इंग्रज निजाम संबंध
मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत
दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य
केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये
कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व
निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती
करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा
फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.
१७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली
मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली
गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह केला. या तहाने
मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलाकडील सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे
अधिकार मिळाले. तेव्हा दक्षिण प्रांतात खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बिदर व हैद्राबाद असे सहा सुभे होते.
मराठा सैन्याच्या मदतीने हुसैन अलीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. १७२०
मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती
करण्यात आली. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. पण
त्याला तेथे जाण्यात रस नव्हता. बंडाची चिन्हे दिसू लागली म्हणून बादशाहने सुभेदार
मुबारिजखान याला निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.निजाम व मोगल सरदार
मूबारीजखान यांच्यात १ ऑक्टोबर १७२४ रोजी साखरखेर्डा येथे लढाई झाली. या लढाईत
निजामाचा विजय झाला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर
शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून
माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.
पहिल्या निजामाची कारकीर्द १७२४-१७४८ अशी २४ वर्षांची होती. त्यानंतर
निजामाच्या वारसदारात १७४८-१७६२ पर्यंत वारसायुद्ध झाले. निजाम-उल-मुल्क नंतर
त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्यानेच सर्वप्रथम
स्वतःला 'निजाम' अशी पदवी दिली. म्हणून
नंतरच्या सर्व राजांना 'निजाम' असे संबोधण्यात आले. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटकडून 'आसफजाह' हा किताब मिळाला होता.
म्हणून या घराण्याला 'आसफजाही' घराणे असे म्हणतात. या घराण्यात एकूण सात राजे होऊन गेले.
त्यांचा एकूण कालखंड २२४ वर्षांचा होता. हैद्राबाद राज्याची राजभाषा 'फारशी' होती. शेवटचा निजाम मीर
उस्मान अली (१९१९ ते १९४८) याच्या काळात हैद्राबाद मुक्ती संग्राम घडून आले.
इंग्रजांचे राज्य उधळून लावून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उस्मान
अलीचे स्वप्न होते. निजाम व इस्ट इंडिया कंपनी यांच्यात १२ ऑक्टोबर १८६० मध्ये तैनाती फौजेचा करार
झाला. इंग्रज फौजेच्या खर्चासाठी कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने कंपनीला
दिले. सातवा व शेवटचा मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. पहिल्या
महायुद्धात निजामाने इंग्रजांना खूप मदत केली होती . म्हणून ब्रिटीश सम्राट पंचम
जॉर्ज याने निजामाला "हिज एक्झाल्टेड हायनेस" हा किताब दिला.
निजामाच्या हाताखाली दक्षिणेतील सहा सुभे आणि त्यांतील कडप्पा, कुर्नूल, अर्काट, शिरे व सावनूर हा नबाबाचा
प्रदेश होता. याशिवाय म्हैसूर, तंजावर संस्थांनाचे राजे त्याचे मांडलिक म्हणून समजले
जात. दक्षिणेत त्यास प्रथम मराठे नंतर
इंग्रज, हैदर व टिपू हे
प्रतिस्पर्धी होते. मराठ्यांचे बळ खच्ची करण्याकरिता निजामाने अनेक उपाय योजले; पण त्याच्या सर्व
कारस्थानांना शह देणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशव्याने निजाम व दिल्लीकर मोगल यांचे
संबंध तोडण्याचे प्रयत्न करुन निजामाच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळविल्या. १७४८
मध्ये निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर निजामशाहीत गोंधळ माजला. नवा निजाम नासिरजंग
याच्याविरुद्ध त्याचा भाचा मुजफ्फरजंग याने बंड पुकारुन अर्काटच्या नबाबामार्फत
फ्रेंचांशी संधान बांधले. या प्रकरणी झालेल्या लढायांत प्रथम नासिरजंग व नंतर
मुजफ्फरजंग मारले जाऊन, नासिरजंगाचा भाऊ सलाबतजंग गादीवर आला सलाबतजंगाच्या दरबारी
फ्रेंचांचे वर्चस्व वाढून उत्तर सरकार या नावाने ओळखला जाणारा प्रदेश फ्रेंच
सैन्याच्या खर्चासाठी देण्यात आला.
१७५५ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात
युद्ध होऊन उत्तर सरकारचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा ताबा कबूल करण्यात
यावा आणि त्याबाबत कंपनीतर्फे काही ठराविक रक्कम निजामाला देण्यात यावी, अशी बोलणी करण्याकरिता
इंग्रजांनी आपले दोन अधिकारी हैदराबादला सलाबतजंगाकडे पाठविले, हाच निजाम व इंग्रजांचा
आलेला पहिला संबंध होय. सलाबतजंगाने इंग्रजांची मागणी मान्य केली व उत्तर सरकारचा
प्रदेश कायमचा इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला. सलाबतजंगाला गादीवरुन काढून
त्याचा धाकटा भाऊ निजाम अली १७६२ मध्ये निजाम बनला. त्याने आपल्या चाळीस
वर्षांच्या कारकीर्दीत हैदर अली व टिपू यांच्याशी झालेल्या युद्धांनंतर इंग्रजांशी
पूर्ण सहकार्य करुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. १७९५ मध्ये निजाम अलीने मराठ्यांविरुद्ध
इंग्रजांनी आपणास मदत करावी, अशी मागणी केली पण इंग्रजांनी निजामाची विनंती नाकारली.
त्याचा परिणाम म्हणजेच खर्ड्याच्या लढाईत (१७९५) पराभूत होऊन निजामास
मराठ्यांबरोबर नामुष्कीचा तह करावा लागला
इंग्रजांनी या युद्धात आपल्याला मदत केली नाही, याचे वैषम्य वाटून निजामाने आपल्याकडे असलेल्या
इंग्रजी सैन्याला परत पाठविले, पण स्वतःचा मुलगा अलीजाहने बंड केल्याने निजामास हे सैन्य
परत बोलवावे लागले. या काळात निजामाच्या सैन्यात फ्रेंचांचे बरेच वर्चस्व होते.
पण १७९८ मध्ये फ्रेंच सेनापती मुसा रेमाँच्या मृत्यूनंतर हे सैन्य बरखास्त करावे, अशी इंग्रजांनी केलेली
मागणी निजामाने मान्य केली. यामुळे फ्रेंचांची मक्तेदारी संपून निजामाच्या दरबारात
इंग्रजांचे वर्चस्व वाढले. १७९९ मध्ये श्रीरंगपटणच्या टिपूविरुद्धच्या लढाईत
निजामाने इंग्रजांस मदत केली. लॉर्ड वेलस्लीने सुरु केलेल्या तैनाती फौजेच्या
पद्धतीस निजाम बळी पडला. १२ ऑक्टोबर १८०० मध्ये निजाम व ईस्ट इंडिया कंपनी
यांच्यात तह झाला. या तहान्वये निजामाच्या संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबाद
येथे कायम ठेवण्यात आली. निजामाने भारतातातील कोणत्याही सत्ताधीशांबरोबर कसलाही
संबंध ठेवणार नाही, असे कबूल केले.
