सशस्त्र क्रांतिकारी चळवळ - Scholarship Exam

 

अनुशीलन  समिती (१९०१)

विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था. संस्थेच्या कार्याचा काही भाग उघड चाले, तर काही पूर्णपणे गुप्त असे. युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात. गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना  क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.

वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन  समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू  बारिंद्रकुमार घोष व  इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले. अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा  स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास  ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली. पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे, तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते. ह्या मतभेदांमुळे  अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.

पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व ⇨राशबिहारी  बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई. समितीच्या शाखा सर्व बंगालभर  होत्याच. त्याशिवाय आसाम, बिहार, पंजाब, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत व दक्षिणेत पुण्यापर्यंतही त्या पसरलेल्या होत्या.

अनुशीलन समितीच्या अंतर्गत व्यवस्थेसंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र डाक्का येथील शाखेची माहिती मिळते व त्यावरून बरीच कल्पना येऊ शकते. या समितीच्या संपूर्ण बंगालमध्ये शाखा प्रस्थापित करण्यात आल्या होत्या. त्यांतून रशियातील क्रांतिकार्याच्या धर्तीवर शिक्षण देण्यात येई. कार्यासाठी शस्त्रास्त्रे जमा केली जात व त्यांचा वापर परक्या अंमलदारावर व आपल्यातील फितूर अधिकाऱ्यांवर करावयाचा असे. द्रव्यासाठी आवश्यक तेव्हा लूटमार करणे, हाही त्यांच्या कार्यक्रमाचा भाग असे.

भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात ह्या समितीचे कार्य फारसे परिणामकारक झाले नसले, तरी तिच्या उद्दिष्टांची व मार्गांची दखल घेणे अगत्याचे आहे. 

भगतसिंग

मार्च,१९३१ रोजी भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मर२३ णार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो.

भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती. 

गुलामी आणि दारिद्ऱ्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे तेे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.

 भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशनाआधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

 भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप',इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली. 

९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना. खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपत्र हॊय. 

"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.

हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला :-

१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.

२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बाँब व स्फोटके यांची निर्मिती करणे.

३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे.

४) आगगाड्या उडविणे.

५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.

६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.

७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि,

८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.

सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला 

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. . 

महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फ़ाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."

भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली

ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे. कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते. नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभयास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.

संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. यातच ८ एप्रिल १९२९मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.

या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.

शहीद भगतसिंगांचा "मी नास्तिक का झालो" हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.

"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती. 

'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?

एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.

जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.

भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जुलै २३, १९०६ - फेब्रुवारी २७, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पृर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

बनारस येथे विद्यार्थीदशेत असतानाच ड्यूक ऑफ विंझरच्या भेटीवर बहिष्कार घालण्याच्या उद्देशाने त्यांनी पाठशाळेत निरोधन केले. त्याबद्दल झालेल्या फटक्यांच्या शिक्षेमुळे ते दहशतवादी बनले. काशी राष्ट्रीय विद्यापीठात शिकत असतानाही त्यांचे सर्व लक्ष क्रांतिकारक चळवळींकडे होते. १९२५ च्या काकोरी कटात त्यांनी भाग घेतला . कटातील प्रमुख व्यक्तींना पकडण्यात येताच चंद्रशेखर फरारी झाले. सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘हिंदुस्थान रिपब्‍लिक असोसिएशन’ या जुन्या संस्थेचे‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्‍लिक असोशिएशन ’ मध्ये रूपांतर केले व या संघटनेचे सेनापतिपद स्वीकारले . या संस्थेचा लाहोर-कट उघडकीस आल्यामुळे ती संस्था विसर्जित झाली. तरीसुध्दा चंद्रशेखर आझाद आपल्या सशस्त्र क्रांतीच्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. दिल्लीतील पेढीवरील व पंजाब बँकेवरील दरोडे,सॉडर्स या पोलिस अधिकाऱ्यावरील हल्ला,कानपूरला चालविलेला गुप्त बॉबचा कारखाना इ. प्रकरणांत चंद्रशेखरांचा पुढाकार होता. ब्रिटीश सरकारने त्यांना पकडण्यासाठी दहा हजार रूपायांचे बक्षीसही लावले होते.

दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे 'सुखदेव राज' या क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.

सुभाषचंद्र बोस

 (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५?) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. 

नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.

जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.

प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.

प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.

आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते 

शिक्षण व विद्यार्थी जीवन

लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.

वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.

१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य

कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजीमणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.

गांधींजीनी देखिल कलकत्त्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंनाभेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते.दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.

१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी,कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुं्बीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हासायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्याभावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांचीफाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.

कारावास

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

१९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

१९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

१९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

युरोपातील वास्तव्य

१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते.

युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटली चे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्यास्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंड चे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.

सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.

पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.

विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.

१९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.

हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.

ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.

आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.

१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू नजपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्यरवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.

सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.

पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.

१९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.

अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना

मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.

नजरकैदेतून पलायन

नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबूपेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.

नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट

बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री डम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.

अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते डॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या िषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.

काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनीअ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.

शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.

पूर्व आशियातील वास्तव्य

पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.

नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.

ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.

आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.

पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनीतुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.

द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.

आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.

ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थीजपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

सुभाषचंद्र बोसांशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या.२०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.

भारतरत्‍न पुरस्कार

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.

आझाद हिंद सेना:  सुप्रसिध्द भारतीय पुढारी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या नेतृत्वाखाली  भारतीय स्वातंत्र्यासाठी सिंगापूर येथे जुलै १९४३ मध्ये उभारण्यात आलेली लष्करी संघटना.

दुसरे महायुद्ध चालू असता नेताजी सुभाषचंद्रांना ब्रिटीश सरकारने कलकत्ता येथे नजरकैदेत ठेवले होते. तेथून ते १७ जानेवारी १९४१ रोजी धाडसाने निसटले आणि अनेक अडचणींना तोंड देत जर्मनीत पोहोचले . जर्मनीत भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून, स्वातंत्र्यसेना उभी करण्याचा त्यांनी निर्धार घोषित केला व त्यासाठी जर्मन सरकारची सक्रिय सहानुभूतीही मिळवली . जर्मनी व फ्रान्समधील भारतीय नागरिक व जर्मनांच्या ताब्यातील युद्धबंदी ह्यांतून सु. तीन हजारांची फौज निर्माण झाली. परंतु तेथून भारत दूर असल्यामुळे नेताजींना प्रचाराखेरीज प्रत्यक्ष कृती करणे अशक्य झाले.

