प्रबोधन पर्व आणि सुधारणा चळवळी - Scholarship Exam

 

राजा राममोहन रॉय

 (२२ मे १७७२−२७ सप्टेंबर १८३३). आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. कृष्णचंद्र बंदोपाध्याय हे त्यांचे प्रतितामह बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते. नवाबाच्या दरबाराने ‘राय’ ही सन्मानदर्शक पदवी त्यांना दिली. त्यांचे पितामह ब्रजविनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली. रामकांत रॉय यांच्या कुळात वैष्णव संप्रदात होते. राममोहनांची माता तारिणीदेवी यांचे माहेर राममोहन रॉय याचे पिता आणि पितामह हे परमधार्मिक होते. घरात देवपूजा आणि भागवताचे पठण नित्य चालत होते. राममोहन यांचे बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीच झाले. वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फार्सी यांच्या शिक्षणासाठी गेले. कुराणाचाही त्यांनी अभ्यास केला. मुल्ला व मौलवी त्यांचा अरबी, फार्सी पांडित्याने विस्मित होत. इस्लाम धर्मातील आणि सूफी संप्रदायातील त्यांची पारंगतता पाहून मातापित्यांनी संस्कृत अध्ययनासाठी त्यांची वाराणसीला रवाना केले. श्रुतिस्मृती-पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास त्यांनी केला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले. त्या वेळी तुलमात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले, की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे. कारण एकच अद्वितीय परमेश्वर आहे. त्यांनी आपले मूर्तिपूजाविरोधी विचार आपल्या पित्याला व मातेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माता पिता आणि राममोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला. त्यांची मातापित्यावर श्रद्धा होती आणि विलक्षण भक्तीही होती. मतभेदामुळे राममोहन यांना घर सोडावे लागले. हिंदू समाज रचनेतील उच्चनीच जातिभेदही त्यांना अमान्य होता. त्यांनी भारतभर प्रवास केला. बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला; त्यासाठी तिबेटात गेले. तिबेटात प्रतिमापूजन, धर्मगुरुपूजन, मंत्रतंत्र व कर्मकांड या बाह्यांगांचा पसारा त्यांना दिसला. त्या कर्मकांडावर तेथील धर्मगुरूंशी त्यांनी वाद केले. तेथील बौद्ध लोक चिडले. राममोहनांना ठार मारण्याचाही प्रयत्न झाला. या वेळी सुदैवाने दयाळू स्त्रियांनी त्यांना प्राणसंकटातून वाचविले आणि स्वदेशी सुरक्षितपणे पोहोचविले. १९७० मध्ये स्वगृही परतल्यावर मातापित्यांचा रागही निवळला होता; परंतु मातापित्यांची त्यांनी निराशा केली. त्यांची मूर्तिपूजाविरोधी व बहुदेवतावादविरोधी मते अधिकच ताठर व कणखर बनली होती. भोवतालच्या सामाज सनातनी व रूढिनिष्ठ असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. पिताजींनी त्यांना घराबाहेर काढले.

तत्कालीन रीतीला अनुसरुन राममोहनांचे बालपणीच पहिले लग्न झाले होते. प्रथम पत्नीच लवकरच निवर्तल्यामुळे वडिलांनी १७८१ व १७८२ साली त्यांची दोन लग्ने लावून दिली. १८०० साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे नाव राधाप्रसाद असे ठेवले. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने घरची सांपत्तिक स्थिती ठीक असूनही त्यांना सरकारी नोकरी पतकारावी लागली. १८०३ मध्ये डाक्का येथील कलेक्टर टॉमस वुडफर्ड याचे दिवाणपद स्वीकारले. त्याच वेळी रामकांत रॉय निवर्तले. याच सुमारास राममोहनांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली. फार्सी भाषेत त्यांनी ‘ईश्वरभक्तांस देणगी’ (तुहफास-उल्-मुवहिद्दीन) या अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध प्रसिद्ध केला. त्याचे सार असे-सृष्टिकर्ता व पालनकर्ता एक निराकार परमेश्वर आहे. हा सिद्धांत सर्व धर्माचा पाया होय. निरनिराळ्या धर्माच्या लोकांनी या धर्मतत्त्वावर भलभलत्या कल्पनांचा डोलारा चढवला; त्यामुळे भिन्नभिन्न धर्मसंप्रदाय अस्तित्वात आले. धर्माचे खरे मूलभूत तत्त्व ठरविण्याकरिता खऱ्याखोट्याचा ऊहापोह केला पाहिजे. 

रामगड जिल्हा कोर्टाचे रजिस्ट्रार डिग्बी यांच्याशी १८०५ साली त्यांची मैत्री जमली. त्या वेळी वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांपुढे भारतीय लोक हांजीहांजी करीत, गुलामासारखे वागत. राममोहन अनेक वरिष्ठ पदस्थ इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नोकरीत राहिले; परंतु स्वतःच्या अंगच्या गुणांच्या बळावरच ते चढत गेले. डिग्बींच्या सहवासात असताना त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. इंग्रजीत भाषण, लेखन ते उत्कृष्टपणे करू लागले. बायबलचा व अनेक विषयांतील ग्रंथांचा व्यासंग त्यांनी सुरू ठेवला. 

