नागपुरचा उठाव - Scholarship Exam

       मीरत व दिल्लीतील उठावाची बातमी नागपूर येथे सर्वप्रथम टाकळी येथील राज्याच्या बिनकवायती लष्करास लागली. उत्तरेकडील हेर नागपुरात आले व त्यांनी कामठी येथील सैनिकांना फितूर केले. नागपुरातील सैनिकांनी १३ जून १८५७ रोजी उठाव करण्याचे ठरविले पण ही बातमी फुटली. कॅप्टन वूड यास त्यांच्या नोकराने टाकळी येथील सैन्याच्या फितुरीची बातमी दिली. १२ जून १८५७ रोजी फैजबक्ष याने स्टीफन हिस्लॉप मिशनरी यांना कटाची माहिती दिली. या सर्व बातम्या कमिश्नर प्लौड यांस १२ जूनला रात्री १० वाजता कळल्या. लगेचच सीताबर्डी किल्ल्यातील सैन्य शहरात आणले गेले. पायदळाचे आधिपत्य कमिश्नर असिस्टंट कैबरलेन यांच्याकडे दिले. ठरल्याप्रमाणे सर्व बंडखोर १३ जून रोजी रात्री १० वाजता एकत्र जमले. ते टाकळी येथील सैन्य येण्याची वाट पाहत होते. टाकळीचे स्वारही पायदळाच्या लायनीत पाठविलेल्या दफेदारांच्या येण्याची वाट पाहत होते. पण मद्रासी हवालदाराने दफ़ेदारास पकडल्याने सर्व कट उघडकीस आला. ठरल्याप्रमाणे मोतीबागेत दारूचे फुगारे न उडाल्यामुळे बंडखोरांनी योजनेची अंमलबजावणी केली नाही.

 १४ जून रोजी रविवारी कामठी येथील सैन्य इंग्रजांनी बोलावले. सैनिकांची धरपकड सुरु करण्यात आली. घोडदलातील २० जणांवर खटले भरले गेले. इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादरखान यांना फाशी दिली गेली.  मराठा मंडळींनी युवराज जानोजी भोसले यांच्या नावाने द्वाही फिरवून गादीचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. परंतु राणी बाकाबाईंनी सर्व प्रतिष्ठित लोकांना राजवाड्यात बोलाविले. आणि कोणीही उठाव करू नये असे सांगितले.