आग्नेय आशियात १९४२ च्या सुमारास युद्धास प्रारंभ होऊन १५ फेब्रुवारी रोजी जपानने सिंगापूरचा ब्रिटिश आरमारी तळ काबीज केला. नेताजी सुभाषचंद्र सिंगापूरला पोहचण्यापूर्वी मलायी मोहिमेत जपान्यांच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश सेनेतील भारतीय सैन्याधिकारी कॅप्टन मोहनसिंग ह्यांनी जपान्यांच्या आश्रयाखाली भारतीय राष्ट्र सेना स्थापन केली. होती. त्याच वेळी स्वातंत्र्य चळवळीची कार्यवाही त्वरित व्हावी, म्हणून भारतीय स्वातंत्र्य-संघ स्थापून एक कृतिमंडळही नेमले होते. त्यावर ⇨राशबिहारी  बोस ह्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कॅ. मोहनसिंग ह्यांच्या निमंत्रणावरून बँकॉक येथील परिषदेस हजर राहण्यासाठी जर्मन व जपानी सरकारच्या मदतीने महत्प्रयासाने नेताजी जून १९४३ मध्ये सिंगापूरला जाण्यासाठी टोकिओत दाखल झाले. परंतु दरम्यान मोहनसिंग ह्यांचे जपानशी मतभेद होऊन जपान्यांनी ही सेना बरखास्त केली; परंतु भारतीय स्वातंत्र्य-संघ ही संस्था तेथे अस्तित्वात होती. नेताजींनी जपान्यांच्या मदतीने मोहनसिंगांच्या लष्करी संघटनेचे पुनरुज्‍जीवन करून तिला ‘आझाद हिंद सेना’ हे नाव देण्याचे ठरविले. २ जुलै १९४३ रोजी नेताजी सिंगापूरला गेले व लागलीच त्यांनी राशबिहारी बोस यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्य-संघाची धुरा आपल्या हाती घेतली आणि ५ जुलै १९४३ रोजी औपचारिक रीत्या आपल्या आधिपत्याखाली आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याचे घोषित करून ‘चलो दिल्ली’ हे घोषवाक्यही प्रसृत केले. जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, सामान्य भारतीय नागरिक व असंख्य स्रिया देशसेवेसाठी स्वेच्छेने ह्या सेनेत दाखल झाल्या. दोन लष्करी विभाग भरतील एवढे खडे सैन्य, जपानच्या हाती लागलेल्या ब्रिटीश शस्त्रसामग्रीच्या आधाराने सुसज्‍ज करण्यात आले. जगन्नाथराव भोसले, शाहनवाजखान व मेजर सैगल या भारतीय युद्धबंदी लष्करी अधिकाऱ्यांना मेजर जनरल हा हुद्दा देण्यात आला व त्यांच्या अनुक्रमे चीफ ऑफ जनरल स्टाफ व विभागीय सेनाप्रमुख म्हणून नेमणुका केल्या. नेताजी सुभाषचंद्रांनी ह्या सेनेचे सरसेनापतिपद आपणाकडे घेतले आणि स्रियांचे जे ‘झाशीची राणी पथक’ तयार करण्यात आले, त्याचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन ह्या सुप्रसिद्ध महिलेकडे सुपूर्त केले. ह्या सर्व सैन्यास तातडीचे लष्करी शिक्षण देण्यात येऊ लागले.

२१ ऑक्टोबर १९४३ ला नेताजींनी आझाद हिंदचे तात्‍पुरते सरकार प्रस्थापित केल्याची घोषणा केला. जपान, इटली, जर्मनी वगैरे राष्ट्रांनी तत्काळ त्यास औपचारिक मान्यताही दिली. लष्करी संघटनेबरोबरच आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारने नागरी शासनव्यवस्थेतही लक्ष केंद्रित केले आणि काही मुलकी खाती उघडली. त्यांतील अर्थ, प्रसिद्धी, लष्कर-भरती, आरोग्य व समाज-कल्याण, पुरवठा, गृहबांधणी, वाहतूक इ. विशेष महत्त्वाची होती. पैसा, साधनसामग्री व सेनासंख्याबळ यांचे सर्वंकष संयोजन करण्यात येऊ लागले. स्वत: नेताजींनी जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून सभा घेतल्या आणि नभोवाणीवरून भाषणे दिली. थोड्याच दिवसांत आझाद हिंद सेनेस जपानी सेनेचा दर्जा प्राप्त झाला व ती कार्यन्वित झाली. नेताजीच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे व स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयामुळे भारतीय सैनिकांची संख्या तीस हजारांच्या वर गेली. पुढे त्या सेनेची गांधी, नेहरू, आझाद अशी तीन पथकांत विभागणी करण्यात आली. ह्या पथकांतील निवडक लोकांचे एक स्वतंत्र पथक ‘नंबर एक गनिमी पथक’ ह्या नावाने तयार करण्यात आले व ते शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करू लागले हेच पथक पुढे ‘सुभाष –पथक’ म्हणूनही लोकप्रिय झाले.

