महाराष्ट्र - Scholarship Exam

 

महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित  राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणिदादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी[ संदर्भ हवा ] राज्य आहे.

प्रशासन

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते. महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेतलोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली.२०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली असून राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

विभाग

 

महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर  अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत. भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग). 2014 साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आलेली आहे, त्यामुळे एकुण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे.

मुख्य शहरे

·       मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.

·       पुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.

·       नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.

·       औरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.

·       नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.

·       कोल्हापूर- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.

·       सोलापूर- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.

·       अमरावती- एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे गांव. आधुनिक संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजयांचा जिल्हा म्हणुन ओळख.

भौगोलिक स्थान

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वादख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.