जन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र), मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे), भाऊरावांचा जन्म एका जैन कुटुंबात झाला. त्यांचे वडील इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते. त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे मूळ आडनाव देसाई होते नंतर महाजन आणि त्याहीनंतर पाटील असे झाले. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. भाऊरावांचे वयाच्या १८व्या वर्षीच लक्ष्मीबाईसोबत लग्न झाले. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण १९०२ ते १९०९ या काळात राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्या वेळी ते जैन वसतिगृहात राहत असताना अस्पृश्यांच्या एका समारंभाला हजर राहून परतले. आंघोळीच्या नियमभंगापोटी वसतिगृह सुपरिटेंडंट श्रीयुत लट्ठे यांनी त्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली. त्यानंतर ते थेट शाहू महाराजांच्या राजवाड्यावर आले. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.कोल्हापुरातच त्यांचा सत्यशोधक चळवळीशी परिचय झाला. येथेच त्यांच्यावर महात्मा फुले व विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा प्रभाव पडला.
१९०७ साली त्यांनी
इस्लामपूर येथे एक अस्पृश्य विद्यार्थी ज्ञानदेव घोलप वर्गाबाहेर बसून शिकत
असल्याचे पाहिले. त्यांनी त्याला घरी नेले व स्वतःबरोबर जेऊही घातले.
कोल्हापूरच्या मिस क्लार्क होस्टेलमध्ये त्याला प्रवेशही मिळवून दिला. या सर्व
प्रकारामुळे त्यांना घरचा मारही पडला. ज्ञानदेव घोलप नंतर रयत शिक्षण संस्थेचा
विद्यार्थी बनला. तसेच तो विधानसभेचा पहिला अस्पृश्य सदस्य प्रतिनिधी बनला. इंग्रजी
शाळेत सहावीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. आणि साताऱ्यात खाजगी शिकवण्या सुरु
केल्या. तेथे मात्र ते ‘पाटील मास्तर’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले. याच काळात
त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर १९०९ साली दुधगावात 'दुधगाव विद्यार्थी आश्रम'
स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व
जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे
बीज येथेच रोवले गेले. १९१० साली 'दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळा'ची स्थापना केली. यामधील काळात
त्यांनी विविध कामे केली. त्यांनी काही दिवस जवाहिऱ्याच्या दुकानात काम केले.
संस्कृत विषयाच्या शिकवण्याही केल्या. १९१३-१४ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांची संघटना
बांधली. विमा एजंट म्हणून धनिकांचे शैक्षणिक संस्थांच्या नावाने विमे करून द्यायला
लावले. १९२१ पर्यंत त्यांनी ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स यांचे
विक्रेते म्हणूनही काम केले. १९२२ साली कुपर यांच्या सहाय्याने लोखंडी कारखानाही
उभा केला.
कोल्हापुरात किंग एडवर्ड यांच्या पुतळ्याला १९१४
मध्ये डांबर फासण्यात आले. या प्रकरणात लट्ठे यांच्यांवर संशय होता. भाऊरावांनी
त्याच्याविरुद्ध साक्ष द्यावी म्हणून त्यांचा अनन्वित छळ झाला. परंतु त्यानी खोटी
साक्ष दिली नाही.पोलिसांच्या छळाला कंटाळून त्यांनी दोनदा आत्महत्या करण्याचा
प्रयत्न केला. सुदैवाने दोन्ही वेळा ते बचावले. शेवटी या प्रकरणातून त्यांची सुटका
झाली. १९२४ साली सर्व व्यवसायातून व त्रासातून ते बाहेर पडले आणि त्यांनी शैक्षणिक
कार्यासाठी सर्वस्व वाहून घेतले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी
जवळून संबंध आला. ते सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय
स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
सप्टेंबर १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे
सत्यशोधक समाजाच्या परिषदेत भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी एक
शैक्षणिक संस्था सुरु करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी
अशोक विजयादशमीच्या दिवशी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा
जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण
संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या
संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. त्याच गावी संस्थेमार्फत एक वसतिगृह,
एक प्राथमिक शाळा व एक रात्रशाळा सुरु
करून भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास आरंभ केला. शैक्षणिकदृष्ट्या
मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे,
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना
मोफत शिक्षण देणे, निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे,
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या
विकासाचे वळण लावणे, संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे,
सर्व मुले काटकसरी व स्वावलंबी तसेच
शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी
जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे ही या संस्थेची उद्दिष्टे होती. ही
उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे,
तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा,
सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण
विद्यार्थ्यांना दिली. स्वावलंबी, स्वाभिमान, स्वतंत्र, स्वाध्याय ही रयत शिक्षण संस्थेची शिक्षणाची चतुःसूत्री होती.