इंग्रजी फौजेच्या खर्चाकरिता
श्रीरंगपटणच्या लढाईत मिळालेले कडप्पा, कुर्नूल, अनंतपूर व बल्लारी हे जिल्हे निजामाने
इंग्रजांना कायमचे दिले. त्यांच्या मोबदल्यात निजामाचे परचक्रापासून व राज्यातील
बंडखोरीपासून रक्षण करण्याची जबाबदारी इंग्रजांनी घेतलीयावेळेपासून निजामाचे
स्वातंत्र्य नष्ट झाले. ही घटना निजाम
अलीचा मुलगा सिकंदरजाह, सरदार महिपतराव वगैरेंना आवडली नाही. त्यांनी
इंग्रजांविरुद्ध कारस्थाने व हैदराबाद राज्याविरुद्ध बंडे सुरु केली. १८०० ते १८५७
या काळातील सिकंदरजाह, रावरंभा निंबाळकर, महिपतराव वगैरेंची कारस्थाने, त्याचप्रमाणे निरनिराळ्या
जमातींची व व्यक्तींची बंडे मुख्यतः इंग्रजी सैन्याने मोडून काढली.१८५७ च्या
उठावात हैदराबादच्या जनतेने भाग घेतला, पण इंग्रज आणि सालारजंग यांनी या चळवळीचा
बंदोबस्त करण्यात यश मिळविले.
१८५७ नंतरच्या काळात मुख्यतः निजाम व इंग्रजांविरुद्धच्या हैदराबादमधील जनतेच्या सनदशीर चळवळींचा समावेश होतो. त्यांत १८९२ मधील आर्यसमाजाची स्थापना, १९०५ मधील स्वदेशी चळवळ, १९१० मधील दहशतवाद्यांची कृत्ये, १९२१ मधील आंध्र महासभा व स्टेट रीफॉर्म्स असोसिएशनची स्थापना व १९३८ मधील काँग्रेस, आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचा सत्याग्रह वगैरे महत्त्वाच्या घटना होत. १८८० पासून हिंदी मुसलमानांचा पाठिंबा आपल्याला मिळावा म्हणून इंग्रजांनी, निजाम व त्याचे अधिकारी यांच्या मनात, हैदराबादच्या राज्यास मोगली साम्राज्याचा अवशेष व मुसलमान संस्कृतीचे प्रतीक म्हणून विशिष्ट स्थान आहे, अशा प्रकारची कल्पना भरविली. अर्थात त्यामुळेच पुढील राजकारणात निजामाने इंग्रजांना नुसतीच मदत केली नाही, तर काँग्रेसच्या चळवळींनाही विरोध केला. याचा मोबदला म्हणून १९२० च्या सुमारास निजामाने पूर्वी इंग्रजी फौजेच्या खर्चासाठी इंग्रजांस दिलेला वऱ्हाड प्रांत परत मिळविण्याची खटपट केली, पण ती अयशस्वी झाली. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पोलीस कारवाईने हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण करण्यात आले
इंग्रज शीख युद्ध
पहिले इंग्रज शीख युद्ध (१८४५-१८५६)
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी
पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती इंग्रजांनी रणजीतसिंहाच्या
अधिकाराला मर्यादा घालण्यासाठी २८ एप्रिल १८०९ रोजी अमृतसरचा मैत्रीची तह केला.
रणजितसिंहाने सतलज नदीच्या पूर्वेकडे राज्यविस्तार करू नये अशी अट इंग्रजांनी
घातली. पुढे तीस वर्षे हीच व्यवस्था कायम राहिली. पहिल्या इंग्रज-अफगाण युद्धात
रणजितसिंगाने इंग्रजांना सहकार्यही दिले. १८१२ पर्यंत इंग्रज-शीख संबंध सलोख्याचे
राहिले. पण त्यानंतर मराठा व गुरखा यांना मदत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात
दुरावा निर्माण होत गेला. या चिंतेतून मुक्त होण्यासाठी त्यांनी रणजितसिंगशी
घनिष्ठ मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले. या उद्देशाने प्रेरित होऊनच
इंग्रजांनी रॉर्बट बर्न याला रणतिजसिगला काही वस्तू भेट देण्यासाठी लाहोरला
पाठविण्यात आले. एवढयाने संतुष्ट न होता गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक याने स्वत: रणजितसिंगची
सतलज नदीच्या काठावर रोपड येथे २७ ऑक्टोबर १८३१ रोजी भेट घेतली. यावेळी
रणजितसिंगने रशियन आक्रमणाचे संकट उत्पन्न झाले तर परस्परात मैत्री कायम ठेवण्याचे
आश्वासन दिले. या भेटीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणजितसिंगने कंपनीला आपल्या
राज्यात व्यापार करण्याची परवानगी दिली.
गवर्नर जनरल बेंटिकने रणजितसिंहास कल्पना न देता १८३२ मध्ये सिंधच्या अमीरासोबत एक व्यापारी तह केला. रणजितसिंहास सिंध पाहिजे होता, म्हणून तो ब्रिटीशांच्या या कृतीवर नाराज झाला. शिखांनी एक लष्करी ठाणे ताब्यात घेतले होते ते ठाणे १८३५ साली सोडण्यास इंग्रजांनी शिखांना भाग पाडले. पुढे त्या ठिकाणी १८३८ मध्ये इंग्रजांनी आपला कायमस्वरूपी लष्करी तळ उभारला. पुढे हेच पहिले इंग्रज-शीख युद्ध उद्भवण्यास कारणीभूत ठरले. इंग्रजांनी रणजितसिंहाच्या शीख राज्यास चारही बाजूंनी वेढले होते. सतलज नदीच्या पुर्वेकडे फिरोजपूर लुधियाना, अंबाला व मिरत येथे इंग्रज सैन्याच्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या. इंग्रजांनी शिखांना त्यांच्या फौजा शिकुरपर्यंत मागे घ्यायला लावल्या होत्या. इंग्रजांनी त्यांची फौज २५०० पासून १४००० पर्यंत वाढविली होती. पंजाब जिंकण्यासाठीच या सर्व हालचाली केल्या गेल्या होत्या. त्यातच १८४३ मध्ये इंग्रजांनी सिंध घेतला हे शिखांना आवडले नाही. त्यानंतर सिंधमध्येही कंपनीने आपले सैन्य वाढवले होते. येथे त्यांचे ३२०० सैनिक व ६८ तोफा होत्या. त्यामुळे मुलतान मार्गाने केव्हाही आक्रमण करता येणार होते. दरम्यान १८३९ साली रणजीतसिंहाचा मृत्यू झाला होता. मृत्युनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला आणि राणी जिंदान ही अल्पवयीन पुत्राची पालक म्हणून पंजाबचा राज्यकारभार पाहत होती.
