळे करावे. केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या कमीत कमी
२०० जास्तीत जास्त २५० ठेवावी. सरकारी
कर्मचारी हे कायदेमंडळाचे सभासद नसावे. अल्पसंख्यांक मुस्लिमांना त्यांचे योग्य
प्रतिनिधित्व मिळावे. राज्यघटना हि लवचिक असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल
करण्याचा अधिकार ब्रिटीश सरकारला असावा.
नेहरू रिपोर्ट
राष्ट्र्सभा, मुस्लिम लीग, इतर राजकीय संघटनांनी सर्वपक्षीय बैठक १९ मे १९२८ रोजी
मुंबईत डॉ अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली. या बैठकीमध्ये मोतीलाल
नेहरू यांच्या समितीने देशातील सर्व राजकीय घटनांचा सविस्तर अभ्यास करून आपला
अहवाल तयार केला. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात.
नेहरू रिपोर्ट च्या शिफारशी
* हिंदुस्तानला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ताबडतोब मिळावे.
* हिंदुस्तानात संघराज्यात्मक शासन तयार करून घटक राज्यांना स्वायत्ता प्राप्त करून देणे.
* हिंदुस्तान हे निःधर्मीय राष्ट्र बनेल त्यासाठी जातीय मतदार संघाची आवश्यकता नाही.
* सिंध हा स्वतंत्र प्रदेश करून वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रदेशासारखा स्वतंत्र दर्जा द्यावा.
* संविधानामध्ये नागरिकांना मुलभूत अधिकार देवून त्याची स्वतंत्र यादी तयार करण्यात यावी.
* केंद्रीय कायदे मंडळाची दोन सभागृह असावी.
* गवर्नर जनरलने प्रधान मंत्र्याची नेमणूक करून त्याच्या सल्यानुसार इतर मंत्र्याची नेमणूक करावी.
* घटक राज्यांच्या गवर्नरची नेमणूक इंग्लंडच्या राजाकडून व्हावी व या गवर्नर मुख्य मंत्र्याची नेमणूक करून त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नेमणूक करावी.
* कायदे मंडळाची मुदत पाच वर्षाची असावी.
* गवर्नर जनरलने न्यायमंडळातील न्यायाधीशांच्या नेमणुका कराव्या व त्या न्यायाधीशाला दूर करण्याचा अधिकार केंद्रीय कायदे मंडळाला द्यावा.
जीना यांचे चौदा मुद्दे
नेहरू रिपोर्ट हा मुस्लिम लीगला मान्य नव्हता. त्यामुळे नेहरू रिपोर्ट चा फेरविचार करण्यासाठी आगाखान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर १९२८ मध्ये मुस्लिम लीगचे दिल्ली येथे अधिवेशन याच्या मध्ये मुस्लिम लीगच्या दिल्ली येथे अधिवेशन भरले व या अधिवेशनाचे जीनांनी मुस्लिम लीगच्या दृष्टीकोनातून पुढील १४ मुद्दे प्रसिद्ध केले ते पुढीलप्रमाणे आहेत.
जीना यांचे चौदा मुद्दे
* हिंदी राज्यघटना संघात्मक ठेवून प्रांताकडे शेषाधिकार असावे.
* देशातील सर्व घटक राज्यांना सारखेच स्वतंत्र प्राप्त व्हावे.
* सर्व कायदेमंडळात अल्पसंख्याकांना योग्य व परिणाम कारक प्रतिनिधित्व मिळावे.
* केंद्रीय कायदे मंडळात एकूण सभासदांच्या १३ प्रतिनिधी मुस्लिम असावे.
* स्वतंत्र मतदार संघ अस्तित्वात राहतील एखाद्या समाजाला स्वतंत्र मतदार संघाचा त्याग करायचा असेल तर करता येईल.
* बंगाल पंजाब वायव्य सरहद्द प्रदेशाची पुनर्रचना करीत असताना मुस्लिम मताधिक्य कमी येणार नाही याची काळजी घ्यावी.
* मुंबई प्रदेशापासून सिंध प्रदेश वेगळा करावा.
* सर्व समाजाला आपल्या धर्माचे आचरण करण्यास प्रचार आणि धार्मिक शिक्षण देण्यास पूर्ण स्वतंत्र राहील.
* वायव्य सरहद्द प्रदेशामध्ये आणि बलुचिस्तान या प्रदेशमध्ये इतर प्रांतासारखा राजकीय सुधारणा राबवाव्यात.
* स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनात मुस्लिमांना योग्य त्या नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात.
* कोणत्याही कायदे मंडळात समाजाविषयी ठराव पास होत असेल तर त्या ठरावाला त्या समाजातील ३४ सभासदांनी जर विरोध दर्शविला तर तो ठराव पास होऊ नये.
* मुस्लिमांनी संस्कृती, भाषा, शिक्षण संस्था इत्यादींना संरक्षण प्राप्त होण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.
* प्रत्येक प्रांताच्या मंत्रीमंडळामध्ये १३ मुस्लिम सदस्य असले पाहिजेत.
* केंद्रीय कायदे मंडळात बदल करायचा असेल तर त्यासाठी प्रांतीय कायदे मंडळाची समंती असावी.
गोलमेज परिषद
पहिली गोलमेज परिषद
इंग्लंड मध्ये पंत प्रधान मकडोनाल्ड यांच्या
अध्यक्षतेखाली नोवेंबर १९३० मध्ये पहिली गोलमेज परिषद भरविण्यात आली. या
परिषदेमध्ये एकूण ८९ प्रतिनिधी हे ब्रिटीश शासनातील हिंदुस्तानमधील सरकारने
नियुक्त केले होते. हिंदुस्तानात भावी ब्रिटीश काळात आणि हिंदुस्तान संस्थानिकांचे
संघराज्य स्थापन करावे. संघराज्याचे कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला काही
प्रमाणात जबाबदार राहील. घटक राज्यात स्वतःचा राज्यकारभार पाहण्याचा स्वतंत्र
अधिकार असावा.
दुसरी गोलमेज परिषद
१९३१ मध्ये गांधी आयर्विन
करारानंतर आयर्विन मायदेशी परतले. व पुढे राष्ट्र सभेने सरदार पटेल यांच्या
अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून
महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. या परिषदेमध्ये
हिंदुस्तानला तबडतोब वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी केली. गांधीना आपल्या
मायदेशी परतले व परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली. तेव्हा मात्र गांधीना अटक
करून तुरुंगात बंदिस्त केले.
तिसरी गोलमेज परिषद
राष्ट्र सभेने उभी केलेली सविनय कायदेभंगाची
चळवळ हळूहळू मंदावत जात होती. असे असले तरी इंग्रजांची दडपशाही हि सातत्याने चालूच
होती इंग्लंड मध्ये हुजूर पक्षाचे सरकार असून हे सरकार भारताला नवीन राज्यघटना
देण्याच्या विरोधात होते. भारतातील सरकारनिष्ठ ४६ प्रतिनिधी बोलावून १९३२ मध्ये
तिसरी गोलमेज परिषद घेतली. व घेतलेल्या निर्णयावर तिसऱ्या तिसऱ्या गोलमेज परिषद
घेतली व घेतलेल्या निर्णयावर तिसऱ्या गोलमेज चर्चा करण्यात. हा मसुदा म्हणजेच १९३५
सुधारणा कायदा होय.