राममोहनांनी १८१० साली सरकार नोकरी सोडली व रंगपूरच्या जवळ माहीगंज येथे स्वतःचे घर बांधून ते राहू लागले. तेथे लोकांना पाण्याची सोय व्हावी स्वखर्चाने एक तळेही बांधले. तेथे सुशिक्षित मंडळीबरोबर धर्मचर्चा सत्र सुरू केले. या मंडळींमध्ये विविध धर्मपंथांचे लोक भाग घेत. मूर्तिपूजेचा ऊहापोह विशेष होऊ लागला; कारण हिंदू धर्मात अगणित धर्मसंप्रदाय असले, तरी मूर्तीपूजा सर्वमान्य आहे. त्यामुळे मूर्तिपूजेची बाजू उचलून धरणारे बहुसंख्य लोक होते. मूर्तिपूजेचे समर्थक गौरीकांत भट्टाचार्य यांनी ज्ञानचंद्रिका हे पुस्तक लिहिले. ही सनातनी मंडली मतभेदांमुळे राममोहनांना विविध प्रकारे छळू लागली. पत्नी व मुले यांच्यासह गावात राहणे कठीण होऊ लागले. राममोहन यांनी राधानगराजवळ रघुनाथापूर येथे नवे घर बांधले. या घरासमोर त्यांनी ईश्वरोपासनेकरता एक वेदी उभारली. या घरातच त्यांच्या रामप्रसादनामक दुसऱ्या पत्राचा जन्म झाला. धार्मिक-मौलिक मतभेदांमुळे त्यांच्या मातेशी त्यांचे वितुष्ट आले. धाकटी दोन भावंडे मृत्यू पावली, म्हणून मातेच्या सांत्वनासाठी तिच्या भेटीला ते गेले. तशाही स्थितीत मातेने भेट घेण्याचे नाकारले. या घटनेने त्यांना फार दुःख झाले. तिच्या हट्टाकरिता कुलदेव राधागोविंद याच्या मूर्तीपुढे साष्टांग नमस्कार घातला व म्हटले, की ‘मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार करतो’. 

राममोहन १८१४ साली कलकत्त्याला स्थायिक झाले. तेथे सामाजिक व धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. आरंभी ‘आत्मीय सभा’ सुरू करून तीत भिन्नभिन्न विषयांवर चर्चा सुरू झाल्या. वेदान्तसूत्रे, उपनिषदे यांची बंगाली व इंग्रजी भाषांतरे छापून प्रसृत केली. सतीप्रथेकरता धर्मशास्त्राचे आलोडन केले. जेथेजेथे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करू लागले. त्यामुळे समाज त्यांना हिंदुधर्मविरोधी मानू लागला. १८१८ साली, सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यात म्हटले, की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा आणि हे समाजाकडून व आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत. त्यावेळचे गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला.

ख्रिस्ती धर्मप्रसारक व पाद्री हे हिंदू धर्मावर जबरदस्त टीका करीत. त्यांच्याशी साधार चर्चा करण्याकरिता ग्रीक व हिब्रू भाषांचे सखोल अध्ययन राममोहनांनी केले. कारण मूळ बायबल हिब्रू व ग्रीक भाषांत लिहिले आहे. हिंदू पंडितांना वाटले, की राममोहन ख्रिस्ती होणार; परंतु लवकरच हिंदूंचा भ्रमनिरास झाला. १८२० साली राममोहनांनी द प्रिसेप्टस ऑफ जीझस, द गाइड टू पीस अँड हॅपिनेस (येशूच्या आज्ञा, शांती व सुखाचा मार्ग) या नावाने ७० पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. १८८१ साली नव्या करारातील चारही शुभवर्तमानांचे बंगालीत भाषांतर केले. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारावर व उपद्रव्यापांवर जोराचा हल्ला केला. ४ डिसेंबर १८२१ रोजी संवादकौमुदी नामक एक साप्ताहिक बंगालीत सुरू केले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांविषयक प्रश्नांचा आणि भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा व तक्रारींचा ऊहापोह करणारे भारतीयाने सुरू केलेले हे पहिले नियतकालिक होय. भारतीय वृत्तपत्रव्यवसायाचा हा शुभारंभ होय. १८२२ साली मिरात-उल्-अखबार हे फार्सी साप्ताहिकही सुरू केले. यामधील भाषा आणि व्चार अतिशय प्रखर होते. याचवेळी सरकारने हुकूम काढला, की गव्हर्नर जनरलच्या परवान्याशिवाय कोणीही नियतकालिक काढू नये. हा हुकूम म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरील पहिले गंडांतर होय. राममोहनांना विस्मय वाटला व रागही आला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी सरकारदरबारी त्यांनी बराच काळ झगडा चालू ठेवला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी झगडत असताना त्यांनी शिक्षणषयक प्रश्नाला हात घातला.