दिलीपसिंगची आई राणी जिंदनकौर व वजीर लालसिंह यास सैन्याचे वाढते वर्चस्व सहन
होत नव्हते. त्यातच दरबारी मंडळींवर व लष्करावर राणीचा अंकुश राहिला नाही. ही संधी
साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. यावेळी इंग्रजांनी सतलजच्या
डाव्या किनाऱ्यावरील प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात राहील अशी घोषणा केली. त्याच
वेळी ब्रिटिश गव्हर्नर हार्डिंग याने सिंध प्रांतावरील स्वारीनंतर इंग्रजी सैन्य
फिरोझपूरजवळ आणून ठेवले. त्यामुळे इंग्रज सैन्य आपल्या सैन्यावर स्वारी करणार असा
शीख सैन्याचा ग्रह होऊन, त्यांनी ११ डिसेंबर १८४५ रोजी हरिकी आणि कसूर यांच्यामधून
सतलज नदी ओलांडून इंग्रजांच्या प्रदेशावर स्वारी केली. आणि हयू गफ यांच्या
नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याशी संघर्ष सुरु केला. त्यामुळे हार्डिंगने १३ डिसेंबर
१८४५ ला शिखांबरोबर युद्ध घोषित केले. त्याने दिलीपसिंगच्या राज्याचा सतलजच्या
पूर्वेकडील प्रदेश इंग्रज साम्राज्यात विलीन करण्यात येत असल्याची घोषणा केली.
या युध्दात शीख सैनिक प्राणपणाने
लढले. परंतु त्यांचे काही सरदार इंग्रजांना फितूर झाल्यामुळे मुडकी, फिरोझशाह, अलीवाल येथील लढायांत
शिखांचा पराभव झाला. पण सोब्रओनची पाचवी लढाई (१० फेब्रुवारी १८४६) निर्णायक ठरली.
या युध्दात शीख सैन्य मोठया प्रमाणावर मारले गेले. इंग्रजांनी लाहोरवर वर्चस्व
प्रस्थापित केले. या वेळी ९ मार्च १८४६ रोजी शिखांना लाहोरचा तह स्वीकारण्यास
इंग्रजांनी भाग पाडले.तहानुसार शिखांना सतलजच्या डाव्या किनाऱ्यावरील व सतलज बियास
दुआबातील प्रदेश इंग्रजांना द्यावा लागला. शिखांना दीड कोटी रुपये युद्ध खंडणी
द्यावी लागली. शिखांकडे फक्त ५० लाख रुपये होते. उर्वरित खंडणीसाठी त्यांना सिंधू
व बियासमधील पहाडी प्रदेश किल्ले, काश्मीर व हजारा इंग्रजांना द्यावे लागले. शिवाय फक्त १२
हजारापर्यंत घोडदळ व २० हजारापर्यंत पायदळ ठेवण्यास शीख दरबारला परवानगी देऊन
त्यांची युद्धक्षमता कमी करण्यात आली.
दिलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम
ठेवले. मात्र त्याला मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील सरदार नेमले.
दलीपसिंगाला गादीवर बसवून पालक म्हणून त्याची आई जिंदनने लालसिंगाच्या सल्ल्याने
राज्यकारभार करावा, असे ठरविण्यात आले. तसेच ब्रिटिश सैन्य लाहोरला एक वर्ष
रहावे, हे मान्य करण्यात आले.
हेन्री लॅरेन्सला लाहोर येथे इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले. शिखांना इंग्रज रेसिडेंट
नियंत्रण नकोसे झाले. त्यातच रेसिडेंटने लाहोर दरबारास असा आदेश दिला कि, एक कोटी खंडणीसाठी
काश्मीर गूलाबसिंहास देऊन टाकावा. या आदेशाने पालन करु नये अशी सुचना लालसिंहाने
काश्मीरचा गव्हर्नर इमामउद्दीन यास दिली. त्यामुळे इंग्रज सैन्याने सरळ सरळ
काश्मीरचा ताबा मिळवला. या घटनेची चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती तिने लालसिंहास दोषी
ठरवून त्यास पंजाबमधून हद्दपार करण्यात आले. लाहोरची सत्ता एका प्रतिनिधी मंडळाकडे
सोपविण्यात आली. यातून काश्मीरच्या सुभेदाराचे बंड उद्भवले. ते इंग्रजांनी मोडून
काढले. त्यातुनच इंग्रज व शीख दरबार यांच्यात भैरोवालचा तह २२ डिसेंबर १८४६ रोजी
झाला. या तहानुसार पंजाबची राज्यव्यवस्था आठ शीख सरदारांच्या रीजन्सी कौन्सिलने
पहावी व त्यावर ब्रिटिश रेसिडेंट अध्यक्ष असावा, असे ठरले. लाहोर तहात ठरल्याप्रमाणे लाहोर येथे
कंपनीचे सैन्य १८४६ हे वर्ष संपेपर्यत थांबणार होते. पण भैरोवालच्या तहात दलीपसिंग
वयात येईपर्यंत इंग्रजी फौज लाहोरला ठेवावी व त्याबद्दल शिखांनी ब्रिटिशांना
प्रतिवर्षी २२ लक्ष रूपये द्यावे असे ठरले. ह्या तहामुळे लाहोर
दरबारावर इंग्रजी पकड घट्ट होऊन पुढील काळात पंजाब ताब्यात घेण्यास इंग्रजांचा मार्ग
सुकर झाला. इंग्रजांनी यावेळी पंजाब शक्य असतानाही जिंकला नाही. कारण इंग्रजांना
भारत व अफगाणिस्तान यांच्यात एक स्वतंत्र राज्य Buffer
State म्हणून हवे होते.
इंग्रज रेसीडेंटच्या हातात पंजाबच्या सर्व सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्यास
राणी जिंदनकौरने आक्षेप घेतला. त्यामूळे गव्हर्नर जनरलने २ ऑगस्ट १८४७ रोजी घोंषणा
केली की अल्पवयीन राजाचे शिक्षण व पालनपोषण पित्याप्रमाणे करण्याची गव्हर्नर
जनरलची इच्छा आहे आणि त्या दृष्टीेने राजा आणि त्याची आई यांना एकमेकांपासून वेगळे
ठेवण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे राणी जिंदान हिला इंग्रजांनी शेखूपुरा बनारसला
नेउन ठेवले. तिचा वार्षिक तनखाही फक्त ४८००० इतका कमी केला होता. शिवाय तिचे
दागदागिनेही काढून ठेवले. राणीला इंग्रजांनी हद्दपार करताच बंड फैलावले.