१९२१ साली
भाऊरावाची महात्मा गांधींसोबत भेट झाली. गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर गाढा
परिणाम झाला. त्यानंतर भाऊरावांनी जीवनात खादीचा अंगीकार केला. व गांधीजींची तत्वे
रोजच्या जीवनात पाळायला सुरुवात केली. गांधीजींच्या नावावर त्यांनी १०१ शाळा सुरु
केल्या. १९२१ साली वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे त्यांनी वसतिगृह उभारले. या
वसतिगृहात अस्पृश्यासहित सर्व जातीधर्माचे विद्यार्थी राहत असत. कोणाही एकावर
आश्रमाच्या भोजनाचा खर्च पडू नये म्हणून 'मुष्टीफंड' ही अभिनव योजना त्यांनी सुरु केली.
(मुष्टीफंड - घरातील बाई जेव्हा जात्यावर दळण्यासाठी बसायची तेव्हा फक्त एक मुठ
धान्य टांगले त्या पिशवीत टाकायचे नंतर वसतिगृहातील मुले/शिक्षक ती पिशवी घेऊन
जात)
१९२४ साली सर्व
जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह
स्थापन केले. यासाठी रयत शिक्षण संस्थेचे साताऱ्याला स्थलांतर केले. हे वसतिगृह
चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय
प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग
केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ
लाभली. २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री
छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी १९३३
सालापासून संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू
केली. या बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद अली होते. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर
यांच्यात झालेल्या 'पुणे करारा'च्या स्मृतीप्रीत्यर्थ कर्मवीरांनी पुण्यात १९३३ साली 'युनियन बोर्डिंग हाउस'
सुरु केले. १६ जून १९३५ रोजी रयत
शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. त्यावेळी 'वटवृक्ष' हे संस्थेचे बोधचिन्ह ठरले. 'शाळेविना खेडे आणि प्रशिक्षित
शिक्षकाविना शाळा नको' या कर्मवीरांच्या विचारसरणीनुसार १९३५ साली साताऱ्यात भाऊरावांनी
‘सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. त्याचे आजचे नाव 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय'
असे आहे. हे खाजगी शिक्षण संस्थेचे
राज्यातील पहिले ट्रेनिंग कॉलेज होते. १९३६ साली रयत शिक्षण संस्थेचे दुसरे
अध्यक्ष रा.ब. काळे यांच्या नावाने पहिली मराठी शाळा सुरु केली. १९३८ साली डोंगराळ
भागातील मुलांसाठी यवतेश्वर येथे पहिली व्हॉलंटरी प्राथमिक शाळा सुरु केली. १९४२
साली मिश्र वसतिगृह आणि 'जिजामाता अध्यापक विद्यालय' महिलांसाठी सुरु करण्यात आले. काले
(धोंडेवाडी) येथे १९१९ सालीच कर्मवीरांनी प्राथमिक शाळा सुरु केली होतीच. अण्णांनी
आपल्या हयातीत १९५९ पर्यंत १०१ माध्यमिक शाळांचे नियोजन केले होते.
१९४० साली भाऊरावांनी देशातले 'कमवा आणि शिका'
या पद्धतीने चालणारे पहिले 'फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल' सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले 'महाराजा सयाजीराव हायस्कूल'.
यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर
सुरू झाली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी भाऊरावांनी 'लक्ष्मीबाई मेमोरियल फंडा'ची स्थापना केली. १९४७ साली भाऊराव
पाटलांनी साताऱ्यात मुंबई राज्यातील पहिले मोफत व वसतिगृहयुक्त ग्रामीण 'छत्रपती शिवाजी कॉलेज'ची, तर १९५४ साली कऱ्हाड येथे 'सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज'ची स्थापना केली. शाळा व
महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय'
व पुढे १९५५ साली सातारा येथे मौलाना
आझाद यांच्या नावाने पदवीधर शिक्षकांसाठी 'आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन'
सुरू केले. त्यांच्या एकूण कार्याचा
आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे
दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य
केले. 'प्रत्येक गावात शाळा',
'बहुजन समाजातील शिक्षक'
व 'शिक्षक प्रशिक्षण' या सूत्रांचा
त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. भाऊराव
पाटील यांच्या हयातीत रयत शिक्षण संस्थेने ५७८ प्राथमिक शाळा,
४३९ माध्यमिक शाळा (२७ मुलींसाठी),
३८ वसतिगृह शाळा,
१६० उच्च माध्यमिक विद्यालये,
१७ शेती विद्यालये,
२१ तंत्रज्ञान विद्यालये,
८ अध्यापक महाविद्यालये (१
महिलांसाठी), ४१ महाविद्यालये (४ मुलींसाठी) आणि ५ इंग्रजी माध्यम विद्यालये यांची स्थापना
केली. अण्णांच्या संस्थेचा विस्तार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत आहे. फक्त 'महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ'
हे कर्मवीरांचे अपुरे स्वप्न राहिले. रयत
शिक्षण संस्थेचा अस्पृश्य विद्यार्थी 'लक्ष्मण भिंगार दिवे' हा संस्कृत विषयांत पहिला आल्याबद्दल गांधीजींनी गळ्यातील हार देऊन
त्याचा सत्कार केला. १९४८ साली कर्मवीरांचे ऋण फेडण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या
माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला १ लाखाची थैली अर्पण केली.
'सत्यशोधक समाज' चळवळीचे नेतृत्व भाऊरावांनी केले. महात्मा गांधींच्या 'हरिजन सेवक संघा'च्या कार्यात त्यांनी सहभाग घेतला.
हरीजनोद्धारासाठी असणाऱ्या मुंबईतील 'श्री गाडगे महाराज मिशन' या संस्थेचे आणि कर्मवीर विठ्ठल शिंदे यांच्या 'डिप्रेस्ड क्लास मिशन'
या संस्थेचे तसेच हरिजनांसाठी स्थापन
केलेल्या पंढरपुरातील 'संत चोखामेळा धर्मशाळा' या तीनही संस्थांचे ते विश्वस्त होते. मुंबई राज्य बैकवर्ड क्लास
वेल्फेअर बोर्डाचे ते सदस्य होते. हरिजन सेवेसाठी स्थापन केलेल्या सातारा जिल्हा
बोर्डाचे ते सदस्य होते. 'पुणे करारा'पूर्वी अण्णांनी गांधीजींच्या २१
दिवसांच्या उपोषणानंतर श्रीमती सरोजिनी नायडू यांना १२ मे १९३३ रोजी हरिजनांच्या
शिक्षणासंबंधी साताऱ्यात सुरु केलेल्या कार्याची माहिती दिली होती. आणि गांधींना
संस्थेस भेट देण्याची या पत्रात विनंती केली होती. साताऱ्यात १९२४ साली 'सर्व जातीधर्मांच्या
विद्यार्थ्यांसाठी' एकाच वसतिगृह सुरु केल्याची तपशीलवार माहिती कर्मवीरांनी छत्रपती
राजाराम महाराजांना १५ जून १९३६ रोजी एका पत्राद्वारे दिली. याच पत्रात
वसतिगृहातील कोल्हापूर येथे शिकण्यास येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना नादारी देण्यात
यावी अशी विनंती केली होती.
भाऊरावांनी
केशवपनासारख्या भयानक रूढीविरुद्धही आवाज उठविला. याचेच यश म्हणून भाऊरावांच्या
सत्यशोधक जलशामध्ये १५० न्हाव्यांनी जाहीरपणे अशी शपथ घेतली कि,
"जो न्हावी उद्यापासून बायाबापड्यांना
शिवेल तो स्वतःच्या जन्मदात्या आईला हात लावेल." यावेळी प्रबोधनकार ठाकरेही
भाऊसोबत होते. अस्पृश्यता निवारण हे माझ्या कार्याचे एक अंग असल्याचे सांगणारे एक
पत्र कर्मवीरांनी मुंबई राज्याच्या 'डायरेक्टर ऑफ बैकवर्ड क्लास वेल्फेअर' यांना १० जानेवारी १९५५ रोजी लिहिले.