याच वर्षी सरकारी शिक्षणखाते स्थापन झाले व कलकत्ता येथे शिक्षणखात्यातील मंडळींनी ही गोष्ट अमान्य झाली. भारताचा भाग्येदय होण्यास व पुढारलेल्या अन्य राष्ट्रांबरोबरीचा दर्जा भारतास प्राप्त होण्यास भारतीयांना आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. नुसत्या परंपरागत संस्कृत शिक्षणाने आजच्या नवीन ज्ञानाचा जो महान विस्तार झाला आहे., त्यापासून भारतीय लोक वंचित राहणार हे पाहून त्यांनी निक्षून सांगितले, की भौतिकी, रसायन, तंत्रज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र इ. विद्यांचे शिक्षण भारतीयांना देणारी विद्यालयेच स्थापन करणे आवश्यक आहे. त्यांनी संस्कृत महाविद्यालयाला विरोध केला, तरी स्वखर्चाने वेदान्त महाविद्यालयाची स्थापना केली (१८२५). १८२४ मध्ये बंगाली भाषेत इतिहास, भूगोल इ. अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांच्या वेदान्त ग्रंथ (१८१५) ह्या स्वतंत्र ग्रंथामुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला. बंगाली गद्याचे ते जनक मानले जातात. बंगाली व्याकरणावर दीर्घ व्यासंग करून गौडीय व्याकरण (१८३३) हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे बंगाली भाषेला उत्कर्षाचे दिवस प्राप्त झाले.

आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्म समाजाची (ब्राह्मो समाजाची) स्थापना केली. कलकत्ता येथे राममोहनांनी रामचंद्रविद्यावागीष, उत्सवानंदविद्यावागीष, ताराचंद्र चक्रवर्ती इ. सहकाऱ्यांबरोबर ब्राह्मसमाजाची पद्धतीने उपासनेला प्रारंभ केला. या नवविचारप्रणालीची यथोचित कल्पना देणारे सार्वत्रिक धर्मनामक पुस्तक लिहिले. त्यात मूळ सिद्धांत असा सांगितला, की ईश्वर पूजा म्हणजे ईश्वराच्या गुणांचे चिंतन. तो अतर्क्य व अवर्णनीय आहे. सृष्टिक्रमावरून त्याचे आकलन होते. ज्या वेळी मन शांत असेल, त्या वेळी चांगल्या जागी, चांगल्या वेळी त्याची पूजा करावी.

दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकारपुढे दाखल करण्याकरता, त्याचप्रमाणे संतीबंदीच्या कायद्याविरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून १९ नोव्हेंबर १८३० या दिवशी राममोहन इंग्लंडला रवाना झाले. त्या वेळी दिल्लीच्या बादशहाने खुष होऊन त्यांना ‘राजा’ हा किताब दिला. परदेशात त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. तिथल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटला. त्यांच्या सभासमारंभातील भाषणांनी व चर्चा संवादांनी भारताचा प्रतिमा त्यांनी उजळून टाकली. याच वेळी ते अकस्मात आजारी पडले. ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले. रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर व इतर सहकार्यांयनी कार्नोव्हेल येथे त्यांची समाधी बांधली.

ब्राह्म समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली. कन्या विक्रय, कन्याहत्या, बालविवाह, बाला-वृद्धविवाह इ. अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता त्यांनी आंदोलन उभारले. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये या प्रज्ञाशाली पुरूषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. सुंदर, भव्य, विद्वान, त्यागी व तपस्वी असा हा पुरूष इंग्रजी राज्याच्या स्थापनेनंतर लवकरच उदयास आला. 

दयानंद सरस्वती

दयानंद सरस्वती हे आर्य समाजचे संस्थापक व समाजसुधारक होते. यांचा जन्म इ.स. १८२४मध्ये मुंबई येथे झाला. त्यांचे नाव मूळशंकर होते, इ.स. १८७५मध्ये त्यांनी मुंबई येथे आर्य समाज ची स्थापना केली. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

आर्यसमाज : हा एक अर्वाचीन धर्मपंथ असून या पंथाची स्थापना स्वामी ð दयानंद सरस्वती यांनी चैत्र शु. प्रतिपदा, संवत १९३२ म्हणजे १० एप्रिल १८७५ रोजी मुंबईस केली. हाच दिवस स्थापनादिन म्हणून आर्यसमाजी लोक प्रतिवर्षी साजरा करतात. स्वामी दयानंद हे काठेवाडातील टंकारा नामक खेडेगावी १८२४ साली जन्मले. त्यांचे नाव मूलशंकर अंबाशंकर.

या पंथाची मुख्य दहा तत्त्वे असून त्यांतील पहिली तीन तत्त्वे धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहेत. ती अशी: (१) सर्व यथार्थ ज्ञानाचा उगम व सर्व वस्तूंचे आदिकारण परमेश्वर आहे. (२) ईश्वर हा सच्चिदानंदस्वरूप असून तो अनादी, अनंत, निराकार, निष्कलंक, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, परमन्यायी, कनवाळू सर्व जगाचा निर्माता, शास्ता व पालक आहे. त्याचे भजनपूजन करावे. (३) वेद हे त्या ईश्वराचीची निःश्वसिते होत. सर्व यथार्थ ज्ञानांचा उगम वेदांतच असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे व करविणे, हे प्रत्येक आर्याचे पवित्र कर्तव्य आहे. वेद प्रमाण मानतो तो आर्य.