दुसरे इंग्रज शीख युद्ध
१८४६ च्या तहाप्रमाणे ब्रिटिश रेसिडेंटचे वर्चस्व शीख दरबारावर कायम झाले.
सेनाधिकाऱ्यांच्या विरूद्ध सैन्यात असंतोष धुमसत होता. त्यातच लॉर्ड हार्डिगच्या
जागेवर जानेवारी १८४८ मध्ये डलहौसीची नियुक्ती झाली. १८४६ मध्ये इंग्रज रेसिडेंटच्या सूचनेवरुन
मुलतानचा गवर्नर मुलराजला भेटीदाखल २० लक्ष रु चा नजराणा देण्यास सांगण्यात आले, तसेच रावी नदीच्या
उत्तरेकडील प्रदेश लाहोर दरबारला सोपविण्यास सांगण्यात आले. आणि मुलतान प्रांताचा
कर तीन वर्षासाठी ३३ लाखने वाढविण्याचे ठरविण्यात आले. या गोष्टी मुलराजाला मान्य
नव्हत्या, म्हणून त्याने डिसेंबर
१८४७ मध्ये त्याने आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. त्यामूळे त्याच्या जागेवर
३०,००० रु वार्षिक वेतनावर
कहानसिंहाला नियूक्त करण्यात आले. त्याला मदत करण्यासाठी जे दोन इंग्रज अधिकारी
आले होते. त्यांच्या उद्दाम वर्तनामुळे त्यांना ठार मारण्यात आले. प्रजेने जे बंड
केले त्याचे नेतृत्व मुलराजला देण्यात आले. या बंडाचे लोण इतरत्रही पसरले. ऑक्टोबर
१८४८ मध्ये डलहौसीने घोषणा केली की कोणतीही पूर्वसूचना न देता शिखांनी अकारण युध्द
सुरु केले आहे. मी शपथपूर्वक सांगतो की शिखांपासून या युध्दाचा बदला घेतला जाईल.
यावरून इंग्रज शीख युद्ध नोव्हेंबर १८४८ मध्ये सुरु झाले. ह्या युद्धात पेशावर परत
घेण्यासाठी अफगाणांनी शिखांशी सहकार्य केले. तरीही मुळराजाचा पाडाव झाला. १६
नोव्हेंबर १८४८ रोजी हयु गफ याचा शीख सैन्याशी संघर्ष झाला. त्यांच्यात झालेल्या
या रामनगरच्या लढाईत कोणताही निर्णय लागला नाही. लाहोरच्या रेसिडेंटने मुलतानला
वेढा घालण्यसाठी शेरसिंगाबरोबर सैन्य पाठविले, पण तो शिखांनाच मिळाला. जानेवारी १८४९ मध्ये
चिलिआनवाला येथे शीख व ब्रिटिश सैन्यांत लढाई झाली. ती निर्णायक न झाल्याने हयू
गफच्या जागेवर चार्ल्स नेपियरची नियुक्ती करण्यात आली.
चिनाब नदीकाठी गुजराथ शहराजवळ दोन्ही सैन्यांत घनघोर संग्राम झाला. हे युध्द तोफांची लढाई म्हणून प्रसिध्द आहे. ही निर्णायक लढाई होती. त्यात शिखांचा पराभव होऊन शेरसिंग व खालसा सैन्य ब्रिटिशांना शरण गेले. दिलीपसिंगला वार्षिक ५०,००० पौंड पेन्शन देऊन उच्च शिक्षणासाठी इंग्लडला पाठविण्यात आले. पुढे तो ख्रिस्ती झाला. आयुक्तांच्या एका समितीकडे पंजाबचे प्रशासन सोपविण्यात आले. त्यानंतर लॉर्ड डलहौसीने २९ मार्च १८४९ रोजी पंजाबचे राज्य खालसा करून ब्रिटीश साम्राज्यास जोडून टाकले. पंजाब प्रांत मिळाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सरहद्द अफगाणिस्तानच्या सरहद्दीपर्यंत भिडली. पंजाब स्वतंत्र प्रांत करण्यात आला . पुढील काळात ब्रिटिशांच्या सनदशीर धोरणामुळे शीख ब्रिटिशांचे कायम मित्र बनले. त्यांनी दुसरे इंग्रज-अफगाण युद्ध व १८५७ चा उठाव यांत ब्रिटिशांना सहकार्य दिले.
इंग्रज सिंध युद्ध
पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. आता पंजाबमधील शीख साम्राज्य, सिंध व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच जिंकावयाची राहिली होती. बाकीच्या संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा ताबा प्रस्थापित झाला होता. अॅक्हर्स्टच्या कारकिर्दीतपासून कंपनीचे लक्ष सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले राज्य वाढविण्याकडे केंद्रित झाले होते. जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या. अॅम्हर्स्ट ते डलहौसी पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे लागले. लॉर्ड हेस्टिंग्जनंतर लॉर्ड अॅक्हर्स्ट भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्या कारकिर्दीतच पहिले ब्रम्ही युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी ब्रम्ही फौजांचा पराभव केला. १८२६ साली यांदेबूच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना आराकान व तेनासरीम हे प्रांत दिले व आपल्या फौजा असामच्या प्रदेशातुन मागे घेतल्या.
भारतातील आपली सत्ता सुरक्षित
करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर आक्रमण
करील अशी त्यांना भीती होती. म्हणून अफगाणिस्तानावर प्रभाव प्रस्थापित करण्याचे
इंग्रजांनी ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंध व पंजाबमधून जात होते. यामुळे
सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले. सिंधच्या प्रदेशावर अमीरांची सत्ता होती.
इंग्रजांनी सिंध मध्ये व्यापारासाठी मुगल बादशाहकडून १६३० सालीच परवानगी मिळविली
होती. सिंध प्रांत पूर्वी मोगल
साम्राज्याचा एक विभाग होता. या साम्राज्याच्या पतनानंतर अफगाणांनी सिंध काबीज
केला. अफगाणिस्तानात जेव्हा यादवी सुरु झाली त्या वेळी १७६८ मध्ये बलुचिस्थानातील
तालपूर जातीने तेथे आपली सत्ता स्थापन केली. सिंधमध्ये तीन निरनिराळे सरदार मीरपूर
व हैद्राबाद येथे राज्य करीत होते.