मुंबईचे खासदार नारायण काजरोळकर यांना कर्मवीरांनी अशाच आशयाचे एक पत्र २७ जुलै
१९५६ रोजी लिहिले. '"अण्णांनी 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" आणि "पोपटपंची शिक्षण
मला नको आहे" हे बोधवाक्य स्वीकारले. त्यासाठी त्यांनी 'कमवा आणि शिका'
हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. ते
श्रम हीच प्रतिष्ठा असे मानत असत. काही प्रसंगी सरकारी मदतीविना शाळा बंद पडण्याची
वेळ आली तेव्हा त्यांनी सरकारला विनंती केली कि,
"Give me a waste Land, I will turn it into Best Land". "मनगट घासून श्रम केल्याशिवाय कोणालाही
संस्थेत फुकट खावयास मिळणार नाही." असा आत्मविश्वास अण्णाकडे होता.
१२ फेब्रुवारी १९४८
रोजी गांधींना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी लोकशिक्षणाची जाहीर घोषणा केली.
त्यात जिजामाता अध्यापिका विद्यालय आणि लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह सुरु केल्याचा
अभिमानयुक्त उल्लेख होता. २४ मे १९५१ रोजी वाई येथील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी
आवाहन केले कि, "महाराष्ट्राचे
मार्टिन ल्युथर, गुरुवर्य महात्मा फुले यांच्या
संदेशाप्रमाणे हिंदू समाजातील स्त्री व अस्पृश्य या दलितांचा शिक्षणाने उद्धार
करणे, ही मी माझे जीवितकार्य मानले
आहे." छत्रपती राजाराम महाराजांचे कोल्हापुरात ग्रामीण विद्यापीठ व्हावे असे
एक स्वप्न होते. अण्णांनी ६ मे १९५९ रोजी कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी महाराजांना
पत्र लिहून तशी विनंती केली. त्याला अनुसरून छत्रपती शहाजींनी तत्कालीन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांच्याकडे पाठपुरावा केला. हे ग्रामीण
विद्यापीठ अण्णांच्या पश्चात १९६२ साली झाले.
महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा संत
गाडगे बाबा यांच्या हस्ते कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. १९५९ साली भारत सरकारने
त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी ५ एप्रिल १९५९ रोजी सन्माननीय डी. लिट. ही
पदवी दिली होती. श्री. ह. रा. महाजनी
यांनी 'महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन'
या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन
केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे
भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. (भारताचे बुकर दि वॉशिंगटन असे
महात्मा फुले यांना म्हणतात.) प्रसिद्ध
शिक्षणतज्ञ बैरीस्टर पांडुरंग गणपती पाटील यांनी कर्मवीरांचे आत्मचरित्र (द
बाउंटीफुल बन्यन) लिहिले आहे. महात्मा
गांधींच्या हत्येपूर्वी १५ दिवस आधी १९४८ साली संत गाडगे महाराजांच्या
अध्यक्षतेखाली कर्मवीरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी कर्मवीरांचा गौरव
करणारा 'भाऊराव पाटील की सेवा ही उनका सच्चा
कीर्तीस्तंभ है' हा गांधींच्या स्वअक्षरातील संदेश
वाचण्यात आला. हा संदेश त्यांच्या कार्याची माहिती सांगणारा आहे.
"जगातल्या कुठल्याही विद्यापीठाची पदवी
नसलेल्या कर्मवीरांना सर्व विद्यापीठाच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक
कार्याचा गौरव कमीच होईल" - डॉ. पंजाबराव देशमुख
"रक्ताचे पाणी
व हाडाची पूड करून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकली तर त्याचा मोठा वृक्ष होतो. तसेच
रयत शिक्षण संस्थेचा वृक्ष कर्मवीरांनी मोठा केला आहे." - आचार्य अत्रे
"कर्मवीर ही व्यक्ती नसून संस्था होती.
बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात
नवयुग सुरु केले." - यशवंतराव चव्हान