बाकीच्या सात तत्त्वाचा सारांश असा: प्रत्येकाने सत्याचा स्वीकार करून धर्मानुसार वागावे; मानवाची आधिभौतिक, सामाजिक, आध्यात्मिक इ. प्रत्येक बाबतीत उन्नती करून मनुष्यजातीचे सर्वांगणी कल्याण साधावे; प्रेमाने व न्यायाने वागावे; ज्ञानाचा प्रसार करावा; दुसर्‍यांच्या उत्कर्षातच आपला उत्कर्ष आहे असे मानावे; प्रत्येकाला स्वतःच्या मताप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असले, तरी सामाजिक कल्याणासाठी प्रत्येकाने आपसातील मतभेद व हेवेदावे विसरून वागावे.

स्वामी दयानंदांनी वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा केला. ईश्वरप्रणीत अशा या ग्रंथात सर्व शास्त्रांची मूलतत्वे ग्रथिक आहेत. ते स्वयंसिद्ध सत्यस्वरूप आहेत. मानवजातीच्या वैज्ञानिक व पारमार्थिक विचारांचा उगम वेदांत आहे. म्हणून त्यांनी चार वेदांच्या मंत्रसंहिताच प्रमाण मानल्या; ब्राह्मणग्रंथ नव्हे. सहा शास्त्रे, स्मृती वा अठरा पुराणे त्यांनी प्रमाण म्हणून मान्य केली नाहीत.

भारताला पुन्हा वैदिक मार्गावर नेणे व सर्व जगाला वैदिक धर्म शिकविणे ही आर्यसमाजाने आपली परमश्रेष्ठ कर्तव्ये ठरविली व वेदांच्या उद्धाराचे व प्रचाराचे कार्य हिरिरीने चालू केले. समाजाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाने पंचमहायज्ञ रोज केले पाहिजेत. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथियज्ञ व बलियज्ञ हे पंचमहायज्ञ होत.

स्वामी दयानंदांनी स्वमतप्रसाराकरिता सत्यार्थप्रकाश ग्रंथ लिहिला. आर्यसमाजात हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. आर्यसमाज जन्मसिद्ध जातिभेद मानीत नाही; परंतु गुणकर्मानी बनलेले चातुर्वर्ण्य मानतो. उदा., तप, विद्या, शांती हे गुण असलेला ब्राह्मण; वीरवृत्ती व नेतृत्व असलेला क्षत्रिय; धनसंग्रहचतुर वैश्य व शरीरश्रमावर भर देणारा शूद्र.

मूळ वेदांत मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थे, व्रते, पौराणिक अनुष्ठाने इत्यादींचा पुरस्कार नाही. त्यामुळे आर्यसमाजी प्रवर्तकांनी या सर्व गोष्टी त्याज्य ठरविल्या, श्राद्धे बंद केली व पुरोहितांनाही रजा दिली; राम-कृष्ण हे ईश्वरी अवतार नसून श्रेष्ठ मानव होते, असे ते लोकांना समजावून सांगू लागले.

जातिभेद वा अस्पृश्यता आर्यसमाज मानीत नाही; वेदाध्ययनाचा अधिकार तो सर्वांना मानतो. सुरुवातीस समाजाच्या प्रवर्तकांनी आपली ही तत्त्वे लोकांच्या गळी उतरवण्याचा अटोकाट प्रयत्‍न केला. विरोधी मतांचे खंडन केले. त्यांनी विधायक कार्ये हाती घेतली. उत्तर भारतात प्रमुख ठिकाणी त्यांनी गुरुकुले, महाविद्यालये, हरद्वारजवळील कांगडी येथील गुरुकुल विश्वविद्यालय, माध्यमिक शाळा, अनाथालये, विधवाश्रम वगैरे संस्था स्थापन केल्या आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतही परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्‍न केला.

त्यांच्या मतानुसार मोक्ष मिळविणे, हे प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असले पाहिजे व ते प्रत्येकाने स्वप्रयत्‍नाने साध्य केले पाहिजे. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. काही आपत्तींपुरती नियोगपद्धतीही त्यांना मान्य आहे. हिंदूंचे सोळा संस्कार त्यांना मान्य असून त्यांचे वेदकालीन साधे स्वरूप तेवढेच स्वीकारले आहे.

स्वामी दयानंदांच्या निधनानंतर १८८३ मध्ये आर्यसमाजात फूट पडून त्याच्या दोन भिन्न भिन्न शाखा झाल्या. एका शाखेने मांसाहार व आधुनिक पाश्चात्य उच्च शिक्षणाचा पुरस्कार केला; तर दुसऱ्या शाखेने मांसाहार व पाश्चात्य उच्च शिक्षण निषिद्ध मानले. म्हणून महाविद्यालय पक्ष व पुराणमतवादी पक्ष अशी त्यांना दोन नावे पडली.

आर्यसमाजाच्या स्थानिक, प्रांतीय व अखिल भारतीय स्वरूपाच्या एकूण तीन सभा आहेत. आर्यसमाजी धार्मिक उपासना आठवड्यातून एकदा दर रविवारी सकाळी करतात. उपासनेच्या प्रारंभी व्यासपीठाजवळील अग्नीत समंत्रक आहुती देऊन मग उपासनेस प्रारंभ होतो. ही उपासना तीन चार तास चालते. समाजाची दीक्षा व मागासलेल्या जातींना शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करणे, ही आर्यसमाजाची सर्वांत मोठी कार्ये मानली जातात.