१८०९ मध्ये इंग्रजांनी सिंधच्या अमीराशी तह करून फ्रेंचांना सिंधमध्ये येण्यास
प्रतिबंध केला. व्यापारी व लष्करीदृष्टया इंग्रजांना सिंध महत्वाचा वाटत होता.
त्यामुळे बेंटिकने तेथील अमीरांशी घनिष्ठ संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी
र्बोड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष लॉर्ड एलेनबरो याने सुचविलेल्या योजनेनूसार कार्य
करण्याचे त्याने ठरविले. १८३० मध्ये लेफटनंट रॉर्बट बर्न याला काही घोडे व अन्य वस्तू रणजीतसिंगला भेट
देण्यासाठी सिंधमार्गे पंजाबला पाठविण्यात आले. बर्नला असा गुप्त आदेश देण्यात आला
होता. की त्याने प्रवासात सिंधच्या राजकीय व लष्करी स्थितीची पाहाणी करावी.
जमल्यास अमीराशी व्यापारी करार करावा आणि आपला अहवाल गव्हर्नर जनरलकडे पाठवावा.
परंतु त्याने फारसा फरक पडला नाही.
बर्नच्या योजनेमूळे अमीरासोबतच
रणजितसिंगच्या मनातही इंग्रजांच्या हेतुबदल शंका निर्माण झाली. कारण सिंध जिंकून
घेण्याची त्याचीही इच्छा होती. पंरतु रणजितसिंगने सिंधवर आपले वर्चस्व प्रस्थापित
करावे ही गोष्ट इंग्रजांना मान्य नव्हती. रणजीतसिंहाने सिंधवर स्वारी करण्याची धमकी दिली होती.
सिंधचे अमीरसुध्दा रणजितसिंगच्या संभाव्य आक्रमणाबदल भयभीत होते. सिंधच्या अमीरने
अफगाणिस्तानच्या अमीराकडे संरक्षण मागितले. पण अफगाणिस्तानच्या आमीरने काहीच
प्रतिसाद दिला नाही.
बेंटिंकने त्यांच्या भीतीचा फायदा
घेऊन कच्छचा इंग्रज रेसिडेंट कर्नल पॉटीजर याला अमीराशी बोलणे करण्यासाठी पाठविले.
त्याने १८३२ मध्ये अमीराला कंपनीशी व्यापारी तह करण्यास भाग पाडले. या तहानुसार
इंग्रज सिंधमध्ये व्यापार करू शकत होते. अमीराला कंपनीने असे आश्वासन दिले होते, की कंपनी आपल्या फौजा
सिंधमधुन कधीही नेणार नाही. या तहाने इंग्रजांनी सिंधमध्ये व्यापारासाठी काही सवलती
मिळविल्या. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही सत्तेने सिंधमध्ये येउ नये अशी अटही
घातली. तहामुळे इंग्रजांनी रणजीतसिंहास सिंधमध्ये येण्यास मनाई केली. इंग्रज
रेसिडेंटला सिंधचे संरक्षण करण्याची परवानगी अमीराने दिली. त्यानंतर लॉर्ड ऑकलंड
गवर्नर जनरल असताना त्याने अफगाणिस्तानचा अमीर, रणजीतसिंह व इंग्रज यांच्यात एक त्रिपक्षीय तह
घडवून आणला व सिंध कब्जात आणण्याची चाल खेळली. रणजितसिंह व अफगाणिस्तानचा अमीर
यांच्या दबावापुढे झुकून सिंधच्या अमीराने डिसेंबर १८३८ मध्ये इंग्रजांशी तह केला.
या करारानुसार अमीरांनी हैद्राबाद येथे इंग्रज रेसिडेंट ठेवून घेण्याचे मान्य
केले.
पहिल्या इंग्रज अफगाण युध्दाला सुरुवात झाल्यावर इंग्रज सेनेला रणजितसिंगने आपल्या प्रदेशातून जाऊ दिले नाही. त्यामूळे ऑकलंडने १८३२ चा अमीरांशी झालेला करार मोडून इंग्रज सैन्य सिंधमधुन अफगाणिस्तानाकडे पाठविले. एवढेच नव्हे तर युध्दाच्या खर्चासाठी त्याने सिंधच्या अमीरांकडून २१ लक्ष रु वसूल केले. त्यांनंतर १८३९ मध्ये ऑकलंडने अमीरांशी पुन्हा एक नवीन तह केला. या तहानुसार इंग्रजांना कराची बंदर मिळाले. आमिरच्या संरक्षणासाठी ५०० सैनिकांची तुकडी ३ लाख रुपयाच्या मोबदल्यात दिली गेली. याचबरोबर इंग्रज-अफगाण युद्धात सिंधच्या आमीरने इंग्रजांना मदत केली.
हैद्राबादच्या इंग्रज रेसिडेंटने २ अमीरांबदल इंग्रजांना तक्रार केली. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याकरीता लॉर्ड एलनबरोने सर चार्ल्स नेपियरला सैन्यासह सिंधमध्ये पाठवले. ९ सप्टेंबर १८४२ रोजी तो कराचीत येऊन दाखल झाला. त्याने अमीराविरुध्द पुरावे गोळा केले व त्याच आधारावर अमीरांनी कंपनीशी केलेला करार पाळला नाही ही सबब पुढे केली. नोव्हेंबर १८४२ मध्ये त्यांच्यापूढे नेपियरने एक नवीन करार ठेवला. त्यात अमीरांनी आपली स्वतंत्र नाणी पाडू नयेत, सिंधमधील शिकारपूर, सख्खर, भक्कर, ही महत्वाची ठिकाणे कंपनीच्या ताब्यात द्यावीत, सख्खरच्या उत्तरेकडील प्रदेश बहावलपूरच्या नबाबाला द्यावा, सिंधू नदीतून मुक्त संचार करण्याची इंग्रजांना परवानगी द्यावी, अमीरांनी कंपनीशी एकनिष्ठ राहावे इत्यादी अटी अमीरासमोर ठेवल्या. या कराराच्या मोबदल्यात अमीरांना तैनाती फौजेच्या खर्चासाठी जे ३ लक्ष रु द्यावे लागत होते ते माफ करण्यात आले. या तहातील 'सिंधमध्ये इंग्रजांना नाणी पाडण्याचा हक्क' देऊन अमीराने आपले सार्वभौमत्व गमावले. हैद्राबादच्या परिषदेत अमीरांनी इच्छा नव्हती तरी या करारावर सहया केल्या. या सहया म्हणजे जूलूम जबरदस्तीच होती. इंग्रजांपूढे अशी शरणागती पत्करण्यास काही अमीर तयार नव्हते. १५ फेब्रुवारी १८४३ राजी सायंकाळी पुष्कळशा बलूची लोकांनी रेसिडेंट औट्रमच्या बंगल्यावर हल्ला चढवला, पण हल्ला होताच औट्रम पळून गेल्यामुळे वाचला.