आझाद हिंद सेना जरी युद्धासाठी सज्‍ज झाली, तरी जपानी अधिकारी तिला आपल्या बरोबरीची समजण्यास तयार नव्हते. त्यांचे मत असे होते की, तिच्यातील बहुतेक सैनिक ब्रिटिशांच्या नोकरीतील भाडोत्री सैनिक असल्याने ते जपान्यांप्रमाणे जिद्दीने लढणे शक्य नाही. म्हणून त्यांची स्वतंत्रच पथके ठेवावीत. परंतु हे मत नेताजींना अमान्य होते. त्यांना आपल्या सैन्याबद्दल आत्मविश्वास होता. त्यांनी आपले सैन्य जपान्यांबरोबर मुद्दाम धाडले. आझाद हिंद सेनेचा पराक्रम पाहून जपान्यांचेही पुढे मत बदलले. १९४४ च्या मार्च महिन्यात जपान्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्य सीमेवर चढविलेल्या हल्ल्यात भाग घेण्यासाठी ह्या सेनेतील काही पथके धाडण्यात आली. सीमेवरील इंफाळ येथे झालेल्या लढाईत ह्या सैन्यातील काही पथकांनी चांगली कामगिरी बजाविली. १९४४ च्या मे महिन्यात शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने भारतीय हद्दीत प्रवेश करून मोडोक हे ठाणे जिंकले. ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेला व विमानमाऱ्याला न जुमानता ते जवळजवळ महिनाभर लढले. ह्या वेळी कॅप्टन सूरजमल ह्यांच्या हाताखाली एक जपानी पलटणही देण्यात आली होती. मोडोकप्रमाणे इतर लढायांतही ह्या सेनेने चांगले पराक्रम केले. एक मोक्याचे ठिकाण जिंकण्याची आज्ञा होताच, लेफ्टनंट मनसुखलाल व मूठभर सैनिकांनी जिवाची पर्वा न करता ती टेकडी जिंकली व आपण जपानी सैनिकांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही हे सिद्ध केले. ह्या युद्धात मनसुखलाल ह्यांना अनेक जबर जखमा झाल्या, तरी त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केलेच. आझाद हिंद सेनेच्या इतर पथकांनीही अशीच उत्तम कामगिरी बजावली. परंतु अखेर शत्रूचे प्रचंड संख्याबळ, विमानदल आणि शस्त्रसामग्री, तसेच जपानी सैनिकांनी घेतलेली युद्धक्षेत्रातील माघार ह्यांमुळे सुभाष पथकास नाइलाजाने माघार घ्यावी लागली. शिवाय अपुरा शस्त्र-व अन्न-पुरवठा, रसद मिळण्यातील अडचणी, जपान्यांचे लहरी सहकार्य इत्यादींमुळेही लढाई थांबविणे ह्याशिवाय त्यास दुसरा पर्याय नव्हता. ही पीछेहाट चालू असतानाच ब्रिटिशांनी विमानांतून पत्रके टाकली व ब्रिटिश सैन्यात परत या, अशी लालूच दाखविली. पण एकाही सैनिकाने त्यास भीक घातली नाही किंवा आझाद हिंद सेनेशी बेइमानी केली नाही, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट होय. भारत-सीमा पार करून पुढे ब्रह्मदेशात आगेकूच करणाऱ्या ब्रिटिश व भारतीय सैन्याला आझाद हिंद सेनेची पथके शरण आली. २ मे १९४५ रोजी रंगून पडल्यावर थोड्याच दिवसांत पुढे जपानने शरणागती पतकरली. नेताजी त्या वेळी सिंगापूरहून विमानाने टोकिओला जात असता अपघात होऊन मृत्यू पावले असावेत, असे म्हणतात. आझाद हिंद सेनेच्या पुष्कळ अधिकाऱ्यांना व सैनिकांना कैद करण्यात येऊन भारत सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला. शाहनवाजखान, सैगल आदी अधिकाऱ्यांवर कोर्टापुढे खटले भरण्यात आले. तथापि भारतीयांच्या यासंबंधीच्या प्रक्षुब्ध लोकमताच्या जाणिवेने ब्रिटीश सरकारने या आधिकाऱ्यांच्या शिक्षा माफ केल्या (३ जानेवारी १९४६).

आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने, मानाने व आदराने ‘नेताजी ’ְम्हणू लागली; त्यांनी दिलेली ‘जय हिंद’ही घोषणा आजही सर्वतोमुखी झाली आहे. प्रत्यक्ष युद्धात जरी ही सेना पराजित झाली असली, तरी तिचे उद्दिष्ट, तीमागील प्रेरणा आणि जिद्द व थोड्या अवधीत तिने केलेली कामगिरी, यांबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आदराचे स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सेनेच्या अल्पकालीन पण स्फूर्तिदायक इतिहासास काही आगळे व महत्त्वाचे स्थान आहे.