मलबारात १९२१ मध्ये मोपला मुसलमानांनी मोठे बंड करून असंख्य हिंदूंना जबरदस्तीने बाटवून मुसलमान केले. या संकटकाळी आर्यसमाजी लोक धैर्याने मलबारात गेले व सु. अडीच हजार भ्रष्ट हिंदू कुटुंबांना त्यांनी पुनश्च हिंदुधर्मात आणले. १९३७ साली हैदराबाद संस्थानात आर्यसमाजावर निजामसरकारने बंदी घातली; त्या बंदीविरुद्ध आर्यसमाजी अनुयायांनी सत्याग्रहाचे शस्त्र उपसले. त्यावेळी बारा हजार आर्यसमाजी लोकांनी बंदीवास पत्करला.

आर्यसमाजाची स्थापना मुंबईस झाली, तरी त्याचा प्रसार महाराष्ट्रात फारसा झाला नाही. समाजाचे कार्यक्षेत्र मुख्यतः उत्तर भारत हेच ठरले. पंजाबात व उत्तर प्रदेशात समाजाच्या तीनशेच्या वर शाखा आहेत.

प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाज ह्यांच्यापेक्षा जनमनावर आर्यसमाजाचा पगडा विशेष आहे. आर्यसमाजाला केवळ वेदप्रामाण्यच मान्य असल्याने तसेच त्याच्या सामाजिक व धार्मिक पुरोगामी मतांमुळे सुरुवातीस आर्यसमाजाला सनातन हिंदुधर्मीयांचा कसून विरोध झाला; पण त्या विरोधास न जुमानता समाजाच्या कार्यकर्त्यांनी धडाडीने प्रचार करून वेदप्रणीत धर्माच्या पुनरुत्थाचे महान कार्य केले. प्रौढविवाह, पुनर्विवाह, जातिनाश, अस्पृश्योद्धार, गुणकर्मविभागशः वर्णरचना इ. आर्यसमाजाची तत्त्वे अखिल हिंदूंना आज अधिकाधिक मान्य होऊ लागली आहेत.

उदयपूरचे महाराज, लाला मूलराज, लाला रामशरणदास रईस, मोहनलालजी विष्णुलालजी, लाला जगन्नाथ, गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), पंडित श्यामजी कृष्णवर्मा इ. आर्यसमाजाचे पदाधिकारी होते. ब्रह्मीभूत स्वामी श्रद्धानंद हे आर्यसमाजाचे थोर हुतात्मे झाले. महाराष्ट्रात आर्यसमाजाच्या तत्त्वांचा प्रचार करून त्याची स्थापना करण्याचे कार्य लोकहितवादी व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले.

आजमितीस आर्यसमाज हा स्वतंत्र पंथ म्हणून उत्तर भारतात प्रचलित असला, तरी तो हिंदुधर्माहून वेगळा मानला जात नाही. आर्यसमाजाने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत मोठी कामगिरी केली असल्याने, भारताच्या अर्वाचीन पुनरुत्थानाच्या कार्यात आर्यसमाजाचा वाटा फार मोठा आहे. 

रामकृष्ण परमहंस :

(१८ फेब्रुवारी १८३६–१५ ऑगस्ट १८८६). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष. मूळ नाव गदाधर, वडील क्षुदिराम चतर्जी, आई चंद्रामणीदेवी. गदाधरांचा जन्म कलकत्त्यापासून सु. १०० किमी. दूर असलेल्या कामारपुकुर या खेड्यात व शालेय शिक्षण गावातील धर्मदास लाहा यांच्या शाळेत केवळ एकदोन इयत्ता इतकेच झाले. अगदी लहानपणापासून रामकृष्ण परमहंसरामकृष्ण परमहंसईश्वरभक्ती व साधुबैरागी यांकडे त्यांची ओढ होती. काळ्याभोर ढगांच्या पृष्ठभूमीवरून आकाशातून उडत चाललेली पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची रांग पाहून गदाधरांचे भान नष्ट झाले. भक्तिपर गाणी ऐकताना, शिवाची भूमिका नाटकात करीत असतानाही तसाच भावावेश होई. ईश्वराशी मन असे तन्मय होण्याची जन्मसिद्ध प्रवृत्ती त्यांच्या ठायी होती व ती सतत टिकून राहिली. १८४३ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. गदाधरांची नवव्या वर्षी मुंज झाली. आधी शब्द दिला होता म्हणून मुंजीच्या वेळी पहिली भिक्षा त्यांनी धानी लोहारणीकडून घेतली. हे परंपरेहून वेगळे पाऊल होते. उदरनिर्वाहासाठी पाठशाळा चालवणारा थोरला भाऊ राजकुमार याने १८५२ मध्ये गदाधरांना कलकत्त्यास आणले. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. कलकत्त्यापासून सु. ६ किमी. वरील दक्षिणेश्वर या खेड्यात गंगेच्या तीरावर १८५५ मध्ये राणी रासमणीने उभारलेल्या कालीमातेच्या मंदिरात रामकुमार पुजारी झाला. शुद्राची सेवा ब्राह्मणाने करू नये, या कारणासाठी प्रथम नकार दिलेल्या गदाधरांनी राणी रासमणीचे जावई व मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाश विश्वास यांच्या आग्रहावरून वर्षभराने ते पुजारीपण स्वीकारले. १८५६ मध्ये रामकुमारचा मृत्यु झाला.

