पेठ मधील कोळी राजा भगवंतरावचा उठाव - Scholarship Exam

              नाशिक जिल्ह्यातील पेठ संस्थानचा संस्थानिक कोळी राजा भगवंतराव हा होता. १८४८ च्या करारानुसार सर्व अधिकारांचा त्यांनी त्याग केला होता. संस्थांनची सत्ता हातात आल्यावर ब्रिटिशांनी संस्थानातील काही कर रद्द केले होते. मे १८५७ मध्ये भगवंतरावांनी ते कर पुन्हा लावले. ते कर लावण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे ब्रिटिशांनी त्यांना कळविले. पण भगवंतरावांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ब्रिटीश अधिकारी 'चापमान' याने अहमदनगरच्या कलेक्टरला भगवंतरावला ५० रुपये दंड करावा व तो त्याने न भरल्यास त्याच्यावर हल्ला करण्याची शिफारस केली. त्यामुळे इंग्रज व भगवंतराव यांच्यात तणाव निर्माण झाला. भगवंतरावांच्या पाठींब्याने पेठमध्ये कोळ्यांनी इंग्रजांना त्रास द्यायला सुरुवात केली.

 ६ डिसेंबर १८५७ रोजी कोळी लोकांनी पेठमधील 'हर्सूल'च्या बाजारावर अचानक लुटमार केली. सावकाराची हत्या केली. सैनिकांना मारहाण केली. चौकशीसाठी आलेल्या मामलेदाराला पकडून पेठेला आणले. उठावाची माहिती मिळताच लेफ्टनंट ग्लासपोल हा ३३ सैनिकांसह दिंडोरीहून पेठला आला. कोळी जंगलात पळाले पण काहींना ग्लासपोलने पकडले. त्यांना सोडविण्यासाठी कोळी पुन्हा आले. नगरचा भिल्ल नेता भागोजी नाईक हा सुद्धा मदत करण्यासाठी आला. त्यांनी नगरला वेढा देऊन ग्लासपोलवर गोळीबार केला. ग्लासपोलला सोडविण्यासाठी कॅप्टन नट्टल ने कोळी व भिल्लांवर हल्ले केले.

 २२ डिसेंबर १८५७ रोजी नाशिकपासून ४४ किमी दूर 'बासीवखेडा' येथे भिल्ल व कोळ्यांचा पराभव झाला. या लढाईत भिल्लांचा नेता गणपत नाईक मारला गेला. यानंतर चकमकीत भागोजीचा भाच्चा महीपत नाईक मारला गेला. पेठच्या उठावातील प्रमुख सूत्रधार 'फतेह मुहम्मद नाईक' होता. त्याच्या अटकेसाठी ब्रिटिशांनी ५००० रुपये बक्षीस ठेवले. भगवंतरावाविरुद्ध पुरावा नसल्याने ब्रिटिशांनी सारुष्टे गावचा पाटील भाऊ मालेकर यांच्या घराला वेढा दिला. मालेकर शरण आला व त्याने या सर्व कारस्थानामागे भगवंतराव असल्याची कबुली दिली. २८ डिसेंबर १८५७ रोजी भगवंतराववर खटला चालवून त्याला पेठच्या कचेरीसमोर फाशी दिली गेली.