हैद्राबादच्या उत्तरेस सुमारे १० मैलांवर मियानी येथे २०,००० बलूची सैन्य गोळा
झाले होते. १७ फेब्रूवारी १८४३ रोजी नेपियर हैद्राबादहून सैन्यासह निघाला आणि
त्याने बलूची सैन्यावर हल्ला चढवला. मियानी येथे घनघोर युध्द होऊन त्यात अमीरांचा
पराभव झाला. हैद्राबाद शहर इंग्रजांच्या ताब्यात आले. काही दिवसांनंतर पुन्हा
अमीर हैद्राबादवर चालून आले. हे वर्तमान कळताच २४ मार्च १८४३ रोजी नेपियरने एकदम
हल्ला करुन त्यांना पराभूत केले. २७ मार्च १८४३ रोजी इंग्रज सेनेने मीरपूर जिंकून
घेतले. १४ जून १८४३ रोजी अमीरांचा नेता शेर मोहम्मद याचाही पाडाव करुन नेपियरने
सर्व सिंध इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. ऑगस्ट १८४३ मध्ये एलनबरोने सिंधचे
विलीनीकरण ब्रिटिश साम्राज्यात झाल्याची घोषणा केली. सिंधवर विजय मिळवून देणाऱ्या
नेपियरलाच तेथे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.
इंग्रज-अफगाण आणि इंग्रज-रोहिला युद्धे
पहिले अफगाण युद्ध
(१८३८-१८४२)
अफगाणिस्तानातून रशिया भारतावर स्वारी
करील, अशी धास्ती इंग्रजांना
वाटत होती. त्यातून इराणच्या शाहने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७
मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी
प्रयत्न चालू केले. याच सुमारास रणजितसिंगाने अफगाणचा पेशावर प्रांत जिंकून घेतला होता. तो परत
मिळविण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली.
इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला. आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर
अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा
यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले.
दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर
बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले.
सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही
इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड, बलुचिस्तान या मार्गाने कंदाहार येथे पोहचली.
शाह शुजाचा मुलगा तैमूर याच्या नेतृत्वाखाली शीख सैनिक व इंग्रज अधिकारी वॉड यांची
दुसरी तुकडी पंजाब, पेशावर, खैबरखिंड या मार्गाने कंदाहारला पोहोचली. इंग्रजांनी १८३९
च्या एप्रिल महिन्यात कंदाहार, जुलैत गझनी आणि ऑगस्टमध्ये काबूल जिंकून घेतले. दोस्त महंमद
बूखाऱ्याला पळाला. त्यानंतर इंग्रजांनी त्याला कलकत्त्यात कैदेत ठेवले. इंग्रजांनी
शाह शुजाला गादीवर बसवून त्याच्या संरक्षणासाठी तेथे फौज ठेवली. त्यामुळे अफगाण
चिडले. दोस्त महंमदाचा मुलगा अकबरखान याने बंड करुन १८४१ मध्ये बर्न्स, मॅकनॉटन व इतर अधिकारी
यांचे खून केले. त्यानंतर मेजर हेन्री पॉटिंजर आला. त्याने पूर्वी झालेला तह
अंमलात आणून जलालाबाद, गझनी व कंदाहार ही स्थळे सोडून देण्याचे ठरविले. परत
जाणाऱ्या इंग्रजांची अफगाणांनी खैबर खिंडीत कत्तल केली. बाहेरुनही मदत मिळण्यास
इंग्रजांना अडचण पडू लागली. गव्हर्नर जनरल नॉर्थब्रुकने सैनिकांना माघार घेण्यास
सांगितले. अखेरीस खजिना व तोफा अफगाणांच्या स्वाधीन करुन इंग्रजांनी माघार
घेतली. या युद्धामुळे इंग्रजांचा काहीच
फायदा झाला नाही. ज्या शाह शुजासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले, त्याचाच अफगाणांनी खून
केला. ऑक्लंडच्या आक्रमक धोरणामुळे निष्कारण पैसा खर्च होऊन २०,००० लोक मृत्युमुखी पडले.
आणि इंग्रजांचा पराभव झाला.
दुसरे अफगाण युद्ध (१८७५-१८७९).
वारसाहक्काच्या भांडणाचा निकाल लागून १८६८ मध्ये शेरअली हा अफगाणिस्तानचा अमीर
झाला. रशियाचे मध्य आशियात वर्चस्व वाढल्यामुळे शेरअलीने इंग्रजांकडे मदत मागितली.
परंतु इंग्रजांच्या धरसोडीमुळे त्याने रशियाबरोबर मैत्रीची याचना केली. रशियाचा वकील काबलला जाताच गव्हर्नर जनरल
लिटनने शेरअलीस आपलाही वकील काबूल येथे ठेवून घेण्याचा आग्रह धरला. शेरअलीने ही
विनंती नाकारताच गव्हर्नर जनरल लिटनने त्याविरुद्ध युद्ध पुकारले. जनरल रॉबर्ट, जनरल स्ट्यूअर्ट व सॅम ब्राउन हे खैबर खिंडीतून
अफगाणिस्तानात पोहोचले. इंग्रजांनी कंदाहार घेताच शेरअली रशियाच्या हद्दीत पळाला.
त्याचा मुलगा याकूबखान याने इंग्रजांबरोबर १८७९ मध्ये गंदमक येथे तह केला. या
तहानुसार इंग्रज वकील काबूल येथे रहावयाचा होता. कुर्रम, पिशी आणि तिवी ही ठिकाणे इंग्रजांच्या ताब्यात
आली. अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचे खून केले
व याकूबखानला कैद केले. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करुन इंग्रज फौजेचा मैवंद
येथे पराभव केला.
शेवटी गव्हर्नर जनरल रिपनने शेरअलीचा
पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी तह करुन दुसरे अफगाण युद्ध थांबविले. इंग्रजांनी
अमीराकडून खंडणी घेऊन गंदमकच्या तहाने सोडलेला प्रदेश परत मिळविला. या युद्धामुळे
इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद
बसला.
तिसरे अफगाण युद्ध (१९१९)
पहिल्या दोन युद्धांत इंग्रजांनी अफगाणिस्तानावर स्वारी केली होती. तिसऱ्या वेळी मात्र अफगाणिस्तानने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. अमीर अमानुल्ला याने अफगाण लोकांच्या दडपणामुळे १९१९ च्या एप्रिल महिन्यात ब्रिटिश प्रदेशावर आक्रमण केले. हे युद्ध फक्त दोनच महिने चालू होते. अफगाण लोकांनी खैबर खिंडीतून पेशावरच्या परिसरात हल्ले केले. इंग्रजांनी विमानासारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे ते यशस्वी झाले. १९१९ च्या नोव्हेंबर महिन्यात तह झाला .अफगाणिस्तानला परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांकडून अमीराला मिळणारे आर्थिक साहाय्य बंद झाले. या युद्धानंतर इंग्रज अफगाण संबंध सुधारले.