 यानंतर गदाधरांची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात. धोतर सोडून ठेवीत, ब्राह्मणत्त्वाचे चिन्ह असे यज्ञोपवीत काढून ठेवीत आणि ध्यानधारणा करीत. उत्कटता वाढत चालली. रात्र व दिवस यांचे भान नष्ट होत गेले. ‘आई, दर्शन दे’ असा आक्रोश सुरू झाला. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे. भाचा हृदय हा दोन घास गदाधरांना भरवी. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्‌ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. या वेळी त्यांचे वय पंचवीस होते. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. गदाधरांस रामकृष्ण हे नाव कोणी व केव्हा दिले हे ठरवता येत नाही. रामकृष्ण विवाहित होते. १८५९ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची सहा वर्षांची कन्या सारदामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरला आलेल्या सारदादेवींची त्यांनी जगन्माता या नात्याने केलेली षोडशी पूजा, हा रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा. सारदादेवींना रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णपणे सहभागी करून घेतले आणि त्याही सर्वार्थांनी त्यांच्या सहधर्मिणी झाल्या. रामकृष्णांच्या खालोखाल त्यांच्या अनुयायीवर्गात सारदामाता यांचे स्थान मान्यता पावले आहे.

कालीमातेची रीतसर पूजा करू लागण्याच्या आधीचा एक धार्मिक विधी म्हणून रामकृष्णांनी कलकत्त्यातील केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली होती. ते साधनाकालापूर्वीचे त्यांचे दीक्षागुरू. त्यानंतरचे त्यांचे गुरू दोन. १८६१ मध्ये दक्षिणेश्वरला आलेल्या भैरवी ब्राह्मणी या चाळिशीतील संन्यासिनीने दोन अडीच वर्षांच्या अवधीत रामकृष्णांकडून तंत्रमार्गानुसार सर्व प्रकारच्या साधना करून घेतल्या. रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत, असे शास्त्रीपंडितांच्या सभेत भैरवी ब्राह्मणीने प्रथम म्हटले. सुमारे सहा वर्षे रामकृष्णांच्या सहवासात राहून ती काशीला गेली. १८६४ मध्ये तोतापुरी हा संन्यासी दक्षिणेश्वरला आला. त्याने रामकृष्णांकडून वेदान्ताची साधना करून घेतली. त्या आधी त्यांना संन्यास दीक्षा दिली. तीन दिवसांनी समाधी लागली. ती तीन दिवस राहिली. हा निराकाराचा साक्षात्कार. दहा महिने राहून तोतापुरी गेल्यावर रामकृष्ण अद्वैतानुभवाच्या अवस्थेत सतत सहा महिने होते. त्यानंतर त्यांना आदेश मिळाला. ‘भावमुखी राहा’. १८६६ मध्ये गोविंद राय यांच्यामुळे इस्लाम धर्मानुसार त्यांची साधना झाली, तर शंभुचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला. येशू ख्रिस्तीने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला, असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवांतून, सारे धर्म हे एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत, हे रामकृष्णांचे मत बनले. १८६८ मध्ये त्यांनी मधुरबाबूंबरोबर काशीवृंदावनची यात्रा केली.

कलकत्त्यातील सुशिक्षितांना रामकृष्णांची माहिती ब्राह्मो समाजाचे नेते ⇨ केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे प्रथम झाली. दक्षिणेश्वरला दर्शनासाठी लोक येऊ लागले. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासनतास चालणारे संवाद ⇨ महेंद्रनाथ गुप्त यांनी ‘एम्.’ या टोपणनावाने श्रीरामकृष्ण कथामृत – ५ खंड, १८९७ – १९३२ (म. भा. श्री रामकृष्ण वचनामृत – १९५१) या ग्रंथात संकलित केले. अखेरच्या चार वर्षातील हे संवाद आहेत. त्यांवरून त्यांची शिकवणूक कळते. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण (१९४४) या नावाने केले. या ग्रंथाची तुलना बायबलशी केली गेली. रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे. कामिनीकांचनाच्या मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, ईश्वरदर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. कामिनीकांचनाचा सर्वथा त्याग, संन्यासव्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करूण शिष्यांना केला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभाव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत.

रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हात, काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चतर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. काही स्त्रियाही त्यांच्या शिष्यवर्गात होत्या. दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते. त्यांतील अग्रणी म्हणजे स्वामी ⇨ विवेकानंद. त्यांनी स्थापन केलेल्या ⇨ रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली.

रामकृष्ण मिशन :

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापना झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील एक सेवाभावी संस्था. संस्थापक स्वामी विवेकानंद. मूळ प्रेरणा त्यांचे सद्‍गुरू ⇨ रामकृष्ण परमहंस   यांची. आयुष्याच्या अखेरीस काशीपूरच्या उद्यानगृहात कर्करोगाने आजारी असताना जानेवारी ते ऑगस्ट १८८६ या अवधीत आपल्या आठ-दहा तरुण शिष्यांना व विशेषेकरून विवेकानंदांना म्हणजे त्यावेळच्या नरेंद्राला रामकृष्णांनी जे मार्गदर्शन वेळोवेळच्या संवादांतून केले, त्यामध्ये रामकृष्ण मिशनच्या स्थापनेचे बीज आहे. नरेंद्राला समाधीचा पहिला अनुभव आला तेव्हाच रामकृष्ण त्याला म्हणाले, ‘तुला या जगात जगन्मातेचे काही कार्य करायचे आहे, ते पुरे होईतो तुला या आनंदात बुडून राहता येणार नाही’. त्यानंतर आपल्या अंतरंगशिष्यांपैकी नरेंद्र, राखाल आदी अकरा जणांना रामकृष्णांनी भगवी वस्त्रे व रुद्राक्षाच्या माळा दिल्या, छोटासा विधी करून संन्यास दिला आणि एके दिवशी भिक्षा मागून आणण्यास सांगितले. रामकृष्णांनी दिलेला हा संन्यास म्हणजे रामकृष्ण मिशनचा मूळ प्रारंभ होय, अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे. अगदी अखेरीस निरवानिरव करावी त्याप्रमाणे रामकृष्णांनी नरेंद्रास म्हटले, ‘माझ्या मागे या सर्व मुलांची नीट काळजी घे, यांतील कुणी घरी परत जाणार नाही व संसाराच्या पाशात अडकणार नाही ते पहा.’ आपली पत्नी सारदादेवी यांना रामकृष्ण म्हणाले, ‘तुम्हालाही काही कार्य करावे लागेल.’ सारदामातेचे वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन पुढे १९२० पर्यंत या अंतरंगशिष्यांना मिळत राहिले.

पंधरा ऑगस्ट १८८६ च्या मध्यरात्रीनंतर रामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर महिनाभराच्या आत कलकत्त्याच्या वराहनगर भागातील एक पडक्या घरात हे सारे अंतरंगशिष्य राहू लागले. हा पहिला मठ. रामकृष्णांचे गृहस्थाश्रमी शिष्य काही आर्थिक साहाय्य करीत. मिळेल ते दोन घास अन्न आणि आध्यात्मिक साधना, धर्मग्रंथांचा अभ्यास व अधूनमधून तीर्थयात्रा असा त्यांचा जीवनक्रम होता. १८८७ च्या प्रारंभी विरजा रामकृष्ण मिशन : बेलूर मठ संकुलाचे एक दृश्यरामकृष्ण मिशन : बेलूर मठ संकुलाचे एक दृश्यहोम करून या सर्वांनी विधिपूर्वक संन्यासदीक्षा घेतली व नवीन नावे धारण केली. स्वामी विवेकानंद, स्वामी ब्रह्मानंद, स्वामी सारदानंद, स्वामी प्रेमानंद, स्वामी शिवानंद, स्वामी अभेदानंद, स्वामी तुरीयानंद, स्वामी रामकृष्णानंद, स्वामी त्रिगुणातीतानंद, स्वामी योगानंद, स्वामी निरंजनानंद, स्वामी अद्वैतानंद आणि स्वामी अद्‌भुतानंद अशी त्यांची नावे होत. या सर्वांच्या सहकार्यातून पुढे रामकृष्ण मिशन आकारास आले. ते प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी विवेकानंदांनी १८९१ पासून सु. अडीच वर्षाच्या अवधीत केलेले अज्ञातावस्थेतील साऱ्या भारतामधील भ्रमण, १८९३ साली शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करून मिळवलेले अपूर्व यश, इंग्लंड-अमेरिकेत साडेतीन वर्षे संचार करून स्थापलेल्या दोन तीन वेदान्त सोसायट्या, त्यांचे शिष्यत्व पतकरलेल्या सात-आठ पाश्चात्य शिष्यांचे भारतात झालेले आगमन आणि विवेकानंदांनी विदेशांत केलेल्या महान कार्याचा भारतात झालेला अपूर्व गौरव एवढ्या घटना पुढील आठदहा वर्षांत घडाव्या लागल्या. १ मे १८९७ या दिवशी कलकत्त्याला बागबझार भागात बलराम बसू यांच्या घरी आपले गुरूबंधू व रामकृष्णांचे प्रमुख अनुयायी यांची खास सभा घेऊन विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची रीतसर स्थापना केली. त्याचे कायदेशीर विश्वस्तनिधीपत्र शासनाकडे नोंदवण्यात आले.