इंग्रज-रोहिला
युद्ध(१७७२-१७७४)
अयोध्येच्या वायव्य दिशेला असलेला रोहिलखंड पूर्वीपासून सुपीक प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. तो प्रदेश अफगाण टोळ्यांनी (रोहिल्यांनी) १७४० च्या सुमारास जिंकला व तेथे आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील (१७६१) पराभवानंतर मराठ्यांनी १७६९-७० पासून उत्तर भारतात परत स्वाऱ्या करण्यास सुरूवात केली. त्यामुळे १७७२ मध्ये रोहिल्यांनी अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला याच्याशी तह केला. या तहानुसार मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केल्यास नबाबाने रोहिल्यांना लष्करी मदत करावी व त्याबद्दल रोहिल्यांनी नबाबाला चाळीस लक्ष रूपये द्यावे,असे ठरले.
१७७२ मध्ये मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केली, तथापि माधवराव पेशव्याचा मृत्यु व नारायणराव
पेशव्याचा खून ह्या पुण्यातील घटनांमुळे त्यांना त्वरीत दक्षिणेस परतावे लागले. या
युद्धात लष्करी मदतीची गरज न पडताही नबाबाने रोहिल्यांकडून चाळीस लक्ष रूपयांची
मागणी केली. ही मागणी रोहिल्यांनी नाकारताच नबाबाने इंग्रजांबरोबर रोहिलखंड
जिंकण्यासाठी तह केला. या तहानुसार इंग्रजांनी नबाबाला रोहिलखंड घेण्यासाठी लष्करी
मदत करावी व त्याबद्दल त्याने इंग्रजांना युद्धाचा खर्च व चाळीस लक्ष रूपये द्यावे
असे ठरले. या तहान्वये अयोध्या व रोहिलखंड येथील राज्यकारभारात हस्तक्षेप करण्यास
वॉरन हेस्टिंग्जला संधी मिळाली. शुजाउद्दौलाने इंग्रजी सैन्याच्या मदतीने कत्रा व
मीरानपूर येथे रोहिल्यांचा पराभव केला. रोहिल्यांचा प्रमुख हाफिज रहमत खान हा या
युद्धात मारला गेला व वीस हजार रोहिल्यांना हद्दपार करण्यात आले. रोहिलखंडाचा
प्रदेश अयोध्येला जोडून घेण्यात आला. पुढे १८५६ मध्ये अयोध्येच्या संस्थानाबरोबरच
रोहिलखंडाचा प्रदेशही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात समाविष्ट करण्यात
आला.
मराठ्यांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यापासून बंगाल प्रांताचे संरक्षण करण्यासाठी हेस्टिंग्जने रोहिलखंड अयोध्येला जोडून ते बलवान मध्यवर्ती राज्य बनविले. या युद्धामुळे बंगालमधील ब्रिटिशांची सत्ता दृढ झाली. तथापि इंग्लंडमध्ये परत गेल्यानंतर हेस्टिंग्जवर शुजाउद्दौल्याला इंग्रजी सैन्याची मदत देऊन रोहिल्यांशी युद्ध ओढवून घेतले व केवळ पैशाच्या अपेक्षेने इंग्रजी सैन्य भाड्याने दिले,असे आरोप करण्यात आले.
इंग्रज-गुरखा युद्धे
इंग्रज-गुरखा युद्धे
(१८१४-१८१६)
हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून
सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या
शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश जिंकून तेथे आपली स्वतंत्र
राज्ये स्थापन केली. त्या राज्यांमध्ये काठमांडूच्या नेवार राजाला प्रमुख पद
देण्यात आले. १७६७ मध्ये काश्मीरमधील गुरखे नावाच्या राजपुतांनी नेपाळवर स्वारी
करुन नेवार राजाला जर्जर केले, तेव्हा त्याने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी मदत
म्हणून काही फौज रवाना केली, पण तराईच्या प्रदेशातून जाताना पर्जन्यामुळे व रोगराईमुळे
बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले. १७६८ साली गुरख्यांचा नेता पृथ्वीनारायण ह्याने
भाटगावच्या रणजीत मल्लाचे वारसदार नेवार राजाचा पराभव करुन काठमांडूचे राज्य
मिळविले. १७७१ साली पृथ्वीनारायणाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा प्रतापसिंह गादीवर
आला. प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर १७७५ साली त्याचा अल्पवयीन मुलगा रणबहाद्दूर
ह्यास गादीवर बसवून त्याचा चुलता राज्यकारभार करु लागला. त्यांनी काश्मीर, भूतान, सिक्कीम इ. प्रदेशांवर
हल्ले सुरु केले.
गुरख्यांनी ल्हासा येथील पवित्र मंदिर
लुटताच चीनच्या राजाने सत्तर हजार फौज नेपाळवर पाठविली. गुरख्यांनी स्वरंक्षणासाठी
इंग्रजांकडे मदतीची याचना केली, पण इंग्रजांनी त्यांना मदत केली नाही. रणबहाद्दूर वयात
येताच त्याने राज्यकारभार हाती घेतला, पण तो क्रूर असल्याने गुरख्यांनी त्याला हद्दपार
केले. तो इंग्रजाच्या आश्रयास गेला. गव्हर्नर जनरल वेलस्लीने त्याचा सत्कार करुन
त्याला आर्थिक साहाय्य केले, तसेच काशी येथे त्याची राहण्याची व्यवस्था केली.
त्याच्यातर्फे बोलणी करण्यासाठी इंग्रजांनी आपला वकील काठमांडूला पाठविला.
रणबहाद्दूरच्या खर्चाची तरतूद करावी व इंग्रजांनी त्याच्यासाठी केलेल्या खर्चाची
परतफेड करावी, अशा इंग्रजांनी मागण्या केल्या. त्या गुरख्यांनी अमान्य केल्या. पुढे
रणबहाद्दूर परत काठमांडूला गेला, पण त्याचा खून झाला
अयोध्येच्या वजीराचा गोरखपूर जिल्हा व बस्ती जिल्हा इंग्रजांनी फौजेच्या
खर्चासाठी ताब्यात घेतला होता. हा जिल्हा नेपाळच्या हद्दीस लागून होता.
हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तराई प्रदेशाच्या हद्दीसंबंधाने तंटे उत्पन्न
झाले. ते मिटविण्यासाठी बार्लो व मिंटो या दोन्ही गव्हर्नर जनरलांनी नेपाळ
दरबारकडे पुष्कळ कारवाई केली. पण गुरख्यांनी ती मानली नाही. त्यानंतर गुरख्यांनी बस्ती जिल्ह्याच्या
उत्तरेकडील भूतवल व शिवराज हे दोन जिल्हे जिंकून घेतल्याने इंग्रज व नेपाळ
संघर्षाची ठिणगी पडली. पण लौकरच इंग्रजांनी भूतवल व शिवराज जिल्हे परत
संघर्षाशिवाय ताब्यात घेतले. लॉर्ड हेस्टिंग्जने तपास केला, तेव्हा ब्रिटिश हद्दीतील
दोनशे गावे गुरख्यांनी आपल्या राज्यात सामील केली आहेत, असे त्यास आढळून आले. तो प्रदेश मिळविण्यासाठी
त्याने १८१४ च्या उन्हाळ्यात ब्रिटिश लष्कर रवाना केले. पण गुरख्यांनी हल्ला करुन
त्यास पिटाळून लावले. ही घटना गुरख्यांना आपल्यावरील आक्रमण वाटले. म्हणून मे १८१४
मध्ये त्यांनी भूतवल जिल्ह्यातील पोलिस
चौकीवर हल्ला चढविला. हे पाहताच हेस्टिंग्जने नेपाळविरुद्ध युद्ध पुकारले.
त्याच्या नेतृत्वाखाली ३४००० चे सैन्य तयार करण्यात आले. तर गुरख्याजवळ १२००० सैन्य
होते.
नेपाळचा मुख्य सेनापती अमरसिंह भापा
हा आपली फौज सज्ज करुन पश्चिमेस सतलजच्या बाजूने पंजाबात उतरणार असे समजताच, त्यावर दोन मार्गांनी
इंग्रजी फौजा चढाई करुन गेल्या. डेव्हिड ऑक्टर्लोनीच्या हाताखालील सैन्य
पश्चिमेकडून सतलजच्या बाजूने नेपाळात घुसले. तसेच एक तुकडी गोरखपुराहून वुडच्या
हाताखाली व दुसरी पाटण्याहून मॉर्लेच्या हाताखाली अशा दोन स्वतंत्र तुकड्या
काठमांडूवर चालून गेल्या. नेपाळचा हा डोंगरी प्रदेश इंग्रजांना अज्ञात असून
गुरख्यांना मात्र गनिमी हालचाली करण्यास उपयुक्त होता. तोफा, युद्धसाहित्य व मनुष्यबळ
पोहोचविण्याच्या दृष्टीने इंग्रजांना फारच त्रास झाला. मुख्यत: ३० ऑक्टोबर, २७ नोव्हेंबर व २५
डिसेंबर १८१४ ह्या तीन दिवशी झालेल्या घनघोर लढायांत इंग्रजांचा पराभव झाला.
कालंगच्या किल्ल्यावरील लढाईत अपयशी होऊन इंग्रज सेनानी जनरल गिलेस्पी मारला
गेला. मेजर जनरल मार्टिनडेल सुद्धा अपयशी ठरला.एप्रिल १८१५ मध्ये कर्नल निकोलस आणि
गार्डनर यांनी अल्मोडा नगर जिंकून घेतले. ऑक्टर्लोनीने मात्र सावधपणे व धीमेपणाने
मे १८१५ मध्ये अमरसिंह थापापासून मालन जिंकून घेतले. त्यानेच कुमाऊँ प्रांतात
घुसून १८१५ च्या डिसेंबरमध्ये शत्रूला पराभूत केले. युद्ध थांबवून तह करण्यासाठी
गुरख्यांनी आपला वकील ऑक्टर्लोनीकडे पाठविला. या तहास सिगावलीचा तह म्हणतात. या
तहानुसार इंग्रज रेसिडेंट काठमांडूला रहावा असे ठरले. मात्र गुरख्यांचा सेनापती
अमरसिंह थापा ह्या तहाच्या विरुद्ध होता. इंग्रजांच्या भरमसाठ मागण्यामुळे परत
युद्धास सुरुवात झाली. यावेळी युद्धाची पूर्ण सूत्रे डेव्हिड ऑक्टर्लोनी याच्याकडे
होती. त्याने २८ फेब्रुवारी १८१६ रोजी मकवानपूर येथे गुरख्यांचा पराभव केला.
ऑक्टर्लोनी काठमांडूवर चालून येतो, असे दिसताच गुरख्यांनी सिगावलीच्या तहास मान्यता दिली. या
तहानुसार गढवाल व कुमाऊँ हे प्रांत इंग्रजांनी घेतले. शिवाय तराई मुलूखही घेतला.
गुरख्यांनी सिक्कीमचा ताबा सोडून दिला. काठमांडू येथे ब्रिटीश रेसिडेंट ठेवण्याचे
मान्य केले. हेस्टिंग्जने काही प्रदेश घेण्याचे ठरवून मार्च १८१६ च्या तहास
मान्यता दिली. मात्र पुढे इंग्रजांनी नेपाळवर हल्ला करणार नाही असे कबूल केले.
नेपाळच्या युद्धात काही काळ अपयश
आल्यामुळे हेस्टिंग्जची बरीच नाचक्की झाली, पण युद्धातील विशिष्ट अडचणी लक्षात घेऊन
वरिष्ठांनी हेस्टिंग्जला पाठिंबा दिला. तराईतील वादग्रस्त प्रदेश, तसेच कुमाऊँ व गढवाल हे
दोन प्रांत गुरख्यांनी इंग्रजांना दिले, त्यातच सिमला हे थंड हवेचे ठिकाण इंग्रजांना
मिळाले. गुरख्यांनी इंग्रजांचा पराभव केलेला पाहून भारतातील सत्ताधीशांच्या मनात
इंग्रजांच्या उच्चाटनासंबंधीच्या विचारास चालना मिळाली. युद्धकाळात कंपनीने
अवधच्या नवाबाकडून एक कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. त्याऐवजी नवाबाला रोहिलखंड
परगण्यातील तराई क्षेत्राचा काही भाग देण्यात आला. १० फेब्रुवारी १८१७ रोजी सिक्कीमच्या राजासोबत
एक स्वतंत्र तह करण्यात आला. त्यानुसार राजाला तिस्ता व मेची नदीदरम्यानचा प्रदेश
देण्यात आला. इंग्रज व नेपाळ मध्ये झालेला हा तह शेवटपर्यंत कायम राहिला. तहानंतर
कंपनी सैन्यात मोठ्या प्रमाणात गुरखे भरती झाले. गुरखे लढवय्ये व प्रामाणिक होते.
त्यामुळे कंपनीला फायदा झाला.