या संस्थेचे सर्वपरिचित नाव ‘रामकृष्ण मिशन’ हे असले, तरी मूळचा शब्द आहे ‘रामकृष्ण संघ’. काही वर्षांनंतर सोयीसाठी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन असे त्याचे दोन स्वतंत्र भाग करण्यात आले. विश्वस्तपत्रे व विश्वस्तमंडळे वेगळी करण्यात आली. मात्र रामकृष्ण संघाचे संन्यासीच दोन्ही संस्थांच्या विश्वस्त मंडळांत असतात. मठाच्या शाखांतून धार्मिक कार्य, तर मिशनच्या शाखांच्या द्वारा शिक्षण, रुग्णालये व आपत्कालीन साहाय्य इ. सेवाकार्ये अशी विभागणी करण्यात आली. रामकृष्णांच्या जीवनात आविष्कृत झालेल्या आध्यात्मिक सत्यांचा आचार व प्रचार करणे, पाश्चात्य जगात वेदान्त धर्माचा संदेश पोहोचवणे, भारतात आधुनिक विद्येचा प्रसार करण्यासाठी शिक्षणसंस्था चालवणे अशी ध्येये समोर ठेवून रामकृष्ण संघ स्थापन केला गेला आहे. त्याग आणि सेवा हे त्यांचे बीद्र, शिवभावाने जीवसेवा ही धारणा, तर ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्वितीय च।’ हे बोधवाक्य आहे. कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग या सर्वांचा मेळ साधणाऱ्या प्रतीकांनी युक्त असे बोधचिन्ह विवेकानंदांनी तयार केलेले आहे. त्यासाठी अनुक्रमे तरंगयुक्त पाणी, उगवता सूर्य, विकसित कमलपुष्प आणि वेटोळे घातलेला नाग अशी योजना असून, मध्यभागीचा हंस परमात्म्याचे प्रतीक आहे. मठाच्या सर्व शाखांमधून रामकृष्णांची पूजाआरती होते, तर रामकृष्ण, सारदामाता व विवेकानंद यांचे जन्मदिनोत्सव प्रतिवर्षी साजरे होतात. कोणत्याही स्वरूपाचा जातिभेद, धर्मभेद वा उच्चनीचभाव मानला जात नाही. १९०२ मध्ये ⇨ विवेकानंद   समाधिस्थ झाल्यावर ब्रह्मानंद, शिवानंद, अखंडानंद आदी गुरूबंधूंनी १९३९ पर्यंत नेतृत्व केले, त्यानंतर संन्याशांच्या पुढील पिढीने तो भार उचलला.

वराहनगर येथून १८९२ मध्ये आलमबझारला, तेथून १८९८ मध्ये नीलांबर मुखर्जींच्या उद्यानगृहात व अखेर १८९९ मध्ये बेलूरला स्वतःच्या मालकीच्या जागेत रामकृष्ण संघ आला. बेलूर येथे त्यांचे केंद्र-कार्यालय आहे. संन्यासी व ब्रह्मचारी मिळून एक हजारांहून अधिक कार्यकर्ते तेथे आहेत. नवागत ब्रह्मचाऱ्यासाठी बेलूर मठात शिक्षणकेंद्र आहे, त्याचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पदव्युत्तर पातळीचा आहे. मठ व मिशन यांच्या भारताच्या सर्व भागांत मिळून नव्वदपर्यंत; तर फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, स्वित्झर्लंड, सिंगापूर, मॉरिशस, फिजी बेटे, श्रीलंका व बांगला देश या इतर देशांत तीसहून अधिक शाखा आहेत. भारतामध्ये तेरा सुसज्ज रुग्णालये व ऐंशीहून अधिक छोटी रुग्णालये आहेत. सुमारे शंभर वसतिगृहांतून दहा हजारांवर विद्यार्थी आणि एक हजारावर विद्यार्थिनी यांची सोय आहे. सर्व शिक्षणसंस्थातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सव्वा लाख आहे, तर स्थापत्य महाविद्यालयापासून तो महिला आणि आदिवासी यांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या वर्गांपर्यंत पाचशेहून अधिक शिक्षणसंस्था आहेत. साथी, दुष्काळ, भूकंप, महापूर अशा आपत्काली केल्या गेलेल्या सेवाकार्यांची संख्या शेकड्यांनी मोजावी लागेल. सारदामातेच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने १९४५ साली स्त्रियांसाठी स्वतंत्र संन्यासिनींचा सारदामठ स्थापन झाला. शिवाय श्रीरामकृष्ण-सारदा मिशन ही एक वेगळी संस्थाही कार्यरत आहे.

विवेकानंद अमेरिकेत असतानाच मद्रासहून ब्रह्मवादिन्   हे इंग्रजी नियतकालिक सुरू झाले, पण ते नंतर बंद पडले. हिमालयातील मायावतीच्या आश्रमातून प्रबुद्ध भारत, तर कलकत्त्याहून बंगालीतील उद्‌बोधन ही नियतकालिके विवेकानंद भारतात परतल्यावर सुरू झाली. पुढे त्यांत दोनतीन इंग्रजी, तसेच हिंदी, मराठी, तमिळ, मलयाळम् व फ्रेंच या भाषांतील नियतकालिकांची भर पडली. विवेकानंदांची व्याख्याने आणि ‘एम्.’ यांचे रामकृष्णवचनामृत   यांच्या निमित्ताने ग्रंथप्रकाशनाचा विभाग सुरू झाला. आज भारतात व परदेशांत मिळून पाचसात प्रकाशन केंद्रे आहेत. भारतीय संस्कृती व रामकृष्ण-विवेकानंदांची विचारधारा यांवरील शेकडो पुस्तके अनेक भाषांमधून आजवर प्रसिद्ध झाली आहेत आणि होत आहेत. राजकारणापासून रामकृष्ण संघ पूर्णपणे अलिप्त आहे. त्याचे कार्य सर्वस्वी आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. शंभर वर्षे उलटली, नाना आपत्ती येत राहिल्या, तरी आपल्या सत्त्वाला व ध्येयाला या संस्थेने ढळ पोहोचू दिलेला नाही. प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहून सारे कार्य शांतपणाने चालू आहे. स्वदेशातील दरिद्रनारायणाची सेवा आणि भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीतील शाश्वत मूल्यांचा साऱ्या जगात प्रसार, असे कार्य करणारी ही अग्रगण्य संस